पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची तयारी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक आठवड्याभरापासून करत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, प्रमुख पाहुणे नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन मा. राजेश पांडे, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्रमाधिकारी मा. मधुकर वाळुंज, मा. किशन कुमरे व मा. शितल शेवते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजेने करण्यात आली, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना गीत, विद्यापीठ गीत आणि मएसो गीताने कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाची जबाबदारी डॉ. अनिल पारधी सर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. ‘अतिथी देवो भव’ या संकल्पनेला साजेसे असे मान्यवर पाहुण्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले.
“Not Me But You” या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीद वाक्याला शोभेल व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सन्मानप्रितार्थ अशी प्रस्तावना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास उगले सरांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, आणि याची जाणीव ठेवून आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने आज पर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वीरीत्या घडवले आहेत याचीच एक झलक म्हणजे सदर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महाविद्यालयातील ज्या ज्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय या शिबिरांसाठी निवड झाली होती त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश पांडे यांनी आपल्या वक्तव्याद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेतील अनेक रसमय गोष्टी विद्यार्थ्यांना उलगडून सांगितल्या. “पुस्तकी जगापासून थोडं बाहेर होऊन इतर गोष्टींचे देखील ज्ञान घ्यायला हवे, इतर कौशल्य शिकायला हवेत.” या सरांच्या वक्तव्याने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सरांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना हे राष्ट्र सेवेसाठी विद्यार्थ्यांना मिळालेले वरदान आहे असेच वाटते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. किशन कुमरे सर यांनी संपूर्ण मान्यवर पाहुण्यांचे तथा स्वयंसेवकांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले. अशाप्रकारे राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे अवचित्य साधून आबासाहेब गरवारे महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेला कार्यक्रम यशस्वीरिता पार पडला.

