prabodhini news logo
Home यवतमाळ आजचा लेख – ऋतू हिरवा ऋतू बरवा……

आजचा लेख – ऋतू हिरवा ऋतू बरवा……

0
274

हिरवे हिरवे माळरान
हरवून टाकते देहभान
इंद्रधनुत रंगून आला
मन भावन श्रावण छान

खरंच, पावसाच्या सरीवर सरी घेऊन मनमोहक अशा श्रावणाला सुरुवात झाली आहे .निसर्गात सगळीकडे हिरवळ पसरलेली .नदी नाले आनंदाने भरभरून बेधुंद वाहताना दिसते.सोनचाफा मस्त अंगणात बहरला . राना मधला सुंदर केवडा दरवळतो आहे.भिजलेले पक्षी नभात स्वच्छंद उडताना दिसते .पारिजातकाची फुललेली फुले मनाला आकर्षित करतात . हे विलोभनीय दृश्य आपल्या सर्वांच्या मनामनाला अगदी मोहून टाकते ते श्रावणातच नाही का.जिकडेतिकडे प्रसन्न वातावरण.यासोबतच श्रावणातील सणांची रेलचेल धार्मिकता आणि दानपुण्य करण्याचा कालावधी.प्रत्येक धर्मियांसाठी नवा उल्हास घेऊन येतो तो श्रावणच.मात्र या श्रावणात सर्वात आनंदी दिसतो तो जगाचा पोशिंदा .म्हणजेच आपला बळीराजा, आषाढमध्ये पिकाची लावणी झालेली असते आणि मग श्रावणात अंकुरलेले पिक बघून आणि हिरवीगार झालेली शेत पाहून त्याला खूप आनंद होतो.आणि तो मनाशीच गुनगुनतो

काळ्या काळ्या भुईतून
सोन्यासारखं बिज अंकुरलं
धनधान्याची बरकत होऊन
माझ्या लेकराचं पोट भरल

असा हा जगाची काळजी करणारा शेतकरी .श्रावण महिन्यात अगदीच आनंदी असतो.याच श्रावणात जिकडे बघावे तिकडे हिरव हिरव रान डोंगर ,दऱ्याखोऱ्या ,पठार पावसाने नाऊन निघालेले असते.डोंगरावरून येणारे पाणी, पाण्याचे धबधबे जश्या दुधाच्या धारा . असे सुरेख चित्र दिसते आणि मग नकळतच हा निसर्गरम्य देखावा बघण्यासाठी लोक पर्यटनाला निघतात.निसर्गाचे सौंदर्य न्याहाळतात .पावसात भिजण्याचा आनंद लुटतात.श्रावण महिन्यात आकाशाकडे बघितले तर ढगांची गर्दी झालेली असते.झपाट्याने ढग खाली येतांना दिसतात.तर त्या ढगात पांढऱ्या उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून वाटतय की बगळ्यांची फुलमाळ आता धरणीच्या स्वागतासाठी खाली उतरत आहे .तसेच बगळे पक्षी खाली बसताच पांढऱ्या ठिपक्यांच्या रांगोळी ने अंगण सजते. हे श्रावणातील विलोभनीय दृश्य बघून कवी कवयित्री सुद्धा श्रावणात रमून जातात आणि ते नवनवीन कल्पनेत तल्लीन होऊन श्रावणातल अप्रतिम सौंदर्य कागदावर अलगद उतरवितात.आणि त्यांना स्वर्ग सुख मिळते . अशा या श्रावणात मग प्रत्येकालाच निसर्ग कवी ,कवयित्रीं शांता शेळके, कुसुमाग्रज, सुरेश भट , ना.धो.महानोर यासारख्या अनेक निसर्ग कवींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही . तसेच बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ची कविता तर सर्वांच्याच ओठावर येते .

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे

क्षणात येणारा ऊन-पावसाचा खेळ बघणाऱ्याला अचंबित करतो . आनंदाने मन फुलून येते.श्रावण आहेच तसा आठवणीने चिंब भिजवणारा.
आणि मग अचानकच आकाशाकडे लक्ष वेधते. इंद्रधनुच्या सप्तरंगाने आकाश सजलेले दिसते.लहान मुले सुद्धा हे इंद्रधनुष्य आपल्या वहीमध्ये रेखाटतात.त्यांनासुद्धा श्रावण महिन्याची भारी ओढ. शाळेत त्यांचे मन रमते.पावसाच्या गप्पागोष्टी आपल्या मैत्र मैत्रिणीसोबत करतात.आणि पावसात भिजून मनमुराद आनंद घेतात.
याच श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते.पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची पूजा आज घराघरात करतात . सापाला जीवदान देणारे सर्प मित्रांचे आभार मानतात.गरीब सर्पमित्रांना आर्थिक मदत केल्या जाते.त्यानंतर चा सण बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा म्हणजेच रक्षाबंधन .घरोघरी उत्साहाची लहर घेऊन येतो. तसेच या महिन्यातला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे शेतकऱ्यांचा बैलपोळा. दिवसरात्र काबाडकष्ट करून आणि आपल्या भाकरीची चिंता करणारा जगाचा पोशिंदा आणि त्याचा सर्जा राजा शेतात राबराब राबत असतो आणि म्हणूनच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा.श्रावण महिन्यात साजरा केला जातो. असा हा श्रावण सर्वांच्याच मनाला आनंदाने बहरून टाकतो.आणि दुःख नैराश्य नाहीसे करतो.जगण्याच नवा उत्साह निर्माण करतो . खरोखरच निसर्गाचे आपल्यावर अनंत उपकार आहे आणि म्हणूनच श्रावणात या उपकारांचे परतफेड करण्यासाठी निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी श्रावण महिन्याला फार महत्वाचे स्थान आहे.श्रावण आपल्याला ऊर्जा देतो .आणि आपल्या जीवनातही आनंदाची हिरवळ कायम राहावी हा संदेश देतो.म्हणूनच कवयित्री शांता शेळके म्हणतात, ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूचा वनी रुजावा युग विरही हृदयावर सरसरतो मधु शिरवा.

लेखिका संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here