मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी पुढाकार घ्यावा

0
31

मतदान जनजागृती उपक्रमाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – दि. 29 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात येथील नागरिक औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरी करीत असून बहुतांश निवासस्थानेसुध्दा औद्योगिक परिसरात आहे. याव्यतिरिक्त आपापल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाबाबत प्रवृत्त करणे, त्यांना मतदानाचे महत्व पटवून देणे, ही प्रशासनासोबतच औद्योगिक आस्थापनांचीसुध्दा सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक दायित्व निधीतून विविध उपक्रम राबविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

मतदान जनजागृती अंतर्गत ‘स्वीप’ उपक्रम तसेच थिमॅटीक मतदान केंद्राच्या तयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, महाराष्ट्रात एकाच दिवशी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. सर्व औद्योगिक आस्थापनांनी आपल्या कपंनीमध्ये कार्यरत कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. आपात्कालीन परिस्थिती असेल तर तसे प्रशासनाला अवगत करून मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सूट द्यावी. या आदेशाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा औद्योगिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल.

व्होटर इर्न्फॉमेशन स्लीप (मतदार माहिती चिठ्ठी) वाटपासाठी आपापल्या क्षेत्रातील बीएलओ यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी उद्योगांनी एक नोडल अधिकारी नेमावा. जेणेकरून लोकांना कुठे मतदान करावयाचे आहे, याची माहिती मिळणे सोयीचे होईल. लोकसभेमध्ये जिल्ह्यातील उद्योगांनी ‘थिमॅटीक पोलिंग स्टेशन’ तयार केले होते. आताही मतदानाच्या दिवसापूर्वी आकर्षक थिमॅटीक पोलिंग स्टेशन पूर्ण तयार होईल, याबाबत योग्य नियोजन करावे. त्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्त करावी.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदार जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांमार्फत रॅली, पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, मतदानाचे महत्व अधोरेखीत करण्यासंदर्भात निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा तसेच ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. असेच उपक्रम औद्योगिक आस्थापनांनीसुध्दा राबवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केल्या.

बैठकीला चंद्रपूर फेरो अलाय, दालमिया सिमेंट, वेकोली (चंद्रपूर, वणी, माजरी), चमन मेटॅलिक, सिध्दबल्ली, बिल्ट बल्लारपूर, ग्रेस इंडस्ट्रिज, अंबूजा सिमेंट, पॉवर ग्रीड, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, लॉयड्स मेटल्स, गोपानी इंडस्ट्रिज, धारीवाल यांच्यासह एकूण 20 औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here