‘बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते’अभियानाचा शुभारंभ
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिंनिधी
चंद्रपुर
चंद्रपूर दि. 4 : गावागावातील पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जिल्ह्यातील शेतकरी समृध्द करायचा असेल तर शेतीची अवजारे, बी-बियाणे व इतर कृषी निविष्ठा ने-आण करण्यासाठी पाणंद रस्त्यांची नितांत आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी या रस्त्यांचे विशेष महत्त्व आहे. याचीच जाणीव ठेवून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यादृष्टीने पहिले पाऊल टाकत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषी महोत्सवात ‘बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 5001 कि.मी. चे शेतपाणंद रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मातीकाम पूर्ण झालेले 2055 कि.मी. चे रस्ते, मातीकाम सुरू असलेले 405 कि.मी. चे रस्ते आणि नव्याने प्रस्तावित 3182 कि.मी.चे मुरमीकरणाचे शेतपाणंद रस्ते आणि मुरमीकरण झालेले परंतु खडीकरण बाकी असलेले इतर रस्ते सुरू करण्यात येतील. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतकऱ्यांना त्यांना शेतावर जाण्या-येण्यासाठी बारमाही सुसज्ज असे रस्ते उपलब्ध होणार आहे. यातून शेतकऱ्यांना शेतातील माल बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य होणार आहे.
पाणंद रस्त्याची सुविधा निर्माण झाल्यावर जिल्ह्यातील शेतकरी, बाजारात मागणी असलेले उत्पादन आपल्या शेतात पिकविण्याचा प्रयत्न करणार असून यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण होण्यास मदत होईल. बळीराजा समृद्धी मार्ग शेत पाणंद रस्ते अभियानाची प्राधान्याने अंमलबजावणी करून पावसाळ्यापूर्वी शेताकडे जाणारे रस्ते तयार करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

