सारथीमार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोफत प्रशिक्षण

0
38

3 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – दि. 17 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) शेतकरी कंपनीच्या गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क 5 दिवसीय निवासी क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 3 ते 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे नि:शुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, बाजारपेठ जोडणी, इक्विटी ॲक्ट, प्रस्ताव, शेतकरी उत्पादक कंपनी निगडित योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडित शासकीय अधिकारी व इतर भागधारक यांच्यामध्ये समन्वय साधने आदी सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी सारथीने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्याशी सहकार्य करार केलेला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे. विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://sarthimaharashtra.gov.in आणि https://mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशिक्षणाची सुविधा नागपूर येथे सारथीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,नागपूर विभागाचे डी. के. बेदरकर (9860869462) हे संपर्क अधिकारी आहेत. सदर प्रशिक्षण विनामूल्य असून त्यामध्ये प्रशिक्षण, निवास, भोजन, लेखन साहित्य व प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन, सारथीचे विभागीय कार्यालय नागपूर येथील उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here