९ जानेवारी ला रिंगण सोहळा-२० डिसेंबर पासून यात्रेला सुरवात
जिल्हा परिषद, पंचायत समिती व पोलीस प्रशासनावर विशेष जबाबदारी
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – सातपुड्याच्या कुशीत असणारी बहिरम बाबा यात्रा महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण देशात प्रसिध्द आहे. अनेकांचे कुलदैवत असलेले बहिरमबाबांचे मंदिर सातपुड्याच्या कुशीत आहे. अनेक जण आपले नवस फेडण्याकरिता बहिरम यात्रेत येतात. यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असली तरीही खरी यात्रा ही पौष महिन्यातच भरते आणि त्यातही सुटीच्या दिवशी या यात्रेला अधिकच रंगत चढते. दरवर्षी यात्रेत आकाश पाळणे, टुरिंंग टॉकीज, नक्षीदार मातीच्या माठांची दुकाने, रेवड्या, फुटाण्यांसह खेळणी, कपडे तसेच अनेक गृहोपयोगी नाविण्यपूर्ण वस्तुंची दुकाने लागतात. यामुळे यात्रेत मोठी रेलचेल असते. येथील हंडीचे मटण प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही यात्रा सुटीच्या दिवशी अधिकच रंगून येते.२० डिसेंबर २०२३ पासून यात्रेला सुरवात होणार असून ३१ जानेवारी २०२४ पर्यन्त असणार आहे.महाराष्ट्रामध्ये सर्वात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्हणजे बहिरम यात्रा ज्यामध्ये यात्रेतील साफसफाई, दुकानांच्या जागेचे नियोजन,विजेची व्यवस्था इ.बहिरम यात्रेमध्ये स्वच्छतागृह असले तरी ते खूप जुने असल्यामुळे ते मोडकळीस आले आहे. त्यामुळे अद्यावत सुविधेसह कायमस्वरूपी शौचालयाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे या यात्रेमध्ये असणे आवश्यक आहे. यात्रा काळात महिलांकरिता मोबाईल टॉयलेट,पोलिस चौकी इमारत, मानवी दवाखाना, यात्रा अधीक्षक कार्यालयाची इमारत होणे आवश्यक असून त्यासाठी कायमस्वरूपी देखभालीकरिता कर्मचारी सुद्धा या बहिरम यात्रेमध्ये असणे आवश्यक असले तरी याकडे जिल्हा परिषद तथा पंचायत समिती मात्र लक्ष देत नसल्याची चर्चा भाविक भक्त व परिसरातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
यात्रेमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे.
श्री.बहिरम बाबा संस्थान व श्री.गुणवंत बाबा संस्थान,लाखनवाडी यांच्या प्रेरणेतून ह.भ.प.संजय महाराज अलोने(श्री क्षेत्र आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३ ते १० जानेवारी या दरम्यान शिवमहापुरान व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.याच आयोजनदरम्यान दि.९ जानेवारीला भव्य दिव्य असा रिंगण सोहळा भरणार आहे.पंढरपूरच्या वारीतील मुख्य आकर्षण असलेला रिंगण सोहळा नेत्र दीपक असतो.या रिंगण सोहळ्याला माऊलीच्या पालखीचे कर्नाटक राज्यातील अंकली गावचे शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व येणार आहेत.
तसेच ३ ते १० जानेवारी दरम्यान कीर्तन महोत्सव सुद्धा होणार आहेत.या महोत्सवामध्ये पंढरपूर तथा आळंदी येथील प्रख्यात किर्तनकार येणार आहेत.तसेच आळंदी येथील गायक व वादक मंडळी येणार आहेत.या सर्व आयोजनामुळे जणू काही बहिरम यात्रेला पंढरीच अवतरणार आहे.
प्रतिक्रिया :- यात्रेमध्ये सर्व मुख्य जागी सी सी टीव्ही द्वारे लक्ष ठेवून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येईल.यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी दैवीय पूजनाचा लाभ घ्यावा व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.पोलीस प्रशासनाने यात्रेकरिता सर्वव्यापक तयारी केलेली असुन पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गैरव्यवहारात व नियमांचे उल्लंघन करणारे विरूध्द कार्यवाही करण्यात येईल.
प्रवीण वेरुळकर ठाणेदार, पो.स्टेशन,शि.कसबा
प्रतिक्रिया- यात्रेचे पूर्ण नियोजन जिल्हा परिषद चे आहे व पंचायत समिती ही कार्यकारी यंत्रणा आहे.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.सातंगे यात्रा समन्वक आहेत व त्यांचे मार्फत यात्रे वर लक्ष दिल्या जाते.आज पर्यंत यात्रा दरवर्षी नियमीत रित्या भरविली जात असल्याने आज पर्यत जि.प.कडुन प्राप्त निधिच्या उपलब्धते नुसार सोयी सुविधा पुरविल्या जातात.यामध्ये इतर विकासाची व अधिक सोयी पुरविण्याच्या दृष्टीने नविन कामे प्रस्तावित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
मोहन शृंगारे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चां. बाजार

