छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या – आ. किशोर जोरगेवार

0
42

मनपा अधिकाऱ्यांची बैठक, अधिकारी यांना सूचना

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर- चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याची चंद्रपूरकरांची भावना आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कामाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने आता या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या तातडीने घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसंदर्भातील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीस कोणताही अडथळा येऊ नये आणि ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना आमदार जोरगेवार यांनी केली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे अश्वारूढ स्मारक चंद्रपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहिल्यास तो येथील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरेल. त्याचबरोबर, नव्या पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल. शिवप्रेमी आणि शहरातील नागरिकांनी या स्मारकासाठी मोठा पाठिंबा दिला असून, लवकरच हे काम पूर्ण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधावा, सर्व प्रकारच्या परवानग्या आणि तांत्रिक बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेने या कामाची प्राथमिक पातळीवरील कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आणि नागरिकांच्या सहकार्याने लवकरच हा पुतळा उभारला जाईल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

बंगाली कॅम्प येथे होणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

चंद्रपूरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे बंगाली कॅम्प येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या संदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून उर्वरित असलेल्या वाहतूक विभागाच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here