prabodhini news logo
Home एटापल्ली एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ओडसा टोला उजळला; भाकपाच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांकडून आभारांची उधळण

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ओडसा टोला उजळला; भाकपाच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांकडून आभारांची उधळण

0
104

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज: तालुका एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत मेंढरी येथील ओडसा टोला हा गेल्या सुमारे एक वर्षापासून वीजविहीन अवस्थेत होता. खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे संपूर्ण वस्ती अंधारात बुडाली होती. या कालावधीत ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र अखेर भाकपाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओडसा टोला येथे वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः ठप्प झाले होते. रात्रीच्या वेळी अभ्यास करणे अशक्य झाले होते. महिलांना अंधारात घरकाम करणे कठीण जात होते, तसेच सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याचे पाणी, शेतीची कामे, तसेच लघुउद्योगांवरही याचा मोठा परिणाम झाला होता. अनेक वेळा वीज वितरण कार्यालय, एटापल्ली येथे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढत होती.

अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्वतः गावाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागावर दबाव आणला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त/बदलण्यात आला आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी भाकपाचे आभार व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिल्या. “जे आमदाराला जमलं नाही, ते भाकपाने करून दाखवलं,” असे उद्गार अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

या कामामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची सोय झाली असून महिलांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकरी व इतर कामगार वर्गालाही त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये मोठी मदत झाली आहे.

ओडसा टोला येथे वीजपुरवठा सुरू झाल्याने केवळ एक मूलभूत सुविधा उपलब्ध झाली नसून, ग्रामस्थांच्या जीवनात नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. भाकपाच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण लढ्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here