आदिवासी युवक-युवतीं व महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन

0
79

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 10 तालुक्यातील सुशिक्षित, होतकरु बेरोजगार, युवक-युवती व महिलांना रोजगार तसेच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजना, योजनेच्या अटी व शर्ती तसेच तांत्रिक बाबींवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर ऋतुराज सुर्या, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजु नंदनवार, पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य प्रबंधक कुमारील आदित्य, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक पंकज भैसारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक विवेक येसेकर, इंडस्ट्रियल इंस्पेक्टर शालु घरत आदींची उपस्थिती होती.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात प्रथमच स्वयंरोजगारांना मार्गदर्शन करण्यासाठी बँक प्रमुख व उद्योग केंद्रांना एकाच व्यासपीठावर आणत आदिवासी स्वयंरोजगारांना उद्योग उभारणीसाठी असणाऱ्या विविध संधीची माहिती देण्यात आली. यावेळी राचेलवार म्हणाले, मार्गदर्शन शिबिरातून आदिवासी समाजातील युवक-युवती व महिलांना विविध स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. उद्योग उभारणीतून स्वयंरोजगार निर्माण करण्याची प्रक्रिया एकांगी न राहता जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या सहभागातून सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व सुलभ पार पाडावी हा मुख्य हेतू आहे. आदिवासी सुशिक्षित बेरोजगार, तरुण-तरुणींना छोटे-मोठे उद्योग उभारतांना शासनस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच योजनांचा लाभ मिळण्यासाठी अवलंबविण्याची विहित पद्धती, योजनेसाठीची कागदपत्रे, तसेच सर्वतोपरी पाठपुरावा करण्यासाठी प्रकल्प कार्यालय स्वयंरोजगार, उद्योजक, जिल्हा उद्योग केंद्र व बँकांमध्ये मध्यस्थ राहील, असेही ते म्हणाले.

जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर ऋतुराज सुर्या यांनी युवक-युवतींच्या स्वयंरोजगारास पुरक वातावरण तयार करून त्याद्वारे ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जात आहे. यासाठी योजनेचा अटी, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प किंमत व अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजू नंदनवार यांनी एखादा प्रकल्प उभारतांना आवश्यक कागदपत्रे, अटी च शर्तीची पूर्तता केल्यानंतर बँकेद्वारे विनाविलंब कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याबाबत स्वयंरोजगार उभारणी कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी मदत करणे, याबाबत सूचना प्रदान करण्यात आलेल्या आहे. बँकेद्वारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचा फायदा नव स्वयंरोजगारांना होत आहे. यावेळी उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निरसन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here