
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – कवी ,लेखक , समीक्षक मा . प्रा . श्री . पंढरी बनसोडे यांचा “शब्दफुले ” हा काव्यसंग्रह नुकताच वाचण्यात आला . या काव्यसंग्रहात एकुण९७ कविता असुन सर्वच कविता अतिशय वाचनीय आहेत . निसर्ग, समाज,शेती , वैचारीक,अध्यात्म अशा सार्याच कवितांचे मनसोक्त भांडार आमचे कवीमित्र असलेले मा . पंढरी बनसोडे यांनी आपल्या काव्यसंग्रहात घेतले आहे . त्यामुळे सर्व थरातील व सर्वच वयोगटातील रसिकांना या कविता आपल्या वाटत आहेत . सहजसोप्या भाषेतील या कवितांचा अर्थ कविता वाचतानाच लक्षात येत असल्यानं कविच्या विचारांचा पगडा वाचकाच्या अंतरंगावर चटकन ताबा घेतो व वाचक कवितांचे रसग्रहण करण्यात तल्लीन होतो . सदर कविता मानवाच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्यानं त्या वाचकाच्या मनात घर करुन राहतात . कविता वाचताना त्या लयबद्ध असल्यानं वाचनाची गोडी अजुनच वाढत जाते
निसर्ग असीमित आहे . निसर्ग हाच गुरु असे आपण सर्वजन शालेय जीवनात शिकलो आहोत . खरचं निसर्ग हा मानवाचा गुरु जन्मापासुन ते अगदी मृत्युपर्यंत असतो . निसर्गातील झाडे , नद्या , डोंगर, , पाणी, वारा , माती या सर्वच गोष्टी किती भरभरुन मानवाला देत असतात . या प्रत्येक घटकाकडून आपल्याला घेण्यासारखे खुप आहे . हे विचारात घेऊन कवी आपल्या ” पक्ष्यापासून शिकावं ” या कवितेत म्हणतात ……
पक्ष्यांपासून खूप शिकावं
मुक्तपणे कसे जगावं
उंच उंच भरारी घ्यावी
गवसणी आकाशाला घालावं ..!
खरचं या जीवसृष्टीत पक्षांचं कुतुहल सर्वांनाच आहे . प्रत्येकालाच वाटतं आपण पक्षी असतो तर किती बरं झालं असतं . कारण पक्षी स्वछंदी असतात . त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसतं . त्यांच्या मनात येईल तेंव्हा ते कधीही आकाशात झेप घेवू शकतात .आपलं जीवन ते आपल्या मनाप्रमानं जगतात . उंच आकाशी भरारी घेनार्या पक्षांकडे पाहुन आपल्यालाही वाटतं की अरे ..! मला ही देवानं पंख दिले असते तर मी ही या पक्षांप्रमानं उंच आकाशात ” भरारी” घेतली असती . परंतु काय करु मला पंख नाहीत . आणि आपण घडीभर खजिल होतो . परंतु कवी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन वाचकाला हेच सांगु इच्छित आहेत की …! अरे पहा त्या पक्षांकडे … ते कसे स्वछंदी जीवन जगत आहेत . कसे आकाशात विहार करत आहेत . तसे आपणही जीवनात आनंदी राहिले पाहिजे . प्रतिकूल परिस्थितित मार्ग काढून आपण आपल्या जीवनात यशस्वी झालं पाहीजे. म्हणजेच तुम्ही ही आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्यासारखचं आहे .इतका मोठा अर्थ या पंक्तीत दडलेला आहे . धाडू नको वृद्धश्रमात ..! या कवितेत कवीने आपल्या जन्मजात्यांची कैफियत मांडली आहे .
तुझ्यासाठी खाल्या किती खस्ता
रक्ताचं केलं किती रे पाणी
रात्र रात्र जागलो तुझ्यासाठी
ऐका हो कुणी आमची कहाणी ..!
या भूतलावर आई- वडीलांसारखे दुसरे दैवत नाही . आई-वडील आपल्याला जन्म देतात . अपार कष्ट उपसून आपणास वाढवतात . लहाणाचं मोठं करतात . आपलं संगोपन करतात . पोटाला चिमटा घेवून आपले सर्व लाड-कौतुक, हट्ट पुरवतात . अफाट मायेनं वाढवतात . परंतु मोठे झाल्यावर तीच मुलं आई-वडीलांना तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणुन प्रश्न विचारतात . हे समाजाचं खुप मोठं दुदैवं आहे . शहरी भागात ” हम दो हमारे दो ” ही संस्कृती उदयाला येत असुन बरीच मुलं आपल्या आई-वडीलांना म्हातारपणी वृद्धाश्रमात पाठवतात ही वस्तुस्थिती आहे . या गोष्टी ऐकुन मनाला खुप वेदना होतात …!
याच प्रमाणे जन्म माणसाचा, सारा आसमंत कवेत घ्यावा , चला करुया क्रांती नवी ,दीक्षाभूमी , आई तुझ्या कुशीत , प्रीत तुझी माझी, व्यर्थ ना हो बलिदान या व यापेक्षा एकशे -एक सरस कवितांचा खजिना या ” शब्दफुले ” या कवितासंग्रहात आहे . अतिशय वाचनीय असा हा कविता संग्रह असुन आवर्जुन वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा असा नक्कीच आहे ” शब्दफुले “…!
या काव्यसंग्रहास व कवी पंढरी बनसोडे यांच्या पुढील लेखन कार्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा …!
काव्यसंग्रह – शब्दफुले
कवी – प्रा . पंढरी बनसोडे 9604354148
प्रकाशन -डी.बी.ए.प्रकाशन महाराष्ट्र
परीक्षण – तानाजी धरणे 9975370912
पृष्ठ -102
मूल्य – 140














