दिवाकर पेंदाम यांचा पंधरा वर्षा पासून अविरत सामाजिक उपक्रम
गडचिरोली – आदिवासी स्वायत्त परिषद यांच्या विद्यमाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरातील परिसरात महाशिवरात्री निमित्त तिन दिवस निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते. मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते.
यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची साधने येथे लावली जातात. त्यामुळे, यात्रेकरूंची जेवणाची गैरसोय होत असते, करिता यात्रेदरम्यान भाविकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी दहा वाजता पासून ते रात्रौ अकरा वाजता पर्यंत, अशी तीन दिवस हजारो यात्रेकरूंसाठी निःशुल्क भोजन वितरण व शुद्ध पाण्याची व्यवस्था दिवाकर पेंदाम यांच्या वतीने करण्यात आली. मागील पंधरा वर्षा पासून दिवाकर पेंदाम हे मार्कंडा येथे निःशुल्क भोजन वितरण करून, अविरत सेवा करीत आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिवाकर पेंदाम, राहुल पेंढारकर, टिना उराडे, सुखदेव कंन्नाके, रामचंद्र कातंगे, रवी मसराम, गोवर्धन कुंभारे, प्रशांत भागात, माधव बोरकुटे आदि पदाधीकार्यांनी परिश्रम घेतला.

