
निसर्गसवर्धन आपली जबाबदारी
अनंत काळापासून सजीव हे निसर्गावर अवलंबून आहे , पृथ्वीवर सजीव व निर्जीव दोन्ही वास्तव्यास आहेत, मानवजात तर निसर्गाच्या कुशीतच जन्म घेते व शेवटचा श्वास ही पृथ्वीवरच घेते. सजीवातील सर्वात बुध्दीमान प्राणी मानवजात
म्हणून ओळखल्या जाते. मानवाला अन्न वस्त्र, निवारा व पाणी या मुलभूत गरजा निसर्गातूनच मिळतात. व मानव आपल्या हव्या तशा गरजा भागवत आला आहे, मानव निसर्गाच्या अनेक गोष्टींचा मर्यादेपेक्षा जास्त उपभोग घेऊ लागला. मानव हा स्वताला विद्वान समजून निसर्गावर अधिराज्य गाजवू लागला म्हणजेच हळूहळू निसर्गाच्या जिवावर उठला. निसर्गाला दुष्परिणाम घडवून आणणारे व निसर्गाशी खेळ करणाऱ्या साधणाचा वापर करून निसर्गाला आजकाल खुप हाणी पोहचवत आहे. व त्याचे परिणाम ही आपण आज भोगत आहोत.
यामध्ये प्रामुख्याने जंगल तोड, वाढते प्रदुषण ,पाणी टंचाई,
औषधी वनस्पती नष्ट होणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अती-
वापर यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. त्याकडे आपण कटाक्षाने दुर्लक्ष करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाने माणूस अहंकारी झाला आहे . स्वताच्या प्रगतीसाठी वेळोवेळी निसर्गाच्या जिवावर उठतो आहे. वाढते उद्योग धंदे, दळणवळणासाठी लागणारे रस्ते रूंदीकरण, वृक्ष तोड, शहरातील वाढती वसाहत, झाडे लावण्यापेक्षा तोडण्यावर जास्त भर, जंगलामध्ये आग लागण्याचे प्रमान वाढत आहे.निसर्गाच्या जिवावर आपण सर्व सुख भोगत आहो हे मानव विसरत आहे.
झाडे लावण्यासाठी आज जनजागृती करण्याचे काम पडत आहे हे आज विज्ञान युगात मोठी शोकांतिका आहे. या पेक्षा या देशाचे मोठं दुर्दैव काय असू शकते. निसर्ग ही आपल्याला लाभलेली अनमोल देणगी आहे तो आपला श्वास आहे. हेच माणूस विसरत चालला आहे.
जो तो पाण्यासाठी पृथ्वीच्या पोटात शिद्र (होल) पाडण्यात मग्न झाला आहे. पाणी थोपवण्याचे जिरवण्याचे कोणीही प्रयत्न करत नाही. दरवर्षी तापमानाचा उच्चांक वाढत आहे. दुष्काळ
पडत आहे तर कधी कधी पुर महापुर येऊन गावे वाहून जात आहे तर कधी भूकंप होत आहे अधून मधून निसर्ग ही आपले रौद्ररूप दाखवत असते.
आज खरे पाहता निसर्गाचे संगोपन करण्याची गरज आहे, आणि हे काम एकदोघाचे नाही तर देशातील सर्व समाज बांधवांचे व देशवासीयांचे आहे हे कोणीही लक्षात घेत नाही .
आज काल पॉलिथिन, पिशव्या, प्लास्टिक याचा भरपूर वापर होत आहे त्यामुळे नदी, नाले गटारी तुंबतात तिर्थस्थळावर भक्त,पर्यटन स्थळावर पर्यटक जातात तेव्हा पॉलिथिन कचरा चहूकडे बिखरलेला दिसतो, तेव्हा हेच कळत नाही, की आपण पर्यटनस्थळ पाहण्यासाठी कींवा तिर्थस्थळावर देवदर्शनासाठी जातो. का? कचरा करण्यासाठी जातो. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आपल्याला आपले घरदार, एरिया, परिसर स्वच्छ पाहीजे मग देवाचे तिर्थस्थळ, किंवा पर्यटन स्थळ स्वच्छ असावे असे मनातून का वाटत नाही. पर्यटनस्थळ, मंदिर, तिर्थक्षेत्र हे सरकारी मालमत्ता जरी असली तरी आपण एक देशाचा नागरीक म्हणून स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी नाही का? प्रत्येकाने जर संकल्प केला की आपल्या घरातील ओला सुका कचरा,पाॅलिथीन घरच्या घरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला योग्य ती विल्हेवाट लावली कींवा पॉलिथिन पिशव्या न वापरता कापडी कागदी किंवा पाण्याबरोबर वितळणाऱ्या पिशव्यांचा वापर करायला लागलो तर पर्यावरणाला बरीचशी मदत होईल व ते काम आपण मानवानेच करायचे आहे, कारण पशुपक्षी हे मानवापेक्षा खुप निर्मळ शुद्ध आहेत ते नेहमी पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र त्यांना हाणी पोहचवण्याचे काम करतो. आपल्या पॉलिथिन पिशव्या मुळे आज कित्येक गुरेढोरे, प्राणी मरतात आपण आपलं उरलेसुरले अन्न, भाजीपाला, फळ, किड लागलेले धान्य,कडधान्य पिशव्या पॉलिथिन मधे टाकून बाहेर फेकतो व ते मोकाट ढोर, किंवा जंगली प्राणी ही खातात, पॉलिथिन पचवण्याची जनावरात क्षमता नसल्याने त्या पोटात साचून राहतात व काही दिवसानंतर ती जनावर मरतात. कळत नकळत याला जबाबदार आपणच असतो हे आपण कधी समजूनच घेत नाही, किंवा समजून उमजून आपण टाळतो.
आपल्या परिसरात, रोड, रस्यांवर रिकाम्या प्लाट मधे पिशव्या, भाजीपाला, कपड्याचे पॉलीथीन पिशव्याचे लग्न कार्यात उरलेल्या अन्नाचे, रसवंत्यावरील फळ उसाच्या सालीचे जिकडे तिकडे ढिगारे जमा होऊन घाणीचे साम्राज्य तयार होत आहे. त्यात आपली जबाबदारी म्हणून कोणीही स्वतः च्या घरातील कचरा स्वतः पेटविण्याचे कष्ट घेत नाही जो तो पॉलीथीन पिशव्यात कचरा टाकला, बांधला का जिथे रिकामी
जागा दिसेल तिथे टाकून येतो. पावसाळ्यात आपण रस्त्याने चालत आहोत की उकिरड्यावरून हेच माणसाला समजत नाही अशी आजकाल परिस्थिती झाली आहे. पावसाळा लागला की पिशव्यानी नाल्या गटारी तुडुंब भरून रस्त्याची अवस्था बिकट होते. पॉलीथीन पिशव्या पेटवल्या नंतर लगेच वितळणाऱ्या असते परंतु पाच मिनिटे पेटवण्यासाठी माणसाजवळ वेळ नसतो. म्हणजेच गाव तालुका शहराकडे ही माणूस ते आपलं काम नाही या दृष्टीकोनातून पाहू लागला, कुठले साथीचे आजार पसरले की तेव्हा तात्पुरता समाज,ग्रामपंचायत नगरपालिका वाले जागे होतात. हेच जिकडे तिकडे पहायला मिळते. समाज धोरण स्वच्छता अभियान नावाला उरले. आपण एक देशाचा नागरिक म्हणून वनसंवर्धनाची प्रत्येकाने थोडीफार जबाबदारी घेतली तर देशाला घाणीच्या विळख्यातून आपण सोडवू शकतो. व निसर्गाला या धोकादायक परिस्थितीतून वाचवण्यासाठी माणसाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने वनसंवर्धन दिन साजरा होईल. चला तर आजच्या दिनी वनसंवर्धन करण्याची शपथ घेवूया .
व देशाचा नागरिक म्हणून कार्यास सुरवात करूया….
नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम















