पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
36

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ११ – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन तत्त्वज्ञान मांडले. यांच्या या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची आणि पर्यायाने मानवजातीच्या कल्याणाची बिजे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील भुलाबाई देसाई मार्ग येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ यांनी आपले सर्व जीवन राष्ट्रकार्यासाठी व्यतीत केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील गरीब जनतेच्या विकासासाठी करत असलेल्या कामांची प्रेरणा ही पंडित दीनदयाळ यांच्या विचारांची आहे. देशातील २५ कोटी जनतेला गेल्या दहा वर्षात दारिद्य्र रेषेच्या वर आणले आहे. शेवटच्या घटकापर्यंत घर, पाणी, वीज, शौचालय यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत. हाच विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला होता. ‘विकास भी और विरसात भी ‘ हा मंत्र प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे. हा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्याच विचारांवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन काम करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवून दिले. जगात फक्त साम्यवाद आणि भांडवलशाही असे दोनच विचार होते त्यावेळी उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन सारखा शाश्वत विकासाचा विचार मांडला. प्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती समाजाशी, समाज राष्ट्रांशी आणि राष्ट्र विश्वाशी जोडलेले आहे. यामध्ये कोणताही विवाद नाही आणि त्यातूनाच मानवजातीचा सर्वांगीण विकास करता येईल हे तत्त्वज्ञान या विचारांमध्ये आहे. समाज, शेती, व्यापार यांचा विकास, आंतरराष्ट्रीय धोरण, परराष्ट्र कूटनीती, यांचा एकत्रित विचार म्हणजे एकात्मिक मानव दर्शन होय. त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त आज या चौकस पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे विचार याठिकाणी कोरण्याचे काम केले. ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्मिक विकासाचा विचार हा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. विकासाच्या या प्रक्रियेत जनतेने आणि बुद्धिजीवी लोकांनी शासनासोबत यावे असे आवाहनही त्यांनी केले.
सुरुवातीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर आणि विचारांविषयी उभारण्यात आलेल्या शिल्पांची पाहणी केली.
कार्यक्रमास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू लोढा, दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अतुल जैन, निखिल मुंडले, मनुभाई अगरवाल, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे भाचे विनोद शुक्ला, भाची मधू शर्मा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here