
महिला धोरणावर जास्तवेळ चर्चा झाली पाहिजे
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज
नागपूर-दि.८ :- देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात विधानपरिषद शतक महोत्सव साजरा होत असताना सभागृह पूर्ण क्षमतेने भरलेले असावे,विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचाकोटा लवकरात लवकर भरण्यात यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्मंत्र्यांकडे केली.
नागपूर येथे महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री. चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधान भवन सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेने गत शंभर वर्षाच्या कालकसोटीवर आपली उपयुक्तता आणि महत्व सिध्द केले आहे. विधान परिषदेच्या सभागृहाचा मोठा इतिहास आहे. लोकांमधून निवडून येणारे प्रतिनिधी लोकांचे प्रश्न मांडतील पण असे अनेक घटक या राज्यात आहेत की ज्यांचे प्रश्न सभागृहा पुढे मांडले जात नाही याबाबत खंत वाटते. साहित्य, संस्कृती, कला, समाजकारण या क्षेत्रांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावे यासाठी राज्यपाल नियुक्त कोठा तयार करण्यात आला. तो लवकरात लवकर भरण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. महिला धोरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले आधी महिला धोरणावर सविस्तर आणि जास्तीत जास्त वेळ चर्चा व्हायची. याप्रमाणे आताच्या परिस्थितीतही महिला सक्षमकरणासाठी महिला धोरणावर अधिक वेळ चर्चा झाली पाहिजे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी जेव्हा परिषदेच्या सभागृहात आलो होतो तेव्हाचा काळ आणि आताच प्रचंड बदलला आहे. तेव्हाचा काळ आता आठवायला लागतो. या सभागृहात बोलायला वाव असतो असे असताना सर्व प्रतिनिधी जबाबदारीने बोलायचे. अनेकजण संघर्ष करून या सभागृहात येतात. मागच्या दाराने येणाऱ्यांनी घर नीट सांभाळलं तर पुढच्या दाराने प्रवेश मिळतो. भारताच्या संसदीय वाटचालीत लोकहिताचे प्रभावी कायदे मंजूर करून ते राबविण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या या संस्मरणीय वाटचालीस मी वंदन करतो असे म्हणत वडेट्टीवार यांनी विधिमंडळातील सर्व सदस्यांना विधानपरिषद शतकमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.














