
सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक इंधन साठ्यावर झाला असून, याचे पडसाद आता थेट सिंदेवाही तालुक्यात उमटताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून, याचाच गैरफायदा घेत अवैध रित्या चढ्या दराने पेट्रोल विकणाऱ्यांवर सिंदेवाही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.नेमकी परिस्थिती काय?सिंदेवाही शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. दोन-तीन दिवसांनंतर पेट्रोलची गाडी पंपावर येते, मात्र अवघ्या १२ तासांत साठा संपतो. परिणामी, सामान्य नागरिकांना पेट्रोल मिळणे कठीण झाले आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही ऑटोमोबाईल दुकानदार अवैध साठा करून गरजेच्या वेळी लोकांना ५० ते ८० रुपये प्रति लिटर जास्तीचे घेऊन पेट्रोल विकत असल्याची माहिती समोर आली होती.पोलिस कारवाई:अवैध पेट्रोल विक्रीच्या तक्रारी प्राप्त होताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे यांनी पथकासह सिंदेवाही परिसरात शोध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शिवाजी चौकातील ‘श्रीकृष्ण ऑटोमोबाईल’ या दुकानाची पंचासमक्ष तपासणी केली असता, तिथे ४० लिटर अवैध पेट्रोलचा साठा आढळून आला.याप्रकरणी दुकानाचे मालक रामकृष्ण दादाजी अगळे यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा (कलम ३ आणि ७) अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पेट्रोल पंप मालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना पंपावर केवळ २०० रुपयांचे (दुचाकी) आणि ५०० रुपयांचे (चारचाकी) पेट्रोल दिले जात असताना, या दुकानदारांकडे इतका मोठा साठा येतो कुठून? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अवैध साठवणुकीला काही पेट्रोल पंप मालकांचे छुपे समर्थन तर नाही ना? याची सखोल चौकशी करून दोषी पंप मालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी आता सिंदेवाहीतील जनतेकडून जोर धरू लागली आहे.















