prabodhini news logo
Home लेख लेख; बाबा, नाही का हो वाटत कधी तरी चुकल्यासारखं ?

लेख; बाबा, नाही का हो वाटत कधी तरी चुकल्यासारखं ?

0
195

लेखिका
Pk.मुक्ता आगडे
चंद्रपूर, मूल

वडील , घराचा खांब जसा पाठीचा कणा . बाप सर्वांच्या सुखाचा विचार करून स्वतःच संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा देव माणूस . प्रत्येक मुलींसाठी तिचा सुपरहिरो . कधी कुणाला समजणार नाही अशी एक पहेलि. बोलेल तेवढं कमी . भारत हा स्वतंत्र देश असला तरीही भारतात लोकतंत्र असले तरीही तो अजूनही पुरुषप्रधानच देश आहे . आता काही म्हणतील ही की नाही हल्ली खूप काही बदलेला आहे , आता स्त्रिया कुठल्या कुठे गेल्या आणि तुम्ही अजूनही हे असे विचार लिहिताय , तर त्याच उत्तर तुम्हाला पुढे वाचनात मिळेलच . वाचतांना कुणाच्या भावना दुखल्या जाणार नाही या गोष्टींचा मी पूर्णपणे भान ठेवेल पण तरीही दुखावल्याच जरी भावना तर मला माफ करावे . पण मला आज मोकळं बोलायचंच आहे , बहुतेक मलाच नाही तर इथल्या सर्वच मुलींना हे बोलायचं आहे , माहीत नाही कित्तेक मुलींना हे विचार येतही असतील आणि कुणाजवळ बोलू , कस बोलू म्हणून स्वतःच्या जीवाची होळी जाळतही असतील .
बाबा , वडील , पप्पा , डॅडी , तर साधारण भाषेत बाप …. कित्तेक नाव आहेत त्या देवाला , हो देवालाच ….! मुलीला जन्माला घालतो , आपल्या रक्ताचं पाणी करून तिला काय हवं काय नको ते बघतो , सगळ्या गरजा पूर्ण करतो , वाटेल ते कष्ट करतो तिच्या भविष्यासाठी , तिच्या आजारपणात त्या बापाचे थकलेले डोळे न झोपता ताणून धरतो , संपूर्ण आयुष्य भर फक्त तिच्या आयुष्यात येणाऱ्या त्या एका दिवसासाठी त्या घामाच्या थेंबाच सोनं करतो . तिला खरचटलं जरी तरी आई सारख दाखवत नाही पण बाजूला कोपऱ्यात जाऊन हळूच डोळे पुसतो , म्हणतात की, “बापाचं प्रेम दिसत नाही पण त्याच्या एवढं प्रेम जगात कुणाचं करत नाही”. आणि ते दगडावर कोरलेलं सत्य आहे . ” जशी आईची माया कुणी देऊ शकत नाही तशीच बापाची सर कुणीही पूर्ण करू शकत नाही”. हे सर्वांना माहीतच आहे . सर्वच बाबा, वडील , पप्पा , बाप या विषयावर लिहितात . आणि जगात सर्वात जास्त या विषयावर लिहिल ही गेलं पाहिजेत .
पण , वडील चुकतात का ……? किव्वा , वडील ही कधीतरी चुकतात ……! या विषयी मात्र कुणी बोलत नाही , अरे अस कस , बोलतात ना …..”मुली बोलतात पण ते ही फक्त आपल्या मनात ” . आता तुम्ही म्हणाल की हे काय बोलणं ? वडील कधी चुकीचे नसतात , सगळं जग चुकू शकत पण एक वडील एक आई कधी चुकू शकत नाही . पण , मी आणि कित्येक मुली या मताशी सहमत नाही . आदर ….. हो आदर आहेच त्या व्यक्ती विषयी पण आज बोलायचंच आहे … इथं प्रत्येक वडिलांना त्यांची चूक सांगायची आहे . मान्य आहे मला की , एवढी मोठी नाही झालेली मी की तुम्हा बापांना तुमच्या चुका दाखवेल , पण नाही आज तुमचीच ही हट्टी मुलगी तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मागूनच थांबणार आहे .
बाबा (प्रत्येक बापाला उद्देशून ) , तुम्हाला नाही का हो वाटत कधी की ,तुम्ही कधी चूकलेय . हो वाटलं असेल ना , पण कधी जेव्हा मुलीने त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केले तेव्हाच … का मी हिला जन्माला घातल ? हो ना ? फक्त त्या एका वेळी तुम्हाला वाटत असेल ना की आपण चुकी केली ? …. असो या बद्दल नन्तर बोलूच पुढे .
वरील सगळं सोडलं तर त्या व्यतिरिक्ततुम्ही कुठं चुकता बाबा माहीत आहे का ? तुमची पहिली चूक माहीत आहे का कुठे होते, ज्या वेळी मुलीला तळहाताच्या फोड्याप्रमाणे वागवतात तेव्हा . का ? का बरं अस ? तिला पण मुलाप्रमाणे सगळ्या बेड्या तोडून , बालपणापासून लोखंडासारखे वागवा ना .. का तिला लहानपणापासून जाणीव करून देता की ती नाजूक आहे ती कमजोर आहे . त्यांनतर पुन्हा एक चूक , आणि बहुतेक तुमची हीच चूक तिच्या पूर्ण आयुष्याची राख रांगोळी करत असावी . तुम्ही नेहमी तिला चांगल्या गोष्टी शिकवता . नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टीच शिकविण्याचा तुमचा ध्यास असतो . समोरचा काहीही वागला तरीही आपण समोरच्या सारखं वागायचं नाही , नाहीतर त्याच्यात आणि आपल्यात काय अंतर राहील ? म्हणून समोरचा कसा ही वागला तरीही आपण नेहमी चांगलाच वागायचं आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा भोगून द्यावी लागते , देव सगळं बघत असतो , तो बरोबर न्याय करतो , उसके घर देर है अंधेर नही, आपण फक्त चांगल्या मार्गावर चालत राहायचं …… बाबा , बहुतेक हीच तुमची शिकवण त्या कित्येक करोडो मुलींच्या दुःखाच कारण असेल . कोण मुलगी तुम्हाला बोलून नाही दाखवणार हो , पण त्या कित्येक मुली कधी ना कधी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणार मात्र तुम्हाला दोष देत असतीलच . असतीलच नाही तर देतातच …..
सांगा ना , सांगा का तुम्ही नेहमी चांगल्याच गोष्टी शिकवता , का नेहमी चांगलचं वागायचं शिकवता , का?… नेहमी चांगल वागणचं गरजेचं आहे का ?.. परिस्थिती बघून वागायचं का शिकवतं नाहीत तुम्ही ? .. का कधी कधी वाईट ही वागावं आणि ते कुठं व कस वागावं हे का शिकवत नाहीत तुम्ही ?.. का गरज असेल तिथं मग ते नातं कोणतंही असू देत उचल तलवार अस का शिकवतं नाहीत ? का सहन करण्यापेक्षा ज्या नात्याने तुझे पाय बांधले त्या दोरीला कापून टाक अस का शिकवत नाहीत ? का , मग ते माहेर असो वा सासर किव्वा असो कुठलेही चक्रव्यूह मग बोल तू जे तुला सहन होत नाही ते अस का तुम्ही शिकवत नाहीत ? तुम्हाला वाटते आपल्या मुलीचे आपण वडील नाही मित्र आहोत , तिला एवढं स्वातंत्र्य दिल आहे की , तिला कधीही काहीही अडचण आली किव्वा काहीही झालं तर ती लगेच येऊन या बापाच्या गळ्यात पडून सांगेल . हो ना ? असंच वाटत ना ? पण बाबा तुम्ही खरंच इथंच चुकता . कोणतीही मुलगी कितीही जरी आपल्या बाबा सोबत मोकळेपणाने बोलत असली तरीही कुठे तरी ती बापाचा विचार करून गप्प सहन करत असते .
माहीत आहे का तुम्हाला तुम्ही कुठं चुकता ? जेव्हा मुलगी तुम्हाला सांगते की , मी अश्या अमुक किव्वा तमुक व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीला न भेटता निर्णय घेण्यात तुम्ही चुकता .. मान्यआहेमला की , हे तुमचं दिलेले आयुष्य आहे . आणि या जीवावर तुमचा पूर्ण हक्क आहे , जीवनदान देण्याचा आणि जीव घेण्याचाही . पण बाबा , जेव्हा मनाप्रमाणे जगायला मिळणार नसेल तर मग त्या जीवनाचा अर्थ तरी काय ? खरं काय आणि खोटं काय हे सिद्ध करता येत नसेल तर मग त्या तुमच्या शिकवणीचा अर्थ तरी काय ? जनावरासारखं मान खाली घालूनच जर आयुष्य काढायचं असेल तर मग बापाने दिलेल्या जन्माचा अर्थ तरी काय ? हो मान्य आहे मला की , आईबाप कधीच चुकत नाही त्यांच्या मुलांच्या भविष्याचे निर्णय घेतांना . हेच म्हणायचं आहे ना तुम्हांला वाचकांनो ? पण खरंच कधी विचारून पाहिलं का तुमच्या मुलीला की ती खुश आहे का ? ती जो आनंद चेहऱ्यावर घेऊन तुमच्या पुढे मागे करते खरच तो आनंद खरा खुरा आहे का ? फोन करून विचारताना मुलीची हालचाल मग कधी तुला काही अडचण तर नाही ना हे विचारून पाहिलं आहात का ? किव्वा एखादी वेळी अचानक तिची खुशाली घ्यायला ती ना सांगता गेला आहात का ? तिच्या मनातील घुसमट तीच आतच कोंडून कोंडून ओरडणार हृदय वाचून बघण्याचा कधी प्रयत्न केला आहात का ?
अजून एक कडू सत्य ते म्हणजे अस की , जेव्हा मुलगी स्वतःच्या मर्जीने लग्न करते तेव्हा आईबाप म्हणतात की , आमचा हिच्याशी काहिही एक संबंध नाही , ती मेली आमच्यासाठी , चूक केली जन्माला घालून , आयुष्यभर कष्ट केले तिच्यासाठी आणि तिने हे दिवस दाखवले वैगरे वैगरे बरेच काही . तर काही आईवडील थोडे वेगळे पद्धतीने , जर मुलगी आई बाबा नाही म्हणतील या भीतीमुळे स्वतःच स्वतःच्या जीवाचं जेव्हा बर वाईट करते तेव्हा , आम्हाला काही माहीत नव्हतं , आणि तिने एकदा सांगून तर बघायला हवं होतं , तिने बोलून तर बघायला हवं होतं , ती म्हणाली असती तिथं आम्ही तीच लग्न लावून दिल असत , आम्हाला काय करायचं होतं ती खुश असती तर आम्ही पण खुश …पण हे कधी , ती कायमची गेल्यावर . तर काही आईबाबा थोडे वेगळे अजून , बर मुलगा बघू कसा आहे आणि नन्तर ठरवू म्हणून समोरच्या प्रक्रिया पार पाडतात आणि मुलीच्या खुशीत स्वतःची खुशी मानून तिच्या मनपसंत जोडीदारासोबत सुखी समाधानाने हात पिवळे करून देतात . पण , पण हे किती टक्के मुलींच्या बाबतीत घडत ? अतिशय कमी … आता काही असे ही बोलणार की , ताई असता जग बदललंय , आता सगळे उच्च शिक्षण घेत आहेत , सगळे शिक्षणामुळे विचारात बदल करून या बाबतीत बदल करत आहेत , मुलींना त्यांचं स्वातंत्र देत आहे . पण वाचकांनो , आपण भारतात राहतो , बाहेर जरी जाऊन परदेशातून शिकून येत असाल तरी भारताच्या विचारप्रणाली नुसार विचार करून बघा . असे मॉर्डन किव्वा मोकळीक देणारे किती आईबाबा आहेत ? भारतात सर्वात जास्त खेडी आहेत , त्यांचे शहर होत आहेत हे भाग वेगळा आहे , खेडोपाडी अजूनही हेच विचार आचरणात आहेत . बहुतांशीच परिवारात ह्या गोष्टींचा बाऊ केला जात नाही . हे काही परिवार वगळता घरोघरी तुम्हाला हेच विचार मिळतील . कितीही स्मार्ट सिटी तयार झाल्या असतील तरीही स्मार्ट विचार अजूनही तयार झालेले नाहीत . आता म्हणाल प्रेमाने पोट भरत नाही , या विधानासह मी पूर्णपणे सहमत आहे . हे वैचारिक दृष्टीने अतिशय खर अस विधान आहे . जीवन जगण्यासाठी नुसतं प्रेम प्रेम करणं , असणंच आवश्यक नाही तर पोट पण आहेच प्रत्येकाला . पण बाबा , अश्या किती गरजा आहेत हो माणसाच्या ? मान्य आहे तुम्ही हवं ते आणून दिल न मागता पुढं ठेवलं . आणि तुम्ही नेहमी हेच बघाल की तुमची मुलगी मोठ्या घरी सुखी समाधानी घरी जावी आणि तिला काही कमी पडू नये . पण बाबा त्या घरात पैसा असेल आणि प्रेमच नसेल तर ? माणुसकी नसेल तर ? माणसाला माणूस समजत नसेल तिथं कुणी तर ? तिच्या डोळ्यात क्षणोक्षणी आसवं असतील तर ? तिला तुमच्या काळजीपोटी बोलता येत नसेल तर? तिला सगळं मिळून ही ( पैश्या संदर्भातील गोष्टी ) पण इज्जतच मिळत नसेल तर ? योग्य ती वागणूक मिळत नसेल तर ? बापाने आयुष्यभर सांभाळलं , त्यांना हे टेन्शन आहे ते आहे , बहिणी आहेत लहान, तर हार्ट च तर बीपी चा तर अमुक तमुक अडचणी आहेत आणि कसं सांगू हा विचार येत असेल तर ? माझा बाप तुटून जाईल मी सांगितलं तर पूर्ण खचून जाईल अस वाटत असेल तर ? सांगा ना बाबा , काय अर्थ आहे मग त्या पैसेवाल्या मुलाच्या पैश्याचा . आणि तुम्ही तिला काही कमी पडू नये म्हणून बघून दिलेल्या नात्याच्या ? बाबा , नाही का वाटत तुम्ही इथं चुकता अस तुम्हाला ? प्रेम असेल तिथं दोघे पण हातभार लावून त्या घराला घरपण आणतात पण प्रेम नसेल ते घर कधी खंडर बनेल हे नाही सांगता येत ना बाबा .
जेव्हा मुलगी पळून जाऊन लग्न करते तेव्हा काही दिवसांनंतर जर तिच्या आयुष्यात दुःखद प्रसंग आलेच किव्वा त्याच्या वैवाहिक जीवनात उलाढाल होत असल्यास तिने आई बाबांना सांगितले तर लगेच ते प्रत्येक आई बाप हेच बोलतात ज्यांच्या ज्यांच्या मुलीने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं . ” स्वतःच्या मर्जीने केलस ना लग्न , आम्हाला विचारलं होतंस का ? मग आता आम्हाला काय सांगतेस ? स्वतः निस्तरायचं ” . का हो , नाही का वाटत की तुम्ही इथं चुकता अस तुम्हाला ? बर ते जाऊद्या , मला सांगा तुम्ही तुमच्या मर्जीने , तुमच्या जबाबदारीवर , तुमच्या आवडीचा , तुम्ही त्याच्या सर्व गोष्टीची खात्री केलेला आणि तुमच्या विश्वासातील मुलगा शोधून जेव्हा लग्न करून देता तेव्हा त्या संसारात , वारंवार छळवणूक , मानसिक त्रास , शारीरिक त्रास , चूक नसतांना ही तिच्यावर निर्णय लादले जाणे , मारहाण , रोजची किटकीट बऱ्याच कारणांवरून होत असते तेव्हा काहीच मुली , अस म्हणा ना की , आताच्या मुली नाही सहन करत तर त्या येऊन आई बापाला सांगतात , पण काहीच प्रमाणात मुली हे माहेरी सांगतात सगळ्याच नाहीच . त्या वेळी तुम्ही काय करता ? त्यातील काही वडील असे असतात की , तिच्या बाजूने भक्कम उभे असतात , समोरच्यांना सांगतात की , आमची मुलगी आम्हाला ओझे नाही , आणि तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या सोबत असतात . पण बाकीचे बहुतांशी हेच सांगतात की बाळ , बाईचा जन्म असाच असतो , वेळ दे प्रत्येक गोष्टीला , मान्य आहे वेळ द्यावा लागतो मात्र बाबा एवढा पण नाही की तुम्ही तुमचा तळहाताचा फोडच गमवून बसाल . तिला सांगतात की , मुलीच्या जातील सोसावे लागते , सासुरवास भोगावा लागतो , आधी दुःखाचे दिवस काढले की नन्तर सुखाचे दिवस येतातच . तिकडून आई म्हणते की , आम्ही पण काढले असे दिवस , प्रत्येक बायकांच्या नशिबी असच असत , थोडे दिवस असतात असे वैगरे वैगरे . मग काय अर्थ हो तुमच्या मर्जीने लग्न करून ? का या दिवसासाठी तुम्ही शिकवण आधी देत नाही की बाळ जर कुणी अस वागलं तर तस वाग मग नात कोणतं का असेना . का नेहमी गाय बनायचं आणि मान खाली घालून जगायचं ? का नेहमी चांगला वागायचं ? कशासाठी ? आणि मग यात कुणी सहन करत जात तर कुणी स्वतःला गमावून बसत . नाही का कधी वाटत बाबा कज तुम्ही कुठं तरी चुकले कधी ? आणि मग होतो अजून एक सिलसिला सुरू, त्या मुलासोबत लढण्याचा . मग ते प्रेमविवाह वाला असू देत किव्वा तुम्ही शोधून आणलेला मुलगा . अरे जेव्हा तुमचा काळजाचा तुकडा एवढा प्रिय होता तर मग जेव्हा तिची साथ द्यायची होती जेव्हा तिला तुमच्या सोबतीची गरज होती तेव्हा तर तुम्ही हे असे राम नसणारे उदाहरणे देऊन तीच तोंड बांधून ठेवले मग आता ही लढाई कुणासाठी ? हा दिखावा कुणासाठी ? ती व्यक्ती नसल्यावर न्याय कुणासाठी ? तुमची मुलगी गमावल्यावर तुमची सुरू असलेली दगदग आणि तो टाहो कुणासाठी ? खरंच सांगा ना बाबा , चुकतंय का कुठं तुम्ही ?
आता काही असे बाप जे आपली संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर आधीच करून ठेवतात . का हो का हे असं ? बाबा जग कुठं चाललंय आणि तुम्ही अजून या अश्याच विचारात गुरफटून आहात . कधी विचार केला का , की कधी होऊ नये पण काळ कुणाच्या हातात नसतो , तुम्हाला काही झालाच तर त्या मुलीने कस जगायचं ? भाऊ , बाबा प्रत्येक भाऊ त्या चित्रपटातील किव्वा सोशल मीडियावरील स्टेटस सारखा भाऊ नसतात . अजूनही वयाच्या 60 व्या वर्षी संपत्ती साठी भांडण करून खचत्या काळात नाते गमावून बसणारे भाऊ बहीण कित्तेक घरा घरात आढळतात . त्या संपत्ती मुळे एका मेकांच्या मयतीला ही न जाणारे भाऊ बहीण दिसतात आजही . अश्या वेळी , तुम्ही नसाल तेव्हा तिच्या संसारिक जीवनात काही घटना घडल्या आणि तिला त्या संपत्ती चा स्वार्थ असलेल्या भावाचाही सामना करावा लागला तर तिने काय करावे सांगा ना ? वेळ सांगून येत नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे ना ? मग अश्या वाईट वेळी मुलीच्या नावी काहीच नसेल तर तिने कुठं जावे सांगा ना ? कारण तुम्हीच तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला होता ना तिला , तिला तर समाजाचे धक्के खायची सवय पण नाही मग तिने काय करावं बाबा ? मान्य आहे मला आपल्या भारतातील बापाला पोरीचं एक दिवसाचा लग्नाचा खर्च भागविण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा संपत्ती कसली आली जमवून ठेवलेली अस म्हणणारे आणि बहुतेक तर असे ही असतात की , लग्न करून दिल झालं तोच तुझा वाटा होता म्हणणारे .अरे , हे काय बोलणं झालं सांगा ना ? पण आताही अस नाही का वाटत की तुम्ही कुठं तरी चुकता बाबा ?
मुलीचे आईवडील जिवंत नसतील तर काकू काका , मोठे बाबा लग्न लावून देतात . मुलगा कसा आहे काय आहे कसा नाही ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी न करताच कुणाच्या तरी गळ्यात बांधून आपण मोकळं होऊ अस समजतात आणि कर्तव्य पार पाडलं हे छाती ठोकून सांगतात . हो ना , असतात ना काही काही काका , मोठेबाबा असे की , ते तिच्या बाबा पेक्षा ही जास्त जीव तिला लावतात आणि तिच्या आयुष्याशी कसलीही ढवळाढवळ झालेली कधीच सहन करत नाही . पण याला बहुतेक मुली अपवाद आहेत . सर्वांचे नशिबी नसतात ना हो असे माणसं . तर तिकडे दुसरीकडे विणाआईबापाच्या मुलीने जर कुण्या मुलाला पसंत केलं तर , आई बाप नाहित , संस्कार नाहीत , नाक कापलं तर अजून बरेच वैगरे वैगरे . पण मग एवढाच फरक पडतो इज्जतीचा तर जेव्हा तुम्ही एक कोणी तरी गाढव शोधून आणता आणि लावून देता लग्न गाढवासोबत आणि आता संसार कर म्हणून हात झटकून टाकता तेव्हा तिच्या आयुष्यात काही चुकीचे घडले तर करता का विचारपूस ? तेव्हा पडतो का फरक तुम्हाला ? तेव्हा फिरवता का कधी मायेने हात तिच्या डोक्यावरून ? तिला सांगता का कधी की , भिऊ नकोस आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत ? तुम्ही पण तर बापच आहात ना ? जेव्हा तुमच्या पोटच्या मुली सोबत अस होत तेव्हा तुम्हाला ते बघवल पण जात नाही आणि जेव्हा त्या भावाच्या मुलीसोबत झालं तर मग मात्र तिने सहन करावं अशी इच्छा बाळगता . का ? मुलगा तर तुम्ही आणला होता ना ? नाही का वाटत कुठं चुकल्यासारखे अजूनही ?
बालविवाह , म्हणतात की , बंद झालय हे आता . म्हणाल वाचकांनो तुम्ही पण की , डोक्यावर पडलीय की काय ? काय लिहितेय तू ? ज्याला काही एक अर्थ नाही निरर्थक लिखाण . पण खरंच का ? खरच बालविवाह बंद झाले आहेत का ? अहो कित्ती, कित्ती असे मुली आहेत ज्यांचे 18 वर्षाच्या आधीच कळी उमलायच्या आधीच तोडून हार बनवला जातो . म्हणलवकी कुठल्या जगात जगतेय ही , हो ना ? पण कधी मी , माझे माझे हा स्वभाव सोडून आजूबाजूच्या जगात डोकावून पाहिलात का नीट कधीतरी ? अहो बघा ना वेळ काढून , भरपूर मिळतील . तुम्हाला वाटत बाबा की , मुलगी झाली मोठी करा लग्न , चांगला स्थळ आलाय , मुलगा अमुक आहे तमुक आहे , किव्वा नात्यातील आहे , तर कधी कधी ती पळून तर जाणार नाही ना या भीतीमुळे म्हणा की शंकेमुळे . देता ना लावून लग्न वयाच्या आत . विचार केला का कधी की पूर्ण संसार सांभाळणे जमेल का तिला ? कुठं तिचा बालपण तर आपण हिरावून घेत नाही आहोत ना हा विचार केला का कधी ? तिचे स्वप्न , तिचे कितीतरी छंद , कधी विचार केला का बाबा की छंद आणि स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा कित्तीही मोठ्या घराण्यातील माणूस का असेना तो ही मरून जातो हो . मग हे तर आपलें सर्वसाधारण वर्गातील बाळ आहे . नाही का हो वाटत बाबा अजून ही , कुठंच चुकल्यासारख ?
मी एवढी मोठी नाही की बापाला चूका दाखवेल पण मला बापानेच शिकवल ना की, मनातील प्रश्नांना शब्दांची वाट दाखवावीच लागते . हे लेख बहुतांशी वाचकांना चुकीचं ही वाटेल किव्वा काही विधान वाटतील ही चुकीचे . पन फक्त एकदा त्या मुलींच्या दृष्टीने बघून वाचून बघावी हीच विनंती . मला माहिती आहे आणि जाणीव ही आहे मी कुणाबाबद्दल , म्हणजे कोणत्या विषयवार लिहिलं आहे . “बाप” वाटत तेवढं सोपं नाही लिहीन , समजन . आणि हे लिहितांना ही हजारो वेळा विचार आलेला पण शेवटी मांडलाच एकदाच मनातील गोंधळ त्या असंख्य वडिलांपुढे . चुकलं असेल तर माफ करावे बापाच्या मनाने. भरपूर काही लिहायचं होत , दारूच्या नशेत बुडून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या व आयुष्याची गणित सोडवू पाहणाऱ्या वडिलांविषयी ही खूप काही लिहायचं होत . पण लेख खूप मोठा होईल म्हणून इथंच थांबतेय . पण शेवटी एवढंच बोलेल , फक्त एकदा विचार करून बघा आणि सांगा ना नाही वाटत का कुठं कधी चुकल्यासारखं ?

हा लेख हिंदीत लवकरच.. कारण ही फक्त महाराष्ट्रयातील मुलींचे प्रश्न नसून संपूर्ण भारतातील मुलींचे प्रश्न आहेत.

पुन्हा एकदा श्रमस्व चुकले असल्यास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here