प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रकमल थिएटर प्रस्तुत, प्रा.डॉ.शेखर डोंगरे निर्मित- दिग्दर्शित, यश निकोडे लिखित ‘बायको पेक्षा मेहुणी बरी ‘या सामाजिक नाटकाचा प्रयोग सहा जानेवारी २०२५ ला मुरपार येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. ‘साली आधी घरवाली ‘अशी म्हण प्रचलित आहे.कौटुंबिक नात्यातील मेहुणी विषयीचे आकर्षण, जवळीकतेमुळे निर्माण होणारा पेचप्रसंग व कौटुंबिक कलह नाटककाराने या नाटकात दर्शविला आहे. नात्याच्या सीमा अबाधीत ठेवत मर्यादांचे उल्लंघन करू नये, हा संदेश नाटकात दिला आहे.
गैरवर्तन,प्रेमभंग, व्यसनाधीनता, स्वैराचार,कलावंतांची उपेक्षा, करिअरची धडपड, निर्मात्याकडून होणारे शोषण,लग्न न होण्याचे दुःख , वृद्धांची हेळसांड,कौटुंबिक छळ व अनैतिकता इत्यादी विषय या प्रयोगक्षम सामाजिक नाटकात दर्शविण्यात आले आहेत.
मधुकर व मनोरमा यांच्या सुखी कुटुंबात सौंदर्य ललना असलेली मधुकरची मेव्हणी रागीणीची एन्ट्री होते. तिच्या दिलखेचक अदांवर मधुकर भाळला जात आकर्षणाने तिच्याशी लग्न करतो. त्यामुळे तेढ निर्माण होऊन कुटुंबाचे विघटन होते. रागीणीही मधुकरची प्रिय असल्याने तिचे कुटुंबातील वर्चस्व वाढत जाऊन मोठी बहीण मनोरमा, सासू कलावती या सर्वांना छळते. दिनेश व झुलो यांच्याशी अपमानास्पद वागते. मधुकरला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवत सर्वांशी असभ्यपणे वागते. त्यामुळे स्नेह सबंध संपुष्टात येत कुटुंब कसे दुभंगते, हे दर्शविले आहे. तद्वतच मनोरमाला लहान बाळ छकुलीसह हाकलून दिले जाते; तेव्हा माणुसकी धर्म निभावात एकेकाळीतिने धिक्कारलेला तिच्यावर एकत्र पैसे प्रेम करणारा देवेनच तिला आश्रय देतो.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याकरिता उदयोन्मुखाची धडपड , त्यांचे होणारे शोषण हा विषय या नाटकातून नाटकात मांडला आहे. अभिनय नको तर केवळ कमी कपडे वापरणारे स्त्री कलावंत हवे आहेत. हे चित्रपट सृष्टीतील रमैय्याच्या संवादातून उपरोधिकपणे व्यक्त केले आहे. रागिणीचा तोरा वाढत जात ती सासूलाही घरातून हाकलून लावते . शेवटी प्रेमभंगांने अंतर्बाह्य पछाडलेला विजय मात्र रागिणीवर ऍसिड टाकून तिला विद्रूप बनवत आपल्याशी केलेल्या कृत्याचां बदला घेतो. हा रागिणीच्या विद्रुपतेमुळे मधुकर तिच्यापासून दूर होतो आणि मनोरमाकडे आकर्षिला जातो. सर्वतोपरी होत असलेल्या अवहेलनेच्या मनस्तापाने हवालदिल होत ती स्वतः चाकूने हल्ला करीत देह संपविते. तद्वतच मधुकरही पश्चाताप व्यक्त करीत स्वतःची जीवन यात्रा संपवितो.
कसलेले कलावंत ,गतिमानता, कौटुंबिक नाट्याशय, हलकीफुलकी आणि मजेशीर कॉमेडीमुळे बायको पेक्षा मेहुणी बरी हे नाटक रसिकप्रेक्षकप्रिय ठरले.
‘अनुभवलेला क्षण तो सुखाचा’, सांभाळ घसरल पाय गं’,’स्पर्श हा रेशमी सुटला हा गारवा’ , आठवणीने तुझ्या मी बेभान झालो, ‘चंद्र लाजुनी गेला पाहून सजनीला रूप देखने कसे ‘अशा सुमधुर आवाजातील गीत गायनाने नाटकात चांगलीच रंगत आणली.
नाटकातील संवाद ही विलक्षण आहेत.
रागिणी: एक घाव आणि दोन तुकडे , एक घाव तर आपोआप निघून गेला माझ्या मार्गातून .आता उरले फक्त दोन काटे ;पण काही हरकत नाही, कारण त्या दोन काट्यांना अगदी तांदळाच्या खड्याप्रमाणे अलगद उचलून फेकून देणारा आणि मग काय या संपूर्ण घरावर फक्त माझं राज्य असणार …”
ताई ही छकुली शांत नाही होत आहे .माझं डोकं दुखत आहे .हिला चूप कसं करू ताई. पुन्हा ओरडत आहे .माझं डोकं खूप दुखत आहे, एक काम करते ,हिला उचलून फेकून देते ,म्हणजे ही शांत होईल कायमची.”, ए थेरडे चल सामान उचल आणि हो घराबाहेर’ अशा 0 प्रभावी समाजातून खलप्रवृत्तीच्या रागिणीचे पात्र उठावदार होते.
देवेंद्र: दुनिया मे अच्छे लोगों को धोका और बुरे लोगों को मिलता है मोका “अण्णा: कालची स्त्री आणि आजच्या स्त्रीत भेद आहे. कालची स्त्री ही संघर्ष करणारी ,लढणारी होती; तर आजची स्त्री ही हतबल होत लवकर मृत्यूला कवटाळणारी आहे.”
अण्णा : रागिणी आज तू तरुण आहेस .तारुण्याचा सळसळता उन्माद आहे तुझ्यात. समुद्राला भरती ओहोटी येते दर अमावस्या पौर्णिमेला .माणसाला जन्म एकदाच लाभतो. त्याच्या जीवनात पण भरती ओहोटी येते फक्त एकदाच. हा तारुण्याचा दर्या सळसळला खवळला तर भरती येते जेव्हातारुण्याचा दर्या हळूहळू शांत होत जातो उन्माद संपत जातो. तेव्हा ओहोटी सुरू होते म्हातारपणाची. त्यावेळी माणसाजवळ काय शिल्लक असेल तर माणसाने तारुण्यात केलेला पाप -पुण्याचा हिशोब .पश्चातापाशिवाय काहीच शिल्लक नसेल . जर्जर शरीर आणि मनाशिवाय दुसरं एक माझं म्हाताऱ्याचं..”अशा भारदस्त अर्थवाही संवादातून नाट्य परिणामकारकपणे मांडले जात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.
नाटकातील विनोद हा महत्त्वाचा घटक आहे तसं हे नाटक विनोदी अंगाने सादर होत असल्यामुळे विनोदला विलक्षण महत्त्व आहे .विनोदवीर डॉ.शेखर डोंगरे व के.आत्माराम सर यांच्या जोडीच्या बहारदार केमिस्ट्रीने रसिकांना सदोदित हसवत ठेवले. टापरी गोदी, फलकवून, ४४० चा होल्ट ,धक्का, देवगाय, नमस्कार, काढ -, मिरची बाजूला सोड ,सांड अशा दिव्यार्थी वैशिष्ट्यपूर्ण शब्द उच्चारणाने मस्त हशा पिकतो. जो खाईन मुरा तो माणूस खरा, एक फुल दो माली, जिसे हम धुंडते है गल्लो गल्ली व हमारे घर में मिली’ अशा संवादांनी हास्योत्पादन होते.
प्रेमाचे चाळे करणारी भावजीला आपल्या प्रेम फासात अडकवत विवाह बंधनात अडकणारी, मनमौजी, स्वच्छंदी, सौंदर्यवती रागिणी (पौर्णिमा तायडे),
मुलींच्या जन्माविषयी प्रचंड नकारार्थी असलेला, सौंदर्याकडे झुकणारा, अविवेकी , स्वैराचारी,बदफैली मधुकर (स्वप्निल बन्सोड ), प्रामाणिक, विवेकी, सोशिक, काळजीवाहू,कुटुंबवत्सल मनोरमा (मनिषा देशपांडे)
शिस्तप्रिय, कजाग, सुनांवर वचक ठेवणारी कलावती (ज्ञानेश्वरी प्रभाकर), गरिबीमुळे विद्वत्ता असूनही लाथाडल्याचे शल्य बाळगणारा, मनोरमाच्या वेदनेने विवव्हळणारा,जबाबदारीची जाणीव असलेला सच्चा इंसान देवेंद्र (विश्वास पुरके) , दोन मुले चांगल्या पदावर नोकरीस असतानाही वृद्धत्वामुळे वेगळे ठेवतात, हेळसाड करतात यामुळे दुःखी असलेला,मनोरमाला आपली मुलगी मानणारा अण्णा (चिदानंद सिडाम), मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दगा दिल्याने प्रेमभंगाचे ,विरहवेदनेचे दुःखानें मनोरुग्ण झालेला , किंबहुना आपल्याशी गद्दारी करणाऱ्या प्रेयसीची खुन्नस काढणारा विजय (लोकेश कुमार), थोडा बावळट ,हरहुन्नरी ,विवाहोत्सुक, हजरजबाबी विनोदी झुलो (विनोदवीर के आत्माराम), कलानिष्ठा जोपासणारा कलावंत, दुष्कृत्य करणाऱ्यास पांघरूण न घालता प्रसंगी खडसावणारा, सजग, प्रयत्नशील ,आशावादी,जीवनवादी विनोदी दिनेश (प्रा.डॉ.शेखर डोंगरे) या कलावंतांच्या संवादातून घडणारे नाटक पाहत प्रेक्षक तल्लीन होतात. पंधरा वर्षानंतरही यश निकुडे यांनी लिहिलेले हे नाटक आजही झाडीपट्टी रंगभूमीवर सुरू आहे, यावरून या नाटकाचे दुरगामित्व, परिणामकारकता व यशस्विता लक्षात येते
वय कितीही असो परंतु खरा कलावंत हा भूमिका जिवंत कशा साकारतो, हे या नाटकातील कलावंतांनी साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांवरून प्रत्ययास आले. उदाहरणार्थ २२ वर्षीय तरुण दिनेश प्रा.डॉ.शेखर डोंगरे, ६५ वर्षीय म्हातारी ज्ञानेश्वरी प्रभाकर, रागिणी साकारणारी अभिनयसम्राज्ञी पौर्णिमा तायडे यांचा हटके,विविध भाव -छटांसह हुबेहूब कायिक,वाचिक, आहार्य अभिनयाने भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले.
या नाटकातून जसा मुलगा हा वंशाचा दिवा, वारस ,कुलदीपक म्हणून महत्त्वाचा आहे ;तसेच मुलगी ही सुद्धा धनाची पेटी, तूप रोटी म्हणून अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश दिलेला आहे. किंबहुना भारतीय स्त्रियांच्या इतिहासाकडे अंगुलीनिर्देश करीत संघर्षशील राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले,पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ,गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अंतराळवीर कल्पना चावला यांची उदाहरणे देत मधुकर मुलगी नको या मानसिकतेत असताना अण्णा पात्राद्वारे (चिदानंद सिडाम) केलेला उपदेश सजगतेबरोबरच सामाजिक संदेश देणारा आहे.शेवटचे कोणाला सांगू मी व्यथा’? हे रागिणीचे आक्रंदन अंतर्मुख करणारे आहे.
ऑर्गन रक्षितकुमार रामटेके, तबला हिरा मडावी , ॲक्टोपॅड धम्मदीप सोनटक्के यांची प्रसंगानुरूप लाभलेल्या संगीतसथीमुळे नाट्यप्रयोगात रंगत आली.विजय साऊंड सर्व्हिसची उत्तम ध्वनी व्यवस्था, हर्षल, प्रतीक आर्टची रंगभूषा, मिलिंद गोंगले, सुहास मंडलवार व नागसेन मेश्राम यांचे नाट्यप्रयोगासाठीचे सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले.
रागिणीचे मादकत्व व विविधांगी अदा-भावछटांसाठी,
मनोरमाचा सालसपणा व अस्वस्थता, झोलूचा उतावीळपणा व द्विअर्थी शाब्दिक कोट्या, कलावतीचा कजागपणा , रमैयाचे चित्रपटाकरिताचे ऑडिशन्स, स्क्रीन टेस्ट , दिनेशचा हजरजबाबीपणा व विनोदनिर्मिती अनुभवण्यासाठी तथा हास्य रसात भिजत स्वतःला विसरण्यासाठी’ बायकोपेक्षा मेहुणी बरी ‘ हे नाटक पाहायलाच हवे.
कुटुंबातील छोट्या विविध घटना प्रसंगातून उत्तम नाट्य फुलविले आहे. पारंपारिक झाडीपट्टी नाटकाच्या ढाच्यात थोडा बदल करीत गंभीर विषय विनोदी शैलीत उत्तम मांडला आहे. बायको पेक्षा मेहुणी बरी ?या प्रश्नाचे उत्तर नाटककार यश निकोडे यांनी देत समाजाला डोळस करत मिश्किलशैलीत मार्मिकपणे संदेश दिलेला आहे. यश निकोडे यांचे उत्तम लेखन आणि नटसम्राट प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांच्या कल्पक दिग्दर्शनामुळे नाट्य प्रयोग सरस ठरला.
प्रा.राजकुमार मुसणे, गडचिरोली

