प्रा. राजकुमार मुसणे
ज्ञानेश चित्रचे कलाश्रृंगार थिएटर्स वडसा प्रस्तुत संदीप कुरवटकर निर्मित, सिने.मोरूभाऊ खर्डेकर दिग्दर्शित, संतोष मोरे लिखित’ भाऊ माझा पाठीराखा’ नाटकाचा प्रयोग आशीर्वाद नवतरुण कला मंचच्या सौजन्याने २८ जानेवारीला इल्लूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही भावाने समर्पित भावनेने बहिणीचे संगोपन करून तिच्या अभ्यूदयासाठी स्वतःच्या इच्छा- आकांक्षांना तिलांजली देत निभावलेले कर्तव्य,स्वतःचे आयुष्य चंदनापरी झिजवत बहिणीच्या सुखासाठी सर्वस्वाच्या त्यागाची,समर्पित भावाची यशोगाथा म्हणजे’ भाऊ माझा पाठीराखा’ हे नाटक होय.
‘आधी पूजेचा मान तुला रे करितो तुजला वंदना.. गजानना रे गौरीच्या वंदना ‘ या नांदीने सुरू झालेले नाटक ‘व्यथा कुणाची, सांगू कुणाला, दुःख आले या नशिबाला,… भाऊ माझा पाठीराखा’ या नाट्याशय प्रभावीपणे व्यक्त करणाऱ्या पार्श्वगीताने प्रेक्षकांना डोळस व अंतर्मुख करीत संपते.
बहिण भावाचे नाते, प्रेम, त्याग,समर्पण, आत्मीयता, जिव्हाळा, शेतकऱ्यांचे कष्ट,दुःख ,व्यथा, वेदना, सावकाराकडून शोषण ,बलात्कार , गरोदर माता, कर्जबाजारीपणा, कावेबाजपणा, वासनांधता, अन्याय – अत्याचार,समाजातील दुष्प्रवृत्तीच्या दर्शनाबरोबरच अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या रणरागिणीच्या कर्तुत्वाची गाथा या नाटकातून दर्शविली आहे.
सावित्री आणि बबन या शेतकरी कुटुंबीयांच्या शेजारी राहणारे सपना आणि राहुल या भाऊ बहिणीचे घर. दारिद्र्य पाचवीला पुजलेले असतानाही राहुलने आई-वडिलांच्या निधनानंतरही बहिणीचे तीन वर्षाची असतानापासूनच तळहातावरच्या फोडाप्रमाणे उत्तम संगोपन केले. तिचे शिक्षणही व्यवस्थित पार पाडले. तारुण्यात पदार्पणानंतर लग्नाची बोलणी सुरू असताना मात्र दुष्ट प्रवृत्तीच्या विश्वनाथ ठाकूर पाटील, मुनीम आणि त्याचा हस्तक नाना या तीनही वासनांध नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. बलात्काराच्या प्रसंगाचा मनावर खोल परिणाम झाल्यामुळे सपना स्व अस्तित्व हरवत पागल होते. बहीण मनोरुग्ण झाल्यामुळे भाऊ राहुल त्रस्त होतो. बहिणीला सावरण्याकरिता भावाचा आटापिटा आणि बहिणीवर अत्याचार करणाऱ्यांचा सूड उगवण्याकरिता त्यांने वेषांतरने केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.
गरीबाच्या संपत्तीचे शोषण करून श्रीमंत झालेला पाटील विश्वनाथ ठाकूर प्रचंड अहंकाराने गरीबांवर सर्व बाजूने अत्याचार करतो. बबन्या सातबारा मागतो, नाही दिला तर पोलिसात तक्रार करण्याची भाषा करतो, राहुल बहिणीचे लग्न करतो , हे त्याला खटकते. पंचक्रोशीतील आपला दरारा कमी होत असल्याचे शल्य बोचते. प्रचंड आगपाखड करीत आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा सर्वनाश करण्याकरिता खवळलेला पाटील सरसावतो. त्याच्या क्रूरकर्मात नाना व मुनीम साथ देतात. अन्यायाचा अतिरेक टोकाला पोहोचल्यामुळे हैराण झालेला राहुल आतून पेटून उठतो. दुसरीकडे सावित्री आईवर झालेल्या अत्याचाराने चमेलीही हैराण होते. सूड उगवण्यासाठी चमेली चंपा नर्तकी तर राहुल तिरप्या महिला वेष धारण करून अत्याचारी मुनीम,विश्वनाथ ठाकूर पाटील व नानाला संपवित अन्यायाचा बदला घेतात. एकंदरीत समाजातील विविध दुष्पवृत्तीचे दर्शन या नाटकातून होते. तर दुसरीकडे बहिणीसाठी त्याग करणाऱ्या भावाचा महिमा दर्शविला आहे.तसेच गरोदर असलेल्या सपनाचा कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर सुदेश तर चमेलीचा राहुल स्वीकार करतात. यातून सत्प्रवृत्तीही दर्शविली आहे.
नाटकातील विनोदही महत्त्वपूर्ण आहे. विनोदवल्ली हर्षल राऊत यांनी शब्दनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदातून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवत ठेवले. ‘नाही सांगू जी ‘,’मस्त लागली का जी’ अशा गमतीदार संवादाने व काटा टोचणे, दोन फागुट्याचा काटा , सनसन -लपलप ,जीएसटी, नवलगोल ,पपई, दुधी ,लवकर, किस करतो, दन्न दुधी सन्न वडे अशा हास्योत्पादक शब्दोच्चाराने पेक्षागृह हसले.
नाटकातील गीतेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत .’माझा शेतकरी दादा, आहे जगाचा पोशिंदा, दिनरात कष्टकरी, ‘ ‘भाऊ माझा पाठीराखा’,’ माता भी तू पिता भी तू ,बहिणा अभिमान मेरा भगवान हो ‘, ‘आसही विझली या देहाची सरली कहाणी स्त्री जन्माची ‘,’सांग मजला सांग देवा काय गुन्हा मी केला.?’ या आशयसंपन्न गीतांनी स्वरबहार मंगल म्हशाखेत्री व पार्श्वगायक अखिल भसारकर यांच्या सुमधुर गायनाने नाट्याशय परिणामकारकपणे व्यक्त झाला. तसेच ‘आहे अधुरा मी तुझ्याविना समजून घे सखे साजणे हट्ट सोड गं,”, हिऱ्यानं ,मोत्यानं , चांदीनं सोन्यानं ,तुलाच मढवीन ,या राजाची राणी मी तुलाच बनवीण,” गं तुझं पाहुणी रूप सखे गेलो मी मोहून तू लाखात आहेस देखणी ग साजणी’, अशा विनोदी गीताने तसेच ‘तारुण्यात न्हाहुनी आली तुम्हासाठी केला मी शृंगार आज’,’ चमचम करती चांदणी मी तर तुमची मोहीनी, शुक्राची चांदणी ‘ या लावण्यांनी नाटकात चांगलीच रंगत आणली.अन्यायी, अत्याचारी, अहंकारी जमीनदार दुष्पवृत्तीचा पाटील विश्वनाथ ठाकूर (मंगेश पोडे ),वैशिष्ट्यपूर्ण लकबीने गरिबांचे शोषण करणारा धुर्त मुनीम ( संदीप कुरवटकर ),खटकेबाज संवादाने दरारा निर्माण करणारा अत्याचारी नाना ( मोरू खर्डेकर), राबराब राबणारा शेतकरी बबन (विशाल गौरकर), सोशिकवृत्तीची सावित्री (उषा मुळे), बहिणीसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा समर्पित भाऊ राहुल (संतोष मोरे), सहनशील सपना (लता निंदेकर), स्वबळावर परिश्रमाने शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी बनलेला कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर सुदेश राठोड (स्वरबहार मंगल म्हशाखेत्री),आपल्या दिलखेचक अदाकारीने मोहित करणारी रणरागिणी चमेली (प्रीती डोंगरवार ), नृत्यांगना राधा (सुप्रिया ढोरे) या कलावंतांच्या संवादातून नाट्य उलगडले. किरकोळ चुका वगळता कलावंतांचा प्रयत्न चांगलाच होता.आर्गन मास्टर लोकेशकुमार दुर्गे, तबला नरू शेंडे, ॲक्टोपॅड मिलिंद मेश्राम , प्रयोग सहाय्यक संदीप चौधरी, व्यवस्थापक दामोधर शेंडे आणि पार्श्वगायक स्वरबहार अखिल भसारकर यांच्या संगीत साथीमुळे नाट्यप्रयोगात चांगलीच रंगत आली.नवखेपणाच्या खुणा दिसत असल्या तरी विशेषतः हौशी कलावंतांची व्यावसायिकतेकडे होणारी वाटचाल निश्चितच अभिनंदनीय आहे. प्रामुख्याने विविध जबाबदाऱ्या सांभाळतही नाट्य क्षेत्राची कोणतीही पूर्व पार्श्वभूमी नसतानाही स्वकर्तुत्वाने संदीप कुरवटकर यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या व्यावसायिक मंडळातील स्पर्धेत निर्माता म्हणून केलेला प्रवेश निश्चितच दखलपात्र आहे. संदीप कुरवडकर यांचे कार्य अभिनंदनीय आहे.
पाटलाचा रुबाबदारपणा, मुनीमची लकब, नानाची प्रभावी संवादफेक, कर्तव्यतत्पर, बांधिलकी असणाऱ्या सुदेशचे सुमधुर गायन, विनोदवल्ली हर्षलचे हास्याची फवारे, चमेलीच्या बिनधास्त अभिनयाने’ भाऊ माझा पाठीराखा’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. एकंदरीत बहिणीसाठी समर्पित भावनेने नाते निभावणाऱ्या भावाचा महिमा दर्शविणारे ‘ भाऊ माझा पाठीराखा’ हे कौटुंबिक व सामाजिक नाटक आहे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

