मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी, संचलन प्रमुख कमांडर सुमितसिंग चौहान यांच्या नेतृत्वात झालेल्या संचलनात, देशाच्या तीन प्रमुख सशस्त्र दलांची वाहने, तसेच गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृह रक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) वाहने, व मुंबई शहरातील विविध शाळांच्या पथकांचा समावेश होता. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांनीही जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह यावेळी संचलनात सहभाग घेतला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

