
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुका ऐतिहासिक वारसा स्थळानी नटलेला आहे. नागभिड या गावात शिवटेकडीच्या पायथ्याशी महापाषणयुगिन संस्कृतीतील शीलास्तंभ आहे.म्हापाषणयुगिन संस्कृतीला इंग्रजीमध्ये मेगणेटीक कल्चर म्हणतात.महापाषणयुगाला महाअश्मयुगिन व बृहदअश्मयुगिन या नावाने ओळखले जाते. हे नाव त्यांच्या ओबडधोबड शिलांची रचना करून स्मारक बनविण्याच्या पद्धतीमुळे मिळाली.
मानवी संसकृतिक इतिहासात महापाषन युग वैशिष्टयपूर्ण व महत्वाचे ठरलेले आहे याचे कारण म्हणजे या संस्कृतीचे अवशेष जवळपास सर्वत्र मिळतात आणि महापाषण युगिन दफन पद्धतिशी सलग्न असलेल्या काही प्रथा आताही मोजक्या ठिकाणी प्रचलित आहे. गडचिरोलीतील काही भागात मडीया समाजात तसेच छत्तीसगड, झारखंड मधील मुंडा, संथान अश्या काही समुदायमध्ये या प्रकारच्या दफन पद्धती अजूनही अस्तित्वात आहे जिथे आजही लोक मृत व्यक्तीच्या आठवणींमध्ये दगडांची, लाकडांची स्मारक उभारतात.
नागभिड येथील प्रसिद्ध शिवटेकडीच्या पायथ्याशी महापाषन युगातील शिलास्तंभ आढळून आले आहे. यांचा कालावधी साधारणतः ई.स. पु.१००० ते ५००म्हणजेच २५०० ते ३००० वर्षापूर्वीचा आहे. या शिलास्तंभाची एकूण संख्या १४ असून त्यातील ९ शिलास्तंभ चांगल्या स्थितीत आहे. त्यांची उंची ४ फुटपासून ९ फुटांपर्यंत आहे. यांचा शोध राज्यपुरातत्व विभागाच्या डॉ. रा. र. बोरकर यांनी १९९७ मध्ये लावलेला आहे. नागभिडच्या या शिलास्तंभाचे विशेष वैशिष्टय म्हणजे यांची वैशिष्ट्पूर्ण रचना एखादया ग्रीडपॅटर्न प्रमाणे एकामेकांपासून विशिष्ट अंतरावर ते उभे आहेत. महापाषन बृहद अश्मकाळातील लोकांना असलेले खगोलशास्त्रचे ज्ञान यावरून कळून येते.
मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR चे खगोलशास्त्र विभागाचे ज्येष्ठ संशोधक डॉ. मयंक वाहिया व बँगलोर चे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अडवन्स स्टडीचे संशोधक श्री. श्रिकुमार मेनन यांनी यावर विशेष संशोधन केले आहे. डॉ. मेनन यांच्या PHD चां विषयच मुळात महापाषन युगातील लोकांचे खगोलशास्त्रीय ज्ञान हे होते यावरून असं कळतं की नागभिड मध्ये जे पूर्वापार राहणारे लोक होते त्यांना खगोलशास्त्रचे विशेष ज्ञान होते. त्यानुसारच त्यांनी येथील शीलास्तंभाची रचना केलेली आहे. नागभिड येथील शिलास्तंभापैकी बहुतेक शिलास्तंभ हे उत्तर दक्षिण दिशेने उभे आहे. ही दफन भूमी खुल्या मैदानी भागात असल्यामुळे सूर्योदय सूर्यास्त आणि सूर्याच्या साक्षीने होणारी दिवसाची स्थित्यंतरे ठळकपणे दृष्ट्योटपत्तीस येतात.
दक्षिणायन उत्तरायण व विषववृत्तिय दिवस या विशिष्ट दिवशी होणारे सूर्याचे तापमान, कलर लक्षात घेऊन या शिलास्तंभाचे सापेक्ष चौरेखन केल्याचे दिसून येते . या साऱ्या गोष्टी निव्वळ योगायोग नाही तर तत्कालीन मानवी संस्कृतीचे खगोलासंबंधीच्या ज्ञानाकडे अंगुली निर्देश करणारे आहे. या संदर्भाने अधिक संशोधन होणे गरजेचे आहे व यासंदर्भातील संशोधन ना ऐतिहासिक दृष्टिक्षेप साठी खूप महत्वाचे आहे. या शिलास्तंभाना जागतीक स्मारक म्हणुन दर्जा प्राप्त आहे. भारतात अश्या प्रकारची स्थळे दक्षिण भारतात आढळतात तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात महापाषन युगिन शिलास्तंभ जवळपास १२५ जवळ आढळून येतात. हा वारसा आपल्याला जतन व संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. या दृष्टीने आपण पावल उचलायला हवी तरच आपण आपल्या पुढील पिढीना हा ऐतिहासिक वारसा अभिमानाने सांगू शकू.
लेखिका
कु. शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे
(विज्ञान शिक्षिका)
नवखळा ता. नागभिड जिल्हा चंद्रपूर














