चंद्रपूरमधून निर्यातदार तयार व्हावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

0
69

महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेंशनचे उद्घाटन

चंद्रपूर प्रतिनिधी प्रणित तोडे – दि. 23 : चंद्रपूर हा खनीज आणि वनसंपत्तीने समृध्द जिल्हा असून त्यावर आधारीत उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय धान, कापूस आणि सोयाबीन ही पिके सुध्दा जिल्ह्यात घेतली जातात. निर्यात क्षमतेसाठी अतिशय चांगले वातावरण जिल्ह्यात असून या जिल्ह्यातून किमान पाच निर्यातदार तयार व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केली.

जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर च्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेंशनचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या सहायक संचालक स्नेहल ढोके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, इंडिया पोस्टचे रामकृष्ण, एसएमई फोरमच्या संचालक उर्वशी वुथू, मिनाक्षी बागडे, सुनील कुलकर्णी, अक्षय गोंदाणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यातील उत्पादन निर्यात करून त्याचा लाभ स्थानिक उद्योजकांना, शेतक-यांना व्हावा, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने निर्यातीला चालना दिली आहे. शासनाच्या निर्यात धोरणाला वृध्दींगत करणे, स्थानिक उद्योजकांच्या शंका – कुशंकांचे निरसन करणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्यातीकरीता चंद्रपूरमध्ये अतिशय चांगले वातावरण आहे. बांबू आधारीत वनउपज व कृषी उत्पादनसुध्दा जिल्ह्यातून निर्यात होऊ शकते. त्यामुळे येथील शेतकरी आणि कामगारांना चांगला लाभ मिळेल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

तत्पुर्वी जिल्हाधिका-यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग संबंधित विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मधुसूदन रुंगठा, डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीयल असोसिएशनचे प्रवीण जानी, राईस मील असोसिएशनचे श्री. कोंतमावर यांच्यासह नामांकित निर्यातदार, निर्यात इच्छुक उद्योजक, तरुण, तरुणी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here