“शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम!” – विक्रांत देशमुख

0
332

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क पुणे – पिंपरी (दिनांक : ०६ डिसेंबर २०२४) “शाळा ही ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रभावी माध्यम आहे!” असे विचार महामार्ग पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, थेरगाव या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विक्रांत देशमुख बोलत होते. याप्रसंगी आत्मजा फाउंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रियदर्शनी गुरव, सामाजिक कार्यकर्त्या वंदना राजेनिंबाळकर, डॉ. रंजना नवले, रोटरी क्लब ऑफ थेरगावचे प्रेसिडेंट दत्तात्रय कसाळे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रेसिडेंट गोविंद जगदाळे, सुनील जगताप, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या प्रेसिडेंट नंदिता देशपांडे, माॅम हेल्थ केअर थेरपी सेंटरचे ओनर आकाश कदम, पूनम झांझुरने, ज्ञानवर्धिनी टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या संचालिका रूपाली देव, सेवानिवृत्त शिक्षिका वनिता बकरे, शालिनी म्हात्रे, माजी विद्यार्थी केशव गोरे, संकेत हलगेकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संचालक सदस्य नितीन बारणे, राहूल बनगोंडे, आसराम कसबे, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका वर्षा जाधव अशा अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, अभिनयाद्वारे आपल्यातील सुप्त कलागुणांना अतिशय प्रभावीपणे सादर केले. विविध प्रादेशिक नृत्य, लोकनृत्य यांमधून विविधतेमधील एकता, भारतीय सण उत्सव संस्कृतीचे दर्शन स्नेहसंमेलनामधून घडविण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या कार्यावरील नाट्यप्रयोग सादर करण्यात आला; तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना नृत्यनाट्यगीतामधून वंदन करण्यात आले. बालवर्ग ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या या कलागुणांवर पालक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त बक्षिसांचा वर्षाव केला. पालकांनी सादर केलेला मंगळागौरीचा जागर हा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचे आकर्षण ठरले. यावेळी ‘क्रांतिकारकांची स्मरणगाथा’ या विद्यार्थी आणि शिक्षकांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सर्व उपक्रमांबाबत भरभरून कौतुक केले; तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले. वंदना राजेनिंबाळकर आणि प्रियदर्शनी गुरव यांनी भरीव आर्थिक मदतीचा हात शाळेला या निमित्ताने दिला. इयत्ता दहावीतील श्वेता दाभाडे, इयत्ता सातवीतील केतन सांगडे आणि ऋतिका धसाडे या गुणी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे नियोजन मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, आशा हुले यांनी केले तर सर्व विभागातील सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनतीने सर्व कार्यक्रम यशस्वी केला. त्यामुळेच शाळेतील जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळू शकली. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी आणि आकांक्षा रोडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी केले; तर आभार मंजुषा गोडसे यांनी मानले. पालकांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती ही शाळेवर असलेल्या प्रेमाचे निदर्शक ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here