ग्राहकांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून घेतली तर फसवणूक टाळता येणे सहज शक्य आहे:-तहसिलदार संदिप पानमंद
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
ग्राहकांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून घेतली तर फसवणूक टाळता येणे सहज शक्य आहे,असे मत तहसिलदार संदिप पानमंद यांनी ग्राहक जागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना व्यक्त केले.
तहसील प्रशासन सिंदेवाही आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमाला सिंदेवाही येथील तहसिलदार संदिप पानमंद हे अध्यक्षस्थानी होते तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे आणि सोमेश्वरजी पाकवार , सिंदेवाही तालुका अध्यक्ष हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि श्री.लोखंडे पुरवठा अधिकारी सिंदेवाही हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
ग्राहक म्हणजे काय?त्याची व्याप्ती ,त्याची अडचण आणि कुठेतरी फसवणूक, अडवणूक, व शोषण झाल्याशिवाय आपल्या अधिकारांची जाणीव करून घ्यावी असे न वाटल्याने ग्राहक नागवला जातो आणि म्हणूनच ग्राहक शिक्षणाची आणि पर्यायाने अशा सोहळ्याचे आयोजन करण्याची गरज भासते, असे स्पष्ट मत व्यक्त करताना,या कार्यक्रमांचे आयोजन हे जनतेमध्ये प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केले जावे आणि जनतेला ग्राहक कायद्याची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती मिळाली तरच या आयोजनाचा खरा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन दीपक देशपांडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले.
ग्राहक संरक्षण कायदा हा जनतेचा हितरक्षणासाठी तयार करून तो लागू करण्यात आला आहे , त्यामुळे या कायद्यात काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे असे मत सोमेश्वरजी पाकवार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री.यादव , सहायक पुरवठा अधिकारी सिंदेवाही यांनी केले ,या कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे कर्मचारी, तालुक्यातील राशन दूकानदार , व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

