लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 16 : महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्मीती करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व.खाशाबाजाधव (कुस्तीचे खेळाडू) यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविणे, यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
15 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विविध उपक्रमाअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावासाठी येणाऱ्या खेळाडू , क्रीडाप्रेमी , महिला तसेच जेष्ठ नागरीकांनीही सहभाग नोंदवला. या प्रसंगी राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये कर्मवीर ॲकॅडमी व कमान्डो ॲकॅडमीचे खेळाडू, खेलो इंडीया कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील कुस्तीपटू, तसेच नियमित व्यायाम करणारे नागरीकांनी रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
रॅलीचा समारोप जिल्हा क्रीडा संकुल येथील खुले प्रेक्षागृह येथे करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त बालाजी मरे, कृषी अधिक्षक भास्कर कोळेकर, गट विकास अधिकारी (मनरेगा) संताजी माने, प्रभू जाधव, बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य वसंत चव्हाण, से.नि.पोलीस उपनिरीक्षक गौतम कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर, कृष्णा केंद्रे, धिरज बावणे, बाबासाहेब इंगोले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले, तर आभार जयराज मुंढे यांनी मानले.
तसेच सायंकाळी जिल्ह्यातील विविध खेळाचे अंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय खेळाडू, उत्कृष्ट मार्गदर्शक यांचा राज्य क्रीडा दिनानिमीत्ताने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खेलो इंडीया कुस्ती केंद्र येथील खेळाडूंनी आणि जिम्नॅस्टीकच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विभागीय कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्या हस्ते सर्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, उत्कृष्ट मार्गदर्शक यांना स्व.खाशाबा जाधव यांची प्रतिमा व जीवन चरित्रावर आधारित ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

