
तुझ्या माझ्या डोळ्यात मित्रा
एकच स्वप्न पक्क दिसावं
सृष्टीच्या हरितमय रक्षणाचे
प्रत्येकाचे ब्रीद असावं
एक तरी झाड लाव मित्रा
चिमण्या पाखरांसाठी
काडी काडी जमवून
घरट बांधण्यासाठी
अंगणातील दाणे टिपून
घरट्यात सुखाने निजण्यासाठी
तू एक तरी झाड लाव मित्रा
सायंकाळच्या मैत्र कट्ट्यावर
आजीआजोबांना बसण्यासाठी
मनात जपलेलं हितगुज
सुखदुःखाच्या कहाण्या सांगण्यासाठी
एक तरी झाड लाव मित्रा
सहा ऋतूंचे ऋतुचक्र फिरताना
सण वार व्रत वैकल्य पूजेसाठी
झोके झाडाला टांगून
माहेरवाशिणीना झुलण्यासाठी
एक तरी झाड लाव मित्रा
वाटेचे वाटसरू येतील
घडीभर विश्रांती घेतील
झाडाची पानं चवऱ्या ढाळतील
अलगद निज पापण्यावर राज्य करील
तू एक तरी झाड लाव मित्रा
बाळ गोपाळ आनंदाने फेर धरतील
सावलीत बसून सागरगोटे खेळतील
लपाछपीचा डाव रंगात येईल
तू लावलेल्या झाडालाही आनंद होईल
त्या आनंदासाठी एक तरी झाड लाव मित्रा
पहाट वेळी पाखरांचा किलबिलाट ऐकून
साखर झोपेतून अलवार जागा होशील
वसुंधरेचे हिरवे स्पंदन तुझ्या श्वासात येईल
सृष्टीच्या कणाकणातला आनंद तू भरभरून घेशील
स्वतःच्या आनंदासाठी तू एक तरी झाड लाव मित्रा
करोना काळात झालेले हाल आठव
मृत्यूचे ते तांडव विसरता येत नाही
ऑक्सीजन साठी झालेली तडफड
अंत्यसंस्कारालाही जवळचे नाही
ऑक्सीजन साठी तरी
तू एक तरी झाड लाव मित्रा
सौ. वंदना शशिकांत पाटील















