प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’ एक वास्तवदर्शी ग्रामीण कादंबरी.जी हादरून टाकणाऱ्या समाज व्यवस्थेचे वर्णन करते.अशी कादंबरी अलिकडेच वाचनात आली.
कादंबरीची सुरुवातच दमदार अशा प्रकाशन सोहळ्याने झाली आणि लोकप्रियतेचा प्रचंड प्रवास तुफान वेगाने कादंबरीने अनुभवला.
अनेक पुरस्कार प्राप्त अशी कादंबरी माझ्या हातात जरा उशिराच मिळाली.पण लवकरात लवकर वाचून मी पूर्ण केली आणि कादंबरीला अनेक पुरस्कार का प्राप्त झाले याचे गमक मला कळले.
अतिशय सुंदर पण साधी सोपी भाषा,ओघवतेपणा, लयबद्धता,भाषेचा सहजपणा दाखवणारा चढ-उतार,वाचत असताना या प्रत्येक गोष्टीची जाणीव मनाला होऊ लागली. प्रत्येक प्रसंग वाचताना डोळ्या समोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होत होता.
जातीव्यवस्थेचा समाजावर असलेला प्रचंड प्रभाव, बारा बलुतेदार पद्धती. न्हावी/वारिक हा त्यामधील एक घटक. त्याचे नेमके वर्णन कादंबरीत सहज सुंदररित्या मांडले गेले आहे.
यशवंत हा या कादंबरीचा नायक.शिक्षणाची आवड असूनही स्वाभिमानामुळे मध्येच शाळा सोडतो,पण शिक्षणाचे महत्त्व कळत असल्याने पुन्हा शाळेत जावू लागतो.
लेखक अशोक कुबडे यांनी वडिलांकडून फुले, शाहू,आंबेडकर यांच्याविचारांची झालेली पेरणी यामुळे लेखक प्रेरित झाले आणि परिवर्तनवादी विचारांनी झपाटून गेले.अन्याय होत असताना सुद्धा त्या विरोधात सुधारणा करणे. त्याविषयीची तळमळ,त्यांच्या व्यथा या कादंबरीतून सहजपणे लक्षात येतात आणि गोंडर हे नाव कादंबरीला सार्थ ठरते.
कादंबरीतील प्रत्येक पात्र वामन,शेवंता,यशवंत,उमा, रंगा, सर्वांचे हुबेहूब वर्णन लेखकाने सहज चितारले आहे.
समाजाची चित्तरकथा मांडण्यासाठी मी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे हे पुरोगामी विचार आणि या विचारातून मानवी कल्याणाची ध्येयप्राप्ती करता येते हे ठसवण्याचा प्रयत्न लेखक अशोक कुबडे यांनी केला आहे.
सरांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
मला इतकी सुंदर कादंबरी वाचावयास मिळाली याबद्दल खूप खूप धन्यवाद!
परिक्षण
सौ.अस्मिता समजिसकर
अलिबाग / रायगड

