prabodhini news logo
Home नांदेड प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप

0
129

सरत्या वर्षाचा निरोप घेणे म्हणजे जीवनाच्या एका अध्यायाला सामोपचाराने निरोप देणे होय. हे वर्ष कधी आनंदाने फुलले तर कधी संकटांनी गांजले. प्रत्येक क्षणाने काहीतरी शिकवले घडवले आणि अनुभवसंपन्न बनवले. वर्षाच्या सुरुवातीला जी स्वप्ने पाहिली होती ती काही पूर्ण झाली तर काही अधुरी राहिली. पण तरीही सरत्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करणे हे जीवनाची सकारात्मकता जोपासण्याचा मार्ग आहे.

२०२४ हे वर्ष अनेकांसाठी आव्हानात्मक होते.कधी अडचणींनी ग्रासले तर कधी नात्यांमध्ये फुलवलेल्या प्रेमाने नव्या उंचीला नेले. जीवनाचा वेग वाढवत असताना कधी थांबून स्वतःला तपासायला हे वर्ष शिकवणारे ठरले. चुकांमधून मिळालेली शिकवण पुढील आयुष्याच्या वाटेवर प्रकाशझोत टाकणारी आहे.

तंत्रज्ञान नाती आणि स्वतःची ओळख यामध्ये घेतलेले छोटे मोठे निर्णय हे या वर्षाच्या स्मृतीत कायम राहतील. या वर्षाने दिलेले काही दुःख मनाला खुपले पण त्याचबरोबर त्यातून उभे राहण्याची प्रेरणा दिली. काही स्वप्नांना वाटचाल सुरू झाली तर काहींची दिशा पुन्हा शोधावी लागली.

आता नवीन वर्षाकडे बघताना जुन्या आठवणींना एक छोटीशी ओंजळ भरून ठेवायची आहे. त्यातील आनंदाचे क्षण उत्साह वाढवतील तर चुकांमधील शिकवण नवा अध्याय घडवेल. सरत्या वर्षाला निरोप देताना मनात कृतज्ञतेची भावना आहे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारीही आहे.

जुन्या वर्षाला नमस्कार आणि नवीन वर्षाला उत्साहाने हसून सामोरे जाणे हाच जीवनाचा खरा प्रवास आहे. चला या वर्षाला निरोप देऊया आशेच्या नव्या किरणांसह…. !!!

जयश्री वागरे/ धुतराज
शिक्षिका, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here