कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील रुपेश धर्मराव मेश्राम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्ह्याच्या वतीने नागपूर येथेसुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष बंडू राऊत होते, तर उदघाटक प्रदेश उपाध्यक्ष श्याम आस्करकर होते आणि प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ विभागीय अध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रभाकर फुलबांधे, पुंडलीकराव केळझरकर, पूर्व महिला अध्यक्ष हीराताई बोरकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थित सामजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला. रुपेश मेश्राम यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ते नेहमी गरजू लोकांच्या मदतीला धावून जात असतात. गरजू व गरीब लोकांना मोफत उपचार मिळावा यासाठी ते सदैव तत्पर असतात. कोरोना काळातसुद्धा त्यांनी गरजूंना मदत केली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळवून देणे, रुग्णांना मोफत औषधी मिळवून देणे व याकरिता रुपेश मेश्राम सातत्याने प्रामाणिक काम करून गरजूंना मदत करत असतात. तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडावे, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून सातत्याने ते विविध उपक्रम घेत असतात. ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण करून ते नेहमी मदत करतात. रुपेश मेश्राम यांनी कमी कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. म्हणून विविध संघटनेतर्फे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सत्काराबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमाकांत लोधे, माजी सरपंच सदाशिवराव मेश्राम, पत्रकार दिलीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मेश्राम, पत्रकार कपिल मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
यावेळी रुपेश मेश्राम म्हणाले, पुरस्कार म्हणजे जनतेनी दिलेली कामाची पावती असते. चांगले काम केल्यास जनता देखील त्याची दखल घेतात. एखादा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्तकर्त्याची जबाबदारी वाढत असते. त्यातून अधिक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. आजवर अनेक पुरस्कार मिळाले, पण महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मिळालेला पुरस्कार हा निश्चितच सकारात्मक काम करण्याची ऊर्जा देणारा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

