prabodhini news logo
Home अमरावती लेख – वधू – वर मिळेनात…!

लेख – वधू – वर मिळेनात…!

0
157

भारतीय संस्कृतीत विवाह बंधन म्हणजे अतिशय पावित्र्यपूर्ण परंपरागत चालत आलेला संस्कार, ज्यावर भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे. परंतु दिवसेंदिवस अपेक्षांचा डोंगर एवढा डोईजड होत आहे, की त्यामुळे ही संस्था पोखरून निघत आहे.तिचे पायमुळे कुठेतरी ठिसूळ होत आहे. आज समाजामध्ये परिस्थिती बघितली, तर कितीतरी युवक आणि युवती अविवाहित आहेत. तरीसुद्धा वर वधू मिळत नाहीत. अविवाहितांची संख्या असंख्य असूनही विवाहास वर वधू मिळू नये यापेक्षा दुसरी नवलाई नाही… का? तर वाढत्या अपेक्षांमुळे! अपेक्षांची यादी एवढी वाढली आहे, की वधू-वरांच्या अपेक्षा तर वेगळ्याच त्यात त्यांच्या मातापित्यांच्याही अपेक्षा आल्याच.
मुलीला मुलगा शिकलेला हवा, नोकरी हवी, शहरात राहणारा हवा, व सर्व हट्ट पुरवणारा शिवाय एकुलता एक हवा. सर्व स्वातंत्र्य बहाल करणाराही हवा. तिच्या माता पित्यांनाही आपला जावई निर्वेसणी, गलेलठ्ठ पगाराचा हवा. तर वरपक्षाच्या अपेक्षा ह्या वेगळ्याच. मुलाला मुलगी शिकलेली, सुंदर, गोरीपान, संस्कारी, नोकरी करणारी हवी शिवाय वर पक्षाच्या माता पित्यांनाही ती नोकरी करून घर सांभाळणारी, घरातील सर्वांच्या मागेपुढे करून सर्वांच्या इच्छा आकांक्षा जपणारी हवी.
या सर्व अपेक्षांचा डोंगर डोईजळ होऊन विवाह संस्था एक व्यवहार बनली आहे. ज्यात तिचे पावित्र्य, सामाजिक दृष्ट्या असणारे महत्त्व लयास जातआहे. शिवाय योग्य वयात योग्य वर वधू मिळत नसल्याने वाढते वय, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, नैराश्य, अस्थिरता अशा कितीतरी समस्यांना युवक युवती बळी पडत आहेत. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अवास्तव समस्येची यादी कमी करून वास्तविकता स्वीकारणे, तडजोड समंजसपणा, या गोष्टी अंगीकारणे महत्त्वाच्या आहेत.

हाताची पाचही बोटे सारखी नाहीत म्हणून हाताच्या सौंदर्यात काही कमीपणा जाणवत नाही. किंवा हाताने कुठले काम होत नाही असेही नाही. मग आहे त्या गोष्टी स्वीकारण्यात, थोडीफार तळजोड करून वास्तविकतेत समाधान मानण्यात काहीच वावगे नाही. नाही का? नाहीतर वधू वर मिळणे हे कालांतराने लॉटरीच्या तिकिटासारखे होईल.

काल-परवा एका लग्नामध्ये एका युवकाची भेट झाली, पाच वर्षापासून मुलगा लग्नासाठी मुली बघतोय, पण एकाही मुलीचा लग्नासाठी होकार येईना. का तर शेतकरी मुलगा नको …! एक सुंदर, सुशील, सुशिक्षित मुलीचे आई-वडील चार वर्षापासून मुलगा शोधताहेत पण मुलांकडून नकारच…. का तर मुलगी लठ्ठ आहे …! याहीपेक्षा भयंकर तर….. काही दिवसांपूर्वी ऐकण्यात आलेली गोष्ट, एका वधू पित्याने वर पक्षासमोर ठेवलेली अट – तुमची अर्धी जमीन मुलीच्या नावे करणार असाल तरच लग्नाला होकार!
सुंदर, सोज्वळ नात्याची सुरुवातच जर पैशाने विकत घेऊन खरेदी विक्रीच्या व्यवहारासारखी होत असेल तर ते टिकविणे त्याहीपेक्षा ते टिकणे , ही तर लांबचीच गोष्ट.
कारण या सर्वांमध्ये कष्टाळू, निर्वेसनी व प्रामाणिक मुलांची व संस्कारी,
कर्तबगार मुलीही भरडल्या जात आहेत. मानसिक ताणतणाव तर वेगळाच.

विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी, केवळ व्यवहारिक दृष्टिकोन न ठेवता अपेक्षांची पाने जरा कमी करून, युवक युवतींच्या व त्यांच्या आई वडीलांच्या समोरील लग्नाची समस्या नक्कीच दूर होईल..
चला तर विवाह या बंधनाकडे बघण्याची दृष्टी थोडी बदलूयात व ‘वर न मिळे वधूला’ ही समस्या कायमचीच संपवूयात.

लेखिका
आरती प्रवीण नागपुरे
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here