अशोकनगर (फुलमोगरा) येथे अंधश्रद्धा निर्मूलन सप्रयोग व्याख्यान
जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
9665175674
भंडारा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 13 जानेवारी 2025 ला अशोक नगर (फुलमोगरा ) येथे ग्यानचंद ताराचंद जांभुळकर म्हणाले की, विज्ञानामुळे आत्मविश्वास दुप्पट होतो व जीवनाची प्रगती होते.
अध्यक्षस्थानी गोल्हर (माणिकराव सुखदेवे विद्यालय अशोकनगर) हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रियाताई पुरुषोत्तम शहारे (संघटिका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा), पियुष ठवरे (संचालक अस्तित्व व्यसनमुक्ती भंडारा) हे होते.
मार्गदर्शन करतांना जांभूळकर पुढे म्हणाले की, जगात भानामती, लावडीन, चटकीन नाही. जगात मंत्र, तंत्र, जादूटोणा नाही. जगात कुठलाही चमत्कार नाही. जगातल्या मांत्रिकाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आव्हान करण्यात येत आहे की, जर मंत्र व जादू अस्तित्वात असेल तर मांत्रिकाने किंवा जादूगाराने भाजलेला पापड मंत्राने किंवा जादूने मोडावा. अट एकच आहे की, पापडाला स्पर्श करायचा नाही. जर मंत्राने किंवा जादूने पापड मोडला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मांत्रिकाला रुपये 50 लाख चे बक्षीस देण्यात येईल.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे आव्हान आजपर्यंत कोणी स्वीकारलेले नाही कारण ह्या गोष्टी जगामध्ये नाही. संत कबीर म्हणतात, जत्रा मे बिठाया फत्रा, तीरत बनाया पाणी, दुनिया भई दिवानी सारी, पैसो की धूळदानी. संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानीयेले नाही बहुमता .
अंधश्रद्धा हा विषय स्पष्ट करण्यासाठी जांभूळकर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले व विद्यार्थ्यांना काही प्रयोग शिकविले उदाहरणार्थ हातावर कापूर जाळणे व जळता कापूर जिभेवर ठेवणे, सायकलचे स्पोक जिभेमध्ये आरपार टोचणे, तांदळाने भरलेला लोटा पेचकसने उचलणे, रुमालची गाठ सोडणे ,कानाला लावून चिट्टी मधले नाव ओळखणे इत्यादी.
कार्यक्रमाचे संचालन व आभार चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनम व त्यांची चमू यांनी अथक परिश्रम घेतले.

