
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पातुर : पातुर तालुक्यातील निमखेड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व जातीय द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप ग्राम पोलीस पाटील संजय उपटे यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक संघटना, भीमसैनिक आणि ग्रामस्थांनी संबंधिताविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने व्हॉट्सअॅप सोशल मीडियावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चान्नी पोलीस ठाणे गाठून निवेदन सादर केले. संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीसह विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी व पोलीस पाटील पदावरून हटवावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आरोपी काही काळ फरार असल्याचे सांगितले जात असताना पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. अटकेनंतर आरोपीला पोलीस ठाण्यात नेत असताना संतप्त नागरिकांनी त्याला जाब विचारल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधिताला आपल्या ताब्यात घेतले.
या घटनेनंतर शेकडो ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत निषेध व्यक्त केला. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी पोलिसांना निवेदन देऊन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
संबंधित पोलीस पाटलावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी.
पोलीस पाटील पदावरून तात्काळ हटवावे.
समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी.
संविधान आणि महामानवांचा अवमान करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवावा.
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. सध्या परिसरात शांतता असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सम्राट अशोक सेना व आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी गावातील भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















