शारदा भुयार महिला जिल्हा प्रतिनिधी, वाशीम- कारंजा (लाड) : तळागाळातील दारिद्रय रेषेखालील निराधार असलेल्या गरजू वयोवृद्ध मायबाप,लाचार जीणे जगत असणाऱ्या आपल्या अंध- दिव्यांग-कर्करोग,अर्धांगवायू सारख्या दुर्धर आजाराने पिडीत बंधू-भगीनी-माता-पिता,विधवा- परित्यक्ता-घटस्फोटित असलेल्या मायमाऊल्यांना केन्द्रशासन आणि राज्यशासन दोहोंच्या संयुक्त विद्यमाने,सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी, इंदिरा गांधी किंवा श्रावणबाळ योजनेचे दरमहा-प्रत्येकी पंधराशे रु. (१५००/-) रू महिना अनुदान दिले जाते. या अनुदानाला ही अडाणी-भोळीभाबळी जनता दरमहा मिळणारा पगार असे संबोधून, ज्याप्रमाणे शेतकरी राजा आभाळाकडे डोळे लावून आतुरतेने पाऊसाची प्रतिक्षा करतो त्याप्रमाणे ही निराधार मंडळी त्यांच्या अनुदानाची वाट बघत असतात. हे अनुदान जर लांबले तर ह्या बिचाऱ्या गरीबगुदांचे उदरनिर्वाहाच्या व औषधोपचाराच्या साहित्या साठी तारांबळ उडत असते.मात्र एकदा का त्यांच्या हातामध्ये पंधराशे रु. (१५००/-) रु पडले म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचेशी प्रत्यक्ष संवाद सांधणाऱ्या आणि बघणाऱ्या व्यक्तींलाच अनुभवता येतो.असो मात्र स्थानिक राष्ट्रिय बँका सेन्ट्रल बॅन्क बडौदा बँकेतून यांना दरमहा,पंधराशे रु. (१५००/-) रु देता त्यामधून दोन तिनशे वजा करून, बाराशे रु.(१२००/-) रु. रक्कमच देण्यात येत असल्याची तक्रार लाभार्थी करीत आहेत. वास्तविक पहाता ही रक्कम म्हणजे, लाचार व मजबूर असलेल्या निराधार व्यक्तींना मिळणारी शासनाची मदत आहे. त्यामुळे जेवढी शासनाने बँकेकडे पाठवली तेवढी त्यांना द्यायला हवी. त्यापैकी काही रक्कम बँकेकडे बचत करण्याचा किंवा बँकेकडून कोणत्याही वसूलीची निराधारा कडून कपात करण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे कारंजा तहसिलचे विद्यमान तहसिलदार कुणालजी झाल्टे सर यांनी राष्ट्रिय कृत बँकेच्या व्यवस्थापक व प्रबंध अधिकारी यांचेशी संवाद साधून, १००% रक्कम निराधारांना मिळवून देण्याची मागणी निराधारांच्या तक्रारी वरून, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग जनसेवक संजय मधुकरराव कडोळे यांनी केली आहे.

