स्मृतीशेष यमुना ताराचंद जांभुळकर स्मरणार्थ विद्यार्थ्यांना रोख बक्षीस
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
9665175674
भंडारा – सेवानिवृत्त शिक्षक ग्यानचंद ताराचंद जांभुळकर यांचे वतीने दिनांक 26 जानेवारी 2025 ला प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी व जिल्हा परिषद हायस्कूल चिचाळ या दोन्ही ठिकाणी स्मृतीशेष यमुना ताराचंद जांभुळकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यातआले. ह्याप्रसंगी मोहाडी येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जागेश्वर समरीत (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) हे होते. तर चिचाळ येथे अध्यक्षस्थानी उपसरपंच जगतराम गभने हे होते.
ग्यानचंद ताराचंद जांभूळकर हे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित आहेत. तसेच ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडाराचे उपाध्यक्ष आहेत. दरवर्षी ग्यानचंद जांभूळकर यांचे तर्फे विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात येते. जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथून जो विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवितो त्यांना 500 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येते. यावर्षी श्रेयश भीमराव रामटेके यांनी शंभर पैकी 92 गुण मिळवून प्रथम आला. त्या विद्यार्थ्याला रुपये 500 चे बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद हायस्कूल चिचाळ येथून कुमारी तन्नू प्रकाश देशमुख ही विद्यार्थिनी 100 पैकी 87 गुण मिळवून शाळेतून प्रथम आली तिला सुद्धा र पाचशे रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले.
जांभुळकर हे आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथून सेवानिवृत्त झाले त्यावेळेस दरवर्षी हे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच जिल्हा परिषद हायस्कूल चिचाड या ठिकाणी ते दहा वर्ष सेवेत होते तिथे सुद्धा त्यांनी सदर बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.
जांभुळकर हे विविध सामाजिक संघटनेशी जुळून आहेत. मागील 25 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते कार्य करतात.ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. आजपर्यंत त्यांनी एक हजार गावांमध्ये व शाळेमध्ये सामाजिक प्रबोधनाचे कार्य केलेले आहेत. आपल्या कार्यक्रमांमधून ते समाजाला उद्बोधन करीत असतात. समाजाला फुले, शाहू, आंबेडकर तसेच संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांचे विचारांची किती गरज आहे ते लोकांना पटवून देत असतात. निरोपयोगी रूढी परंपरांचे स्त्रोत त्यांना मान्य नाही.जे संस्कार महत्त्वाचे आहेत तेच करावे ज्या संस्काराची गरज नाही ते संस्कार आपल्या जीवनामध्ये करू नये .रूढी परंपरेला फाटा द्यावा व अनिष्ट रूढी परंपरा समाजातून संपले पाहिजे असे त्यांचे मत आहे.
अनावश्यक खर्च टाळून त्यांनी चप्राड ( सोनी ) ता.लाखांदूर या आपल्या गावी बौद्ध समाजाला आपले स्वलिखित 450 पुस्तक सप्रेम भेट दिले होते. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांचे सामाजिक कामे चालूच आहेत .ते स्वतः कवी ,लेखक, गायक, सामाजिक प्रबोधनकार व चांगले व्याख्याते आहेत.अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सामाजिक व्याख्यान देण्यासाठी जात असतात. समाजाची, सामाजिक कार्याची जाण असलेल्या लोकांनी असे कामे नेहमी करीत राहावे तेव्हाच समाज सुसंस्कृत व जिवंत राहू शकतो.
जिल्हा परिषद हायस्कूल चिचाळ या ठिकाणी ध्वजारोहक म्हणून सविता बिलवणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रमेश काटेखाये यांनी केले. संचालन प्राध्यापक समाधान बोरसे व मंजुषा लोंदासे यांनी केले. आभार प्राचार्य ढवळे यांनी मानले.जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथील प्रास्ताविक प्राचार्या पांडे यांनी केले.संचालन ओमप्रकाश गायधने यांनी केले.तर आभार नामदेव साठवणे यांनी मानले.

