आ. जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम, शेकडो युवकांनी केले रक्तदान
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिंनिधी
चंद्रपुर
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कर्तव्य सेतु केंद्राला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र नि:शुल्क तयार करण्याच्या हेतूने आपण हे सेतू केंद्र सुरु केले होते. आज या सेतू केंद्राच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना निराधार, श्रावणबाळ प्रमाणपत्र काढून दिले आहे. याचे वाटप करतांना आनंद होत आहे. हे सेतू केंद्र सुरु करण्याच्या मागचा उद्दिष्ट पुर्ण झाल्याचे समाधान असून हे कर्तव्य सेतु केंद्र वयोवृद्ध आणि निराधारांचा आधार ठरले असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त निराधार प्रमाणपत्र राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चिपळून मतदार संघाचे आमदार शेखर निकम, नायब तहसीलदार राजू धांडे, माता महाकाली महोत्सव समीतीचे उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, डॉ. हर्षवर्धन दिक्षीत, राजेंद्र सूर्यवंशी, कल्याणी किशोर जोरगेवार, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, वयोवृध्द आणि विधवा महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र माहिती अभावी किंव्हा शासकीय दिंरगाईमुळे या योजनेंपासून त्यांना वंचित राहावे लागते. योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर अनेकांची आर्थिक फसवणुकही झाली आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा महिलांसाठी आपल्या कार्यालयात आपण कर्तव्य सेतु केंद्र सुरु केले. या सेतुच्या माध्यमातून आपण विविध योजनांची जनजागृती करत पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क कागदपत्र तयार करुन देत योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरु केले होते. यामाध्यमातून शेकडो महिलांना आपण निराधार प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजनेचे प्रमाणत्र, , उत्पन्न प्रमाणपत्र, यासह अनेक महत्वाचे कागदपत्र नि:शुल्क उपलब्ध करुन दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपल्या हक्काच्या या सेतू केंद्राचा आपण लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
किशोर जोरगेवार यांची जनतेशी नाळ – आ. शेखर निकम
आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आलो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेल्या गर्दीतून ते लोकाभिमुख नेते आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून जनता आणि त्यांच्यामधील नाते बळकट केले आहे. अनेक जनउपयोगी उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या याच कार्यामुळे ते अपक्ष म्हणून येवढ्या मोठ्या मतदार धिक्याने निवडुन आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांना निराधार प्रमाणपत्राचे व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शेडको लाभार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जिवणकर यांनी केले.
विविध धर्मीय धार्मिक स्थळी प्रार्थना
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील विविध धर्मिय धार्मिक स्थळी, प्रार्थना, वंदन, पुजा, महाप्रसाद आणि आरती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील मस्जिद, चर्च, दिक्षाभुमी, गुरुद्वारा आणि मंदिर येथे सदर कार्यक्रम पार पडलेत. यावेळी मंदिरांमध्ये महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शेकडो युवकांनी केले रक्तदान
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या युवा आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत आमदार किशोर जोरगेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्थानक परिसरात आटो संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 30 वर्षांपासून आटो चालवीत आपल्या परिवाराचा उदरर्निवाह करत असलेल्या आटो चालकांचा सेवा सार्थी म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाबपूठे येथील वॉटर फिल्टरचे ही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यासह विविध सामाजिक कार्यक्रम पार पडलेत.

