ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- दि. 28 सप्टेंबर 2024- पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर, 2020 पासून राबविण्यास सुरवात झाली होती. “माझी वसुंधरा अभियान 4.0” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 मे, 2024 या कालावधीत राबविण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 431 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान 4.0 याचे कामकाज करण्यात आले असून माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये ठाणे जिल्हा कोंकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे व जिल्हा परिषद अंतर्गत 4 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहिर झाले आहे.
ग्रामपंचायती अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 4.0 राबवण्यासाठी ग्रामस्थानी मोलाची कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर अभियान यशस्वी राबवण्यात आले असून गावकरी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयातील युवक- युवती, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. ठाणे जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहिर झाले यासाठी वरिष्ठ कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो. – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये ठाणे जिल्ह्याला कोंकण विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून प्रथम क्रमांक मिळाला असून 4 ग्रामपंचायतींची कोंकण विभागामध्ये निवड झाली आहे. ग्रामपंचायत गट 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गटातून कोंकण विभाग स्तरावर भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला असून 50 लाख रुपये बक्षिस रक्कम जाहिर झाली आहे. तसेच शहापूर तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाला असून 15 लाख रुपये बक्षिस रक्कम जाहिर झाली आहे.
ग्रामपंचायत गट 1.5 हजार ते 2.5 हजार लोकसंख्या गटातून कोंकण विभाग स्तरावर मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांक मिळाला असून 15 लाख रुपये बक्षिस रक्कम जाहिर झाली आहे. ग्रामपंचायत गट 1.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातून कोंकण विभाग स्तरावर शहापूर तालुक्यातील बाभळे ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून 15 लाख रुपये बक्षिस रक्कम जाहिर झाली आहे.

