भंडारा जिल्हा प्रतिनिधी अशोक सांडेकर 9579596837- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांनी वैनगंगा नदीमध्ये नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवर राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की नाग नदीमध्ये औद्योगिक कचरा, शहरी कचरा आणि सांडपाणी यामुळे हे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. हे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळून भंडारा जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करत आहे.
खासदारांनी आपल्या निवेदनात सांगितले की या प्रदूषणामुळे वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोक जलजन्य रोगांचे बळी ठरत आहेत. त्यांनी असेही म्हटले की प्रदूषित पाण्यामुळे शेतीच्या पिकांवरही परिणाम होत असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय, जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे, ज्यामुळे मच्छीमारी उद्योगालाही गंभीर फटका बसला आहे.
खासदार डॉ. पडोळे यांनी राज्यपालांकडे नाग नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वैनगंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्यांनी राज्यपालांकडे या समस्येचे त्वरित निराकरण करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे, असेही आवाहन केले आहे.

