प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कला दर्पण नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत परमानंद गहाणे निर्मित- दिग्दर्शित रमेश आळे लिखित संगीत टिळा कुंकवाचा या नाटकाचा प्रयोग १६जानेवारी २०२५ रोज गुरुवारला बालमित्र नाट्य मंडळ आयोजित परसोडी, जिल्हा गोंदिया येथे संपन्न झाला.
सामाजिक, हृदयस्पर्शी, कौटुंबिक’ टिळा कुंकवाचा’ या नाटकातून कुटुंबातील विविध खाचखळगे व माणसातील वृत्ती- प्रवृत्तींचे चित्र उत्तमरीत्या दर्शविले आहे.
रजनीकांत या नामांकित कंपनीचे मालक चंद्रकांत श्रीमंत हे पैशाच्या गुर्मीत वावरणारे, त्यांचा ऐश्वर्य संपन्न कुटुंबातील एकुलता एक लाडका मुलगा करण हा हव्याशी ,मनमौजी, ऐश करणारा वाढदिवस, पार्टी आनंद उपभोगण्याकरिता तब्बल पन्नास हजाराची मागणी वडिलाकडे करून लावणीवर पैसे उडविणारा आहे. रजनीकांत हे पहिल्या पत्नीच्या सावळ्या मुलीची विद्याची पांढऱ्या पायाची ,काळतोंडी म्हणून प्रचंड निर्भत्सना करतात. करोडपती असूनही तिला शिक्षणाकरिता केवळ परीक्षा फी ही न देता कॉलेज बंद करतात. मुलींचे शिक्षण बंद करणारे व मुलाच्या हव्यासासाठी प्रचंड पैसा खर्च करणाऱ्या चंद्रकांतच्या या द्विधा मनोवृत्तीचे दर्शन नाटकातून घडते. सावत्र मुलीच्या भीतीपोटी कावेबाज रजनी श्रीमंत चंद्रकांत यांना सर्व संपत्ती एकुलता एक लाडका सुपुत्र करण च्या नावे करण्याकरिता प्रवृत्त करते .निस्वार्थ भावनेने श्रीमंत चंद्रकांत वारसान पत्रावर स्वाक्षऱ्याकडून सर्व संपत्ती करणला बहाल करतात. मंजिरीवरील निस्सीम प्रेमाला चंद्रकांतने लाथाडल्यामुळे प्रेमभंग आणि विरहवेदनेने व्याकुळ व जखमी झालेला रसिक हा किंग कोब्रा बनत चंद्रकांतच्या सुडाच्या भावनेने पेटून उठतो. त्याच्या कटात कजरी, रुद्रा सहभागी होतात आणि श्रीमंत घराण्याला खिंडार पाडण्यासाठी नाटक रचतात व यशस्वीही होतात.करणचे लावण्यवती नर्तिका कजरीवर प्रेम जुळते तिला तो पत्नी म्हणून आपल्या वाड्यात घेऊन येतो. कजरीला ऐश्वर्य संपन्नतेचा अहंकार आणि सौभाग्याचा अभिमान वाढत जाऊन सासूकडून तिजोरीच्या चाव्या हिस्कावते. घरच्या लोकांना सुट्टी देऊन श्रीमंत चंद्रकांत व श्रीमंत रजनी यांना ती घरकामात गुंतवते. सर्व कामे त्यांच्याकडून करून घेत पदोपदी अवहेलनेने अपमानास्पद वागणूक देते.. मारहाण करते, त्यांचा प्रचंड तिरस्कार करून घरातून हाकलून देते .प्रसंगी चंद्रकांत यांची दुरावस्था होत हाती कटोरा घेण्याची पाळी येते. अशावेळी सावत्र मुलगी विद्या वडिलांप्रती जिव्हाळ्याने वर्तन करीत साथ देते. विद्यावर गुंडानी पाशवी अत्याचार केल्याने ती पागल होते.कजरीने लग्नास नकार दर्शवितात बेभानपणे रुद्रा विद्यावर बलात्कार करतो शिवाय रजनीकांत फॅक्टरीला आग लावतो. वैफल्यग्रस्ततेने चंद्रकांत स्वतः विष प्राशन करतो व विद्यालाही विष पाजतो.
मंजिरीने एका लावारिस बाळाला रस्त्यावर ठेवून विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपविण्यापासून सुरू झालेले हे नाटक तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशात खरी पात्रे कोणती आणि त्यांच्या भूमिका काय आहेत हे दर्शवत संपते. अन प्रेक्षकालाही विचारप्रवृत्त करते.
“मरनात रात गेली ,सरनात दिस गेला, मरणाच्या दारी माझा तेथे हशाच झाला, बदनाम जरी झालो जिणे विकुन आलो ,सारेच म्हणती मला तो, तो, तो, बघा किंग कोब्रा… कोब्रा आला कोब्रा आला” रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणारे हे किंग कोब्राचे संवाद लक्षणीय आहे. सुनील कुकडकर यांनी तेलगू संवाद , पेहरावाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने किंग कोब्रा परिणामकारकपणे साकारला आहे.
रुद्रा : ‘ज्याच्यावर हात पडला तो जमिनीवर गाडला, अशा संवादातून नाट्य परिणामकारकपणे घडते.
विनोद: नाटकात प्रसंगनिष्ठ विनोद प्राधान्याने आढळतो . कुकरा, भुरका ,मारखाचा डिप्लोमा, पावर, अटक्या, फलकवतो, सतरा किका मारून भंगार केलेली गाडी अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चाराने विनोद निर्मिती होते . अलख निरंजन, सप्पा जिंदगी झेंडू झाली आहे, फुकनी नंदन लोकाले लावतो चंदन, फोकणाड्या अशा शब्द उच्चाराने प्रेक्षकात हशा पिकतो.तद्वतच तोतडे बोलणारी सखी, भोंग्या आणि जाण्या या त्रिकुटातील विसंगतीपूर्ण संवाद हास्योत्पादकास कारणीभूत ठरतात.
रजनीकांत या कंपनीचे करोडपती मालक जे पैशाच्या गुर्मीत वावरणारे चंद्रकांत अमित आत्राम यांनी देहबोलीसह उभा केला.
पैशाचे उधळपट्टी करणारा हव्याशी ,मनमौजी करण परमानंद गहाणे यांनी प्रभावी संवादफेक व संयत अभिनयशैलीने साकारला आहे. तद्वतच कंपनीचे करोडोचे नुकसान झाल्यामुळे बेचैन होणारा करण
श्रीमंत रजनी प्रतिभा साखरे यांनी शालिनतेसोबतच धुर्त कावेबाजपणाच्या छटांसह तर दुय्यमत्वाच्या तिरस्कार अवहेलनेच्या झळा आयुष्यभर सोसूनही स्नेह समत्वाचा माणुसकीचा झरा सावळी सावत्र विद्या पूजा मून हिने हुबेहुब वटविली आहे. तिची पागलपणाची भूमिका निश्चितच वाखाणण्यासारखी.अनाथत्वाचे दान पदरी पडले असतानाही वंचित, उपेक्षितच्या यातना भोगत अन्नाच्या आश्रयास वाढलेली कजरी सोनाली निस्ताने दिलखेचक अदांनी करणला मोहित करते. मनी- मानसी बाळगलेल्या सौभाग्याच्या स्वप्नाची पूर्तता झाल्यानंतर अक्षता नाम धारण करीत सर्व श्रीमंत कुटुंबाची सत्ता सूत्रे आपल्या हाती घेणारी अक्षता सोनाली निस्ताने यांनी भारदस्त आवाज, बोलका चेहरा ,चपखल शब्दफेकीने जिवंत अभिनयाने साकारली.
प्रेमभंगाचे दुःख पदरी पचवत प्रेयसीच्या निधनाच्या यातना भळभळत्या जखमेसह उरी बाळगत, माणुसकी धर्म निभावत, पूर्व आयुष्यातील सुडासाठी दृष्टता अंगीकारत बदल्यासाठीआसुसलेला कोटीचालक किंग कोब्रा नटवर्य सुनील कुकडकर यांनी आंगिक व वाचिक अभिनयाच्या सिद्धहस्त शैलीच्या लक्षवेधकतेने प्रेक्षकांना आकृष्ट करण्यात यशस्वी ठरले.
गरीब मुलीवर निस्सीम प्रेम करणारा व आनंददायी जीवनाचे स्वप्न पाहणारा प्रामाणिक प्रियकर रुद्रा हे विलक्षण पात्र सिने. किरणकुमार यांनी वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने साकारत नाटकाची रंगत वाढवली. दारुडा जाण्या वेगवेगळ्या क्लूरूप्त्याच्या माध्यमातून वेशांतराने लालू पेंदाम यांनी तर सातत्यपूर्ण तोतडे बोलत प्रेक्षकांना आकृष्ट करण्याबरोबरच दमदार अभिनय शैलीत सखी वर्षा राऊत व भोग्या अविनाश पाटील यांनी हावभाव व वैशिष्ट्यपूर्ण संवादाने या तीनही विनोदवल्लीने नाटकात वारंवार विनोदाचे फवारे उडवत चांगलीच रंगत आणली.
टिळा कुंकवाचा या नाटकातील ज्यानं बांधलं घरटं, नाही विसावा जीवाला, चोरीचा मामला.. तूच माझी सखी, आज राखीचा सण. आयुष्य मिळू दे माझ्या भावाला, तळहाताच्या फोडाप्रमाणे अरे लेकरा जपले तुला मी ‘पोटासाठी वन वन फिरता भोग असे नियतीचा आई तुझ्या विना जग सुना तूच देवी देवता ही ‘ या आशयवाहक नाटकातील परिणामकारक गीतांनी रसिक प्रेक्षक अंतर्मुख होतो.
सुटली थंडी गुलाबी नैना माझे शराबी,’तुझी बघून जवानी काळजाच झाले पाणी पाणी’ या लावण्या व ‘बिनकामाचे भांडण आपल्या दोघं मिळून मिटवून घे ना तुझं माझं जमेना तुला मला बी करमेना’ यासारख्या विनोदी गीताने नाटकात चांगलीच रंगत आणली. रवी मेंढे यांचे पार्श्वगायन व आर्गन वादन संजय राऊत यांचा तबला, विश्व दास यांचा कीपॅड आणि कुंदन शेंडे यांचे प्रयोग सहाय्य, लक्ष्मी डेकोरेशनची ध्वनीव्यवस्था आणि ज्योती आर्टचे नेपत्य नाटकास लाभले.
नाटकातील कथानक सर्वसामान्य कुठेही घडू शकेल अशा स्वरूपाचे आहे. स्वार्थ या भोवती या नाटकाची गुंफण झालेली आहे. करण प्रेमासाठी, विद्या वडिलांच्या प्रेमासाठी, रुद्र प्रेमासाठी, कजरी नर्तकीच्या नरकयातना संपवून चांगले जीवन जगावे या स्वार्थासाठी, रजनी संपत्ती आपल्या मुलालाच मिळावी या स्वार्थासाठी ,अर्थातच स्वार्थ या केंद्राभोवती संपूर्ण नाटकाची आखणी प्रामुख्याने झालेली आहे.नाटकातील पात्रे ही परिस्थितीने आपबीतीने खलनायक बनलेली आहेत. अस्सल खल प्रवृत्तीची ती दुष्ट नाहीत परंतु वाट्याला आलेल्या भोगवट्यामुळे त्यांच्या स्वभावातील परिवर्तनातून चोखाळलेल्या मार्गाने ते दुष्टतेकडे वळतात.
खलनायक वाटणारी पात्रे मात्र नाटकाच्या शेवटी अविचारी, खल प्रवृत्तीचा नाहीत . हे लक्षात येते. किंबहुना गैरसमज व परिस्थितीमुळे खलप्रवृत्ती अंगीकारल्याचे प्रत्ययास येते.पूर्व आयुष्यातील बदल्याच्या भावनेतून दुष्टतेचा मार्ग चौखाळणाऱ्या या पात्रांमधील मनोभूमिका निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुलगी सावत्र असली तरी मात्र ती आपल्या रक्ताचीच आहे ,तिच्यातील चांगुलपणाचे दर्शन नाटकातून घडते.प्रत्येक पात्र विनोदही निर्माण करतात आणि गंभीरताही दर्शविणारी आहेत.टिळा कुंकवाचा या नाटकातून प्रामुख्याने कजरीला कोटीतील नरक यातनातून मुक्त होत,आपले सौभाग्य अबाधित रहावे म्हणून समाजात मानाचे स्थान मिळावे, यासाठी कुंकवाचा टिळा महत्त्वपूर्ण होता. स्वार्थ,श्रीमंतीचा अहंकार ,शोषण, छळ, प्रेमभंग, मुलगा आणि मुलगी यातील दुय्यमत्व, बेदखलपणा , वारसा विषयीचा निर्णय ,सूड, बदला, कटकारस्थान अशा अनेक विषयांना कवेत घेणारे हे नाटक आहे. प्रसंगी पात्र एकमेकांना कटातून बाहेर काढण्यासाठी सजगही करतात. रुद्रा कजरीला नर्तकीच्या आयुष्याची आठवण करून देते हे केवळ आपले नाटक आहे हे याची जाणीव करून कजरीला घरंदाज घराण्याची सून पडल्यानंतर मात्र पूर्व आयुष्यातील त्या नरकयातना नकोशा वाटतात. अर्थातच पात्रातील सूक्ष्म बारकावे नाटककाराने व कलावंताने उत्तम दर्शविले आहे.समाजाभिमुख नाट्याशय, कसलेले कलावंत, गतिमानता, प्रांजळ विनोद, प्रभावी दिग्दर्शन, प्रत्येक पात्रातील आंतरिक मनोभूमिका दर्शविणारे पात्र या वैशिष्ट्यामुळे टिळा कुंकवाचा हे नाटक उत्तम झाले .
संपत्तीचा अहंकार दीर्घकाळ टिकत नसतो अशा दुर्दैवी बापाची व्यथा, सावत्र मुलीतील चांगुलपणा, प्रेमभंगाची व्यथा, निर्ढावलेली सून, यातना भोगणारी सासू, भीक मागणारा श्रीमंत , चंद्रकांतचा विलाप , रजनीचे आक्रंदन, विद्याचे बेदखलपनाची व्यथा, प्रेमात आंधळा होत जीवनाची वाताहत करणारा करण तद्वतच ‘जगणार तरी कुणासाठी जगून तरी काय करणार’? कोणीही कुणाचं नसतं ? या प्रश्नाच्या शोधासाठी ‘टिळा कुंकवाचा ‘हे नाटक अवश्य पाहायलाच हवे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

