ब्रम्हपुरी तालुक्यातील विकासकामे तातडीने पुर्ण करा

0
89

आढावा बैठकीत विरोधपक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

आयोजित आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, तहसीलदार उषा चौधरी, नगरपरिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही, काँग्रेस नेते प्राचार्य देविदास जगनाडे, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत व सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन बांधकाम याची इतंभुत माहिती घेतली. पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना मध्ये एकाच कंत्राटदाराला बहुतांश कामे दिल्याने अपूर्ण व सुरु न झालेल्या पाणीपुरवठा योजना कामे त्वरित करण्यात यावी अन्यथा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग , जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक काळात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणार नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here