ब्रम्हपुरी येथे तेली समाज उपवर – वधू परिचय मेळावा
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून स्पर्धेच्या युगात उभे करावे. सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता स्वतः उद्योग निर्मिती करून समाजातील इतर तरुण-तरुणींच्या हाती रोजगार उपलब्ध करून द्यावा यातून समाजाची प्रगती साधता येईल. म्हणून समाजाच्या उत्थानासाठी शिक्षण व उद्योगाची कास धरावी. असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे श्री.संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी तथा विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज उपवर – वधू परिचय मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
आयोजीत समाज प्रबोधन, स्मरणिका प्रकाशन, गुणगौरव तसेच उपवर – वधू परिचय मेळाव्यास बबनरावजी फंड ,रघुनाथजी शेंडे, प्रा. रमेश पिसे, डॉ. संजय बेले, पांडुरंगजी आंबटकर, भग्यावानजी खोब्रागडे,नामदेवराव वरभे, रीता उराडे, विलास विखार, थानेश्र्वर कायरकर, नितिन उराडे, अभय घटे, शैलेश जुमडे, डॉ सतीश कावळे, डॉ. प्रभुदास चीलबुले,राजेंद्र ठोंबरे, नात्थुजी कोल्हे, रामकृष्ण कामडी, नेहा सेलोकर, डॉ. अंजली वाडेकर व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपल्या समाजामध्ये दरवर्षी होणाऱ्या मेळाव्याचे मंथन केल्यास यातून समाजाची साधलेली प्रगती लक्षात घेता येईल. मी मंत्री असताना संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या पावन समाधी स्थळा करिता सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला. आपण सर्वांनी आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित करून त्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच यश मिळवण्यासाठी सामर्थ्यवान बनवावे. तर सरकारी नोकऱ्या आज संपल्यात जमा आहे म्हणून स्वतः उद्योजक बनून समाजाला विकासाची नवी दिशा द्यावी. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मला आपल्या समाजाने दिलेला भरभरून आशीर्वाद याचा मी सदैव ऋणी राहील. तेली समाजाच्या सभागृहाकरिता 1 कोटी विकास निधी मंजूर केला असून भविष्यात विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन समाजाशी एकनिष्ठ राहून कार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार विजय वडेट्टीवार यांचा तेली समाज बांधव व भगिनींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमास ब्रह्मपुरी तालुक्यासह परिसरातील बहुसंख्य तेली समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

