राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न

0
43

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ठाणे – पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत दोन दिवशीय कार्यशाळा दिनांक 6 ऑगस्ट व 7 ऑगस्ट रोजी रोटरी कम्युनिटी सेंटर, वडवली, अंबरनाथ (पूर्व) या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग डॉ. प्रशांतजी कांबळे तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद ठाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते उपस्थित होत्या.

कार्यशाळेची सुरुवात ही राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या योजनांच्या बाबतच्या मराठीतील पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे शुभ संदेश या कार्यशाळेस लाभले.

कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या शेळीपालन, कुकूटपालन, चारा निर्मिती, वराह पालन या योजनांचा अर्ज कसा भरायचा व या योजनांविषयी काय निकष आहेत तसेच अनुदानाची रक्कम किती आहे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पशु सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजित हिरवे यांनी वराह पालन, शेळीपालन, चारा निर्मिती व मुरघास बाबतच्या योजना विषयी आलेल्या पशुपालकांना सखोल मार्गदर्शन यावेळी केले.

या योजनेत ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज केला जातो याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. नरेश बांगर यांनी कुक्कुटपालन विषयीच्या योजने बाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पशुपालन क्षेत्रात अनुभवी असलेले पशुपालक यांनी आपले अनुभव व्यक्त केले. भिवंडी येथील सुरेश पाटील यांनी त्यांचा बकरी ईद साठी बोकड कसे तयार करावे याविषयीचे अनुभव, विनायक पाटील यांनी मुरघास निर्मिती बाबतचा अनुभव, कल्याण तालुक्यातील घोटसई गावचे रितेश घाडीगावकर यांनी सानेन शेळीचे दूध विक्रीबाबत त्यांच्या अनुभव तसेच विलास बागवे यांनी त्यांच्या कुक्कुटपालनाविषयीचे अनुभव कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पात्र झालेले लाभार्थी विकास रामचंद्र जाधव यांनी योजनेविषयीचे त्यांचे अनुभव या कार्यशाळेमध्ये कथन केले. ही कार्यशाळा आयोजित करण्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, सहाय्यक आयुक्त डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. दीपक कंधारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजित हिरवे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अमोल सरोदे, सहायक आयुक्त डॉ. प्रीतम भोईर तसेच अंबरनाथ तालुक्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये डॉ. किर्ती डोईजोडे, डॉ. देवश्री जोशी, डॉ. अनिल धांडे यांनी विशेष कामगिरी केली आहे. कार्यशाळेचे निवेदन डॉ.धनंजय मादळे व अक्षता गायकवाड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. प्रीतम भोईर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here