ढीवर समाज संघटनेचा पुढाकार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
भटक्या विमुक्त प्रवर्गातील ढीवर या दुर्लक्षित समाजातील घटकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज संघटित होऊन एकजुटीने काम करण्याची खरी गरज असल्याचे माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी सिंदेवाही येथे पार पडलेल्या पाच तालुक्याच्या संयुक्त आढावा सभेत मत व्यक्त केले.
पंचशील मत्सपालन सहकारी संस्था मर्यादित सिंदेवाही येथे नुकतीच ढिवर समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नावर चर्चा करून शासन प्रशासन यांचेकडे समस्या मांडण्यासाठी सिंदेवाही, सावली, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, या पाच तालुक्याची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम वासेरा येथील नवनिर्वाचित सरपंच दिलीप मेश्राम यांना शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. ढिवर समाज हा मच्छी पालन व्यवसाय करून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे. मागील आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी तलाव, बोड्या, फुटून मच्छी, आणि नुकतेच टाकलेले मच्छीचे बीज वाहून गेले असल्याने मच्छीमार बांधवांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. वरील पाच तालुक्यातील मत्सपालान सोसायटीला शासनाने भरीव मदत करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात येईल असे बैठकीचे मुख्य मार्गदर्शक माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक एकनाथ ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, पेंढरी येथील मच्छी पालन सोसायटीचे सचिव यादवराव मेश्राम , रामाळा ग्राम पंचायत चे सरपंच अरविंद मेश्राम, वासेरा ग्राम पंचायत चे नवनिर्वाचित सरपंच दिलीप मेश्राम मंचावर उपस्थित होते. ढीवर समाज हा राजकीय दृष्ट्या मागासलेला असून या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाचे संघटन करणे आवश्यक असल्याचे मान्यवर पाहुण्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी सिंदेवाही, सावली, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर या तालुक्यातील असंख्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.

