
वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनात
शाक्य कुळात बाळ जन्मले
दुमदुमली कपिलवस्तू नगरी
सिध्दार्थ नाव राजकुमाराचे ठेविले…..!!
बुध्द धम्मातील या मंगल दिनी
घडल्या तीन घटना या दिनी
जन्म, ज्ञानप्राप्ती, महानिर्वाण
हा त्रिगुणी संगम बुध्दांच्या जिवनी……!!
दुःख मुक्तिच्या मार्गासाठी
करूनी घोर तपश्चर्या
प्रयत्नांची केली पराकाष्ठा
सुकूनी गेली त्यांची काया……!!
खीर पिवूनी सुजाताची
नवचैतन्य येई तना मना
बोधीगयेला जावूनी सिद्धार्थ
करू लागले ज्ञान साधना……!!
अन्नाशिवाय जगणे कठीण
मार्ग आहे हा अनित्य
बोधिगयेला झाले ज्ञानप्राप्त
जाणीले त्यांनी जीवनाचे सत्य…..!!
सुख आहे क्षणभंगुर
जिवन आहे दुःखमय
जाणीले त्यांनी जीवनाचे मर्म
आर्य अष्टांगिक मार्ग दीला सुखमय…..!!
बोधिगयेला जावूनी सिद्धार्थ
पिंपळ वृक्षाखाली बसले ज्ञानसाधनेला
झाले बुद्धत्व प्राप्त त्यांना
वैशाख शुद्ध पोर्णिमेला……!!
ज्ञानप्राप्ती करूनी बुध्दांनी
जगी धम्मचक्र फिरविले
शाश्वत सत्याचा शोध लावूनी
अंतिम समयी अत्त, दीप,भव बोलले….!!
सौ.रंजना धर्मपाल आटे
वर्धा















