
ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : “शिक्षण हेच खरे दान” हा सुविचार केवळ भिंतीवर न राहता तो प्रत्यक्ष कृतीत आणल्यास समाजाचा विकास कसा होतो, याचे एक आदर्श उदाहरण नुकतेच चकबोथली येथे पाहायला मिळाले. जनसेवा, शिक्षणप्रेम व सामाजिक कार्याची चिरंतर परंपरा जपणारे, परिसराचे मार्गदर्शक स्व. चक्रधर पालनदास दोनाडकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रामसभा भवन, चकबोथली येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तूंचे भव्य वितरण करण्यात आले.
३० मे २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात गावातील व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीसाठी नोटबुक (वह्या) आणि एक्झाम पॅड चे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. या वस्तूंचे वितरण परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षणप्रेमी संतोष माकडे,गुलाब मातेरे सर ज्ञानेश्वर काटलाम, अनिल मातेरे सर, प्रा. अंकुश मातेरे, कैलास माकडे, गावच्या सरपंच दुर्गा नखाते,पो.पा. ज्योती मैंद तथा मुख्याध्यापक गुरूनुले सर व जि.प सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात, स्व. चक्रधर पालनदास दोनाडकर यांनी आयुष्यभर समाजोपयोगी कामांना प्राधान्य दिले. त्यांच्या पश्चातही हा सामाजिक कार्याचा वसा व वारसा दोनाडकर परिवाराने तितक्याच तत्परतेने पुढे चालवला आहे. त्यांच्या जन्मदिवशी विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना खरीखुरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून स्व. चक्रधरजी यांच्यासारखेच उच्च विचार आत्मसात करावेत, असा मोलाचा संदेश दिला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन कृषक विद्यालय चौगानचे मुख्याध्यापक अंबरदास मुखरू दोनाडकर यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.याप्रसंगी पालनदास दोनाडकर, सुरज दोनाडकर, लिन्मय दोनाडकर, नंदू दोनाडकर, आशिष दोनाडकर तथा समस्त दोनाडकर परिवार व मित्र परिवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिकांनी व युवकांनी मोलाचे सहकार्य केले. या स्तुत्य उपक्रमामुळे दोनाडकर परिवाराच्या सामाजिक बांधिलकीची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात होत आहे.















