
प्रदूषण म्हणजे पर्यावरणात हानिकारक पदार्थ, ऊर्जा किंवा दूषित घटक अशा प्रकारे सोडल्यास सजीव, नैसर्गिक जीव प्राणी मात्राच्या आरोग्यास हानी पोहचविणे होय. जेव्हा एखादी गोष्ट निसर्ग शोषून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्तची सोडली जाते तेव्हा प्रदूषण होते. जसे प्लास्टिकचे विघटन होत नाही.
प्रदूषणाचे प्रकार
प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत जसे वायू प्रदूषण, ज्यात वाहनांचा धूर, कारखान्यातील उत्सर्जन, इंधन जाळणे, वणवा लागणे. यात धूर, धूळ आणि हानिकारक वायू यांचा समावेश होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, हृदयरोग, हवामान बदलामुळे साथीचे रोग होतात.
जेव्हा रसायने, सांडपाणी, प्लास्टिक किंवा औद्योगिक क्षेत्रातील कचरा नद्या, तलाव, समुद्र, भूगर्भातील पाण्यात मिसळतो तेव्हा जलप्रदूषण
होते. जलप्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची
असुरक्षितात निर्माण होते. जलचर प्राण्यांना हानी पोहोचते.
अयोग्य कचरा विल्हेवाटीमुळे कीटकनाशके, औद्योगिक रसायने, खाणकाम यामुळे जमिनीवर प्रदूषण होते. त्याचा परिणाम शेतीची सुपीकता कमी होते. पिकावरील किड, कीटकनाशक औषधे फवारणीमुळे पिकांचे प्रदूषण होऊन आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
वाहतुकीचा आवाज, बांधकामाचा आवाज, कारखान्यातील मशीनरीचा आवाज, मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे होणारा अतिरिक्त आवाज, ही सर्व ध्वनी होय. त्याचा परिणाम ताणतणाव, श्रवण शक्ती कमी होणे, झोपेला व्यत्यय येते त्यामुळे कामाची गुणवत्ता घटते.
रात्रीच्या वेळेचा अतिरिक्त कृत्रिम प्रकाश डोळ्यांवर पडल्यास झोपेला व्यत्यय येतो. वन्यजीव प्राण्यांना त्रास होतो. औद्योगिक कारखाने, वाहतूक, वाहनातून होणारे उत्सर्जन, शेतीतील रसायने खते, अयोग्य कचरा व्यवस्थापन, जंगलतोड शहरीकरण इत्यादी कारणाने प्रदूषण होते.
प्रदूषणावर उपाय योजना
आपल्याला पर्यावरणाचा होणारा ह्रास व त्यावरील उपाय याची माहीती पर्यावरण तज्ञ देत असतात. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धडपडणारे आपण नेहमी पाहतो. भविष्यातील धोक्यांची जाणीव झाली की उपाययोजना आठवतात. पर्यावरण संरक्षणाबाबत काम करणाऱ्या संस्थाचे कार्य आपल्या पर्यंत अनेकदा पोहचत नाही. संवाद साधल्यास काही समविचारी मंडळी भेटतील व त्यांच्या सहकार्याने आपणही हे कार्य पुढे चालवू शकतो. कारण सर्वाच्या योगदानानेच आपण यशस्विपणे आपल्या उद्दीष्टाप्रत पोहचू शकतो.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अशा कामांमध्ये गरजवंताला मदत करू शकतो. हा विषय काही नविन नाही. जगामध्ये पाण्यासाठी संघर्ष झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. भगवान गौतम बुद्ध रोहिणी नदीच्या पाण्यासाठी लढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यासाठी लढले. शिवाजी महाराजांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, शिवकालीन तलाव याची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा पाणी जीरवा’ हा उपक्रम शिवाजी महाराजांनी त्या काळात राबविला होता. परंतू आपण लोकवर्गणी व सरकारी सहाय्याद्वारे अशा गोष्टी साध्य करु शकतो. महाराष्ट्रात अण्णा हजारे व राजस्थान मध्ये राजेंद्र सिंह यांनी या बाबतीत आदर्श घालून दिलेले आहेत. मात्र यासाठी तिव्र इच्छाशक्ती व लोकांना आपल्या कार्याचे महत्व समजावून देण्याची चिकाटी कार्यकर्त्यांकडे असणे आवश्यक आहे.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. खुपच उष्ण आणि कंटाळवाणं उन्हाळ्याचे दोन एप्रिल व मे महीने कसे पार पडायचे असा प्रश्न पडतोय, गेल्या काही वर्षात उन्हाळा फारच तिव्र वाटतोय. आणि हे आपल्या कडेच नाही तर सर्व जगभरात हाच अनुभव आहे. गेल्या काही वर्षात जागतिक तापमानात वाढ झाली आहे. यालाच ‘ग्लोबल वार्मिंग’ असं म्हणतात. जगात पर्यावरण विषयक काम करणाऱ्या सर्व संस्थांनी हे फारच गंभीर पणे घेणे आवश्यक आहे.
तापमान वाढीचे परिणाम फार गंभीर होतात. पृथ्वीवरील जीवसृष्टीवर याचे मुलगामी परिणाम होतात. कित्येक जीव जातींच अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. एके काळी पृथ्वीवर राज्य असणारे ‘डायनोसोर’ तापमान बदलामुळे नष्ट झाले आहेत. तिव्र उन्हाळ्यामुळे बाहेर फिरणं, प्रवास करणं, काम करणं आपल्याला अशक्य होत आहे.
यावर काही सोपे उपाय आहेत, काही थोडे कठीण आहेत. काही सवयी आपल्याला बदलाव्या लागतात. पण अशक्य काहीच नाही. अर्थात आपण केलेल्या उपाय योजनांनी लगेच परिस्थीतीत फरक पडेल असं नाही. कारण जागतीक पातळीवर पाहिल्यास आपला गाव, तालुका, जिल्हा हे अतिशय क्षुल्लक आहेत. म्हणून आपण काहीच करायचं नाही का? सुरुवात आपल्या पासूनच केली पाहिजे. आज आपण काही केलं नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
सर्वात प्रथम असलेली वृक्षसंपदा वाचविली पाहिजे, वेगाने वाढणारी झाडे लावणे, जोपासणे, फळझाडे व औषधी तसेच फुलझाडे लावण्यास प्रोत्साहन देणे ज्यामुळे जनतेला उत्पन्न मिळेल, तसेच जंगलावर विसंबून राहणे कमी होईल व जंगलांचं रक्षण होईल. अनधिकृत जंगलतोड व शिकार यासाठी मोठ्या प्रमाणावर वणवे लावले जातात यामध्ये जंगलातील वृक्ष नष्ट होतात, वन्यजीव व इतर वनसंपत्तीचे अतोनात नुकसान होते. शिवाय वणव्यात कित्येक किलोमिटरचा परिसर आगीच्या भक्षस्थानी पडतो. आगीचा धूर आकाशात पसरतो, उष्णताही प्रचंड प्रमाणात वाढते. अशा गोष्टीं विषयी जनते मध्ये जागृती निर्माण करण आवश्यक असते. शहरांतील जनतेला सर्वात जास्त ऑक्सीजन वातावरणाला पुरवणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीची जास्तीत जास्त लागवड करण्यास प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे.
औद्योगीक प्रगतीद्वारे परप्रांतीय कामगारांच्या रुपाने लोक संख्यावाढ, यामुळे पाण्याचा वापर वाढतच चालला आहे. पुर्वी ज्या विहीरी गावाला पाणी पुरवायच्या त्या मार्च मध्येच कोरड्या पडू लागतात. आपण बोरवेल खणून 200-300 फुटावरून पाणी उपसायला लागलो, शेती साठी काही शेतकरी 24 तास पंप चालवतात त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाणरच. याउलट वृक्षतोडी, डोंगरांचे सपाटीकरण, बेसुमार बांधकामे, गावतळी, विहीरी बुजवणे अशा मार्गाने आपण पाण्याचे भूगर्भात जाण्याचे मार्ग नष्ट करुन टाकले आहेत. पाऊस अनियमीत कोसळतो कधी कधी अर्ध्या मोसमाचा पाऊस काही दिवसांत धो धो पडतो आणि समुद्रात वाहून जातो, तीकडे पाण्याला जायला मार्ग नाही, मुंबई जलमय झाली होती हे आपण जुलै 2005 च्या अतिवृष्टीमुळे पाहिले आहे.
काही ठिकाणी सांडपाण्याचा पुर्नवापर होणे आवश्यक आहे. कारखान्यांनी त्यांच वापरलेल पाणी नदी नाल्यात न सोडता त्याचा पुर्नवापर करणं किंवा वनराई वाढवणं यासाठी त्या पाण्याचा वापर करणं बंधनकारक केल पाहीजे. घरगुती सांडपाण्यावर देखील काही झाड तरी जगली पाहीजेत. जे पाणी आपण वापरतो ते पेयजल आहे. पृथ्वीवर 30 टक्के जमीन व 70 टक्के पाणी आहे, परंतू पेयजल अवघ 2.5 टक्के आहे. बाकी पाणी समुद्रात आहे पण ते खारं आहे. म्हणजे पेयजलाला मर्यादा नक्कीच आहे हे आपण समजू शकतो. यापुढे जास्तीत जास्त ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवण अत्यंत आवश्यक आहे. ज्यायोगे पाण्याची पातळी वाढू शकेल तसेच हवेतील आर्द्रता वाढून हवामान वृक्षवाढीसाठी योग्य राहून जंगल वाढेल पर्यायाने पावसाचा अनियमीत पणा कमी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी देखील शेतीसाठी पाण्याचा वापर जपूनच केला पाहीजे पुर्वीची अनिर्बंध पाणी वापरण्याची सवय सोडणच इष्ट होईल.
वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी वाहनांचा आवश्यक तेवढाच वापर, कारखान्यांनी उत्सर्जनावर व उर्जेच्या वापरावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी आवश्यक आहे. कुठल्याही इंधनाच्या ज्वलनाने उष्णता बाहेर फेकली जाते व जागतीक तापमान वाढीस लागते.
हिंदू धर्मात होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश व सगुण प्रवृत्तीचा जय मानतात. म्हणून होळी पेटवून आपल्या मनातील वाईट प्रवृत्तींना अग्नीत जाळून टाकावे. होळीच्या दिवशी आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकून आपापसात प्रेमभाव, एकोपा, आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. होळी साजरी करण्यासाठी करण्यात येत असेलेली अकारण वृक्षतोड आपण सर्वांनी थांबवली पाहिजे. वृक्षाचे महत्व आपल्या सर्वांना माहीत आहे. वाढलेले झाड तोडायला वेळ लागत नाही पण लावलेले झाड वाढायला खूप वेळ लागतो.
परंतु आपणास बाजारात विक्रीस उपलब्ध असलेले रंग जास्त भावतात. पण हे भुरळ पाडणारे रासायनिक रंग खरेदी करताना जरा विचार करायला हवा. या रंगामध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रंगामुळे डोळ्यांचे आजार, श्वसनाचे विकार, अंगाला खाज येणे, त्वचेची आग होणे, जळजळ होणे, पुरळ उठणे यासारख्या समस्या जाणवतात. याचेही भान ठेवायला हवे. होळीच्या वेळी फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूमध्ये पळसाने चांगला फुलोर धरलेला असतो आणि आणि त्याची रंगीत फुले रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी स्वागत करतांना दिसतात. रस्त्यावर पळस फुलांची छान तप्त केशरी रंगांची मखमल अंथरलेली दिसते. रंगीत फुलांनी नटलेली पळसाची झाडे आकाशाला मुजराच घालताना दिसतात. त्यामुळे निळ्याशार आकाशाचे सौंदर्य ही अधिकच खुललेले दिसते. त्यापासून आपण आनंद मिळवावा. निसर्गाच्या अतुलनीय सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. त्याचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग करून घेऊ घाव्या.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी कल्याण















