निरुपण – वास्तवाचे जळते अग्निध्वनी निर्देशित करणारी वैशाली रामटेके यांची कविता

0
97

– महेंद्र ताजणे, वाशीम

मानवी विचारांची उत्क्रांतप्रक्रिया ही विविध विचारप्रक्रियेच्या अंगाने उत्क्रांत होत असते. हा उत्क्रांत विचारधारेचा प्रवास अनित्य असतो. अनित्य आणि अनंत विचार प्रक्रियेत कविता कुठे? कशी? केव्हा? उगवून येते हे मात्र कुणालाही ठामपणे सांगता येत नाही. तरीही कविता ही ह्याच प्रक्रियेचा दृश्य अथवा अदृश्य अंश असते. वेगवेगळ्या सांस्कृतिक पर्यावरणातून तिच्या निर्मितीचा उगम होत असतो. हे उगमही निरनिराळे असतात. या निरनिराळ्या उगमातून कविता आपले निश्चित ठिकाणं अथवा आपली निश्चित दिशा स्पष्ट करीत असते. म्हणजेच कवितेला आपल्या निश्चित भूमिकानिष्ठ पातळीवर विराजमान व्हायचे असते. ह्या पार्श्वभूमीमागची भूमिका यासाठी की, “बोलत राहिले पाहिजे” ह्या वैशाली रामटेके यांच्या  कवितासंग्रहात उगवून आलेले अंश हे उपरोक्त पार्श्वभूमीत समावेश झालेले आहेत.
           सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कौटुंबिक आणि इतर अन्य पातळीवरचं जळतं वास्तव ह्या कवितासंग्रहातून अधोरेखित होते. सभोवतालाच्या अनुभवाचे विविध पदर या कवितेतून अधोरेखित होतात. विविध सांस्कृतिक आयाम या कवितेने अधोरेखित केले आहेत. श्रद्धा आणि  अंधश्रद्धेसारख्या प्रदूषित प्रकाराने माणसं कशी कुजवली जातात. माणसांना कशाप्रकारे भ्रमित केले जाते, याचे भेदक चित्र ‘दगडाची टाळू’ह्या कवितेच्या अनुषंगाने उभे राहते. वैशाली रामटेके यांची कविता केवळ जळतं वास्तव मांडून थांबत नाही तर त्या वास्तवाचे सूक्ष्म पदर उसवत त्या वास्तव प्रसंगाला एक पैलूमयता प्रदान करते.एक दिशादर्शित्व प्रदान करते.
       “पायऱ्याजवळ एक आजी
        बाबासाहेब वाचत बसली होती”पायऱ्याजवळ आजीचं बाबासाहेब वाचत बसणं, हे कवितेत आलेले चित्र, हे केवळ सहज चित्र नसते तर ते सूचक असं सम्यक चित्र असते. ‘वाचाल तर वाचाल’ह्या सुभाषिताच्या अनुरोखाने जाणारे हे चित्र आहे. केवळ वाचनातून नाही तर, बाबासाहेबांच्या ग्रंथ वाचनातूनच तुम्हाला तुमच्या मुक्तीचा, म्हणजेच तुमच्या  जीवनसाफल्याचा निश्चित मार्ग मिळतो, असा निर्देश म्हणजेच धम्मसंदेश ‘दगडाची टाळू’ह्या कवितेच्या अनुषंगाने कवयित्री वैशाली रामटेके यांनी दिला आहे.धम्मदर्शीता हा ह्या कवितेचा मुख्य मूल्यकोन आहे. बाबासाहेब वाचन करण्याची प्रक्रिया ही अत्यंत उद्बोधक आणि कवितेला अधिक उंचीवर नेणारी आहे. सम्यकाच्या मार्गावर नेणारी, विचारभाष्य दिग्दर्शित करणारी आणि मूल्यवेधी ठरावी अशी आहे.
         मुंबई महानगरपालिकेत शासकीय पातळीवर फिरोजशहा मेहता यांच्या स्मारकावरून एकेकाळी चर्चा आणि वाद सुरू होते, त्यावेळी बॉम्बे क्राॅनिकल या तत्कालीन पत्रामध्ये बाबासाहेबांनी फिरोजशहा मेहता यांच्या नावाने वाचनालय उभारावे  अशी सूचना तत्कालीन प्रशासनाला केली होती. केवळ स्मारके आणि पुतळे उभारून काय साध्य होणार आहे. त्यांनी दिलेले विचार महत्त्वाचे आहेत.  त्यांचे कल्याणकारी विचार जोपासावे अशी भूमिका बाबासाहेबांची होती. सद्यस्थितीमध्ये केवळ पुतळे आणि स्मारके उभारले जातात आणि त्यांच्या विचारांपासून फारकत घेतली जाते अथवा महामानवांचे विचार दुर्लक्षित केले जातात. याच अनुरोधाने ‘स्मारके’ या कवितेचा निर्देश करता येईल,
       “तिथे फक्त आणि फक्त तयार होतात सेल्फी पॉइंट
       जगातील सगळ्याच उंच पुतळ्याजवळ
       पोहोचल्याचे सांगण्यासाठी”
ज्या उद्देशाच्या परिपुर्ततेसाठी स्मारके आणि पुतळे उभारले जातात, महापुरुषांनी ज्या चळवळी केल्या, मानवी समाज क्रांतीच्या उत्थानासाठी लढे उभारले, त्याचे स्मरण आणि पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श उभे राहावेत ,पण आता ह्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून अशा स्मारकांची आणि पुतळ्यांची  ठिकाणं केवळ सेल्फी पॉईंट बनत आहे. ही भरकटलेली अवस्था म्हणजे अधोगतीकडे जाणारा मार्ग. विनाशाकडे जाणाऱ्या मार्गातले अंतर्विरोध स्मारके या कवितेतून अधोरेखित होतात, हे आंतरविरोधीय सांस्कृतिक पर्यावरण अत्यंत  सूक्ष्म पातळीवर उपरोक्त कवितेत टिपल्या गेले हे विशेष लक्ष्यणीय  ठरावे असे आहे.
       संवेदनशीलता आणि माणुसकीहीनता, भौतिक संपत्तीचा उन्माद अशा सडेल मनोप्रवृत्तीचा निर्देश करणारी ‘लक्तरे’ ही कविता, आणि अत्यंत दारिद्र्यातही काजव्यांची स्वप्न पाहणारी ‘माय’ शिक्षणाचे महत्त्व आणि अभ्यासासाठी पुस्तकाची मौलिकता याचे ह्रदयद्रावक वर्णन ‘चूल’ या कवितेत येते. सांस्कृतिक किनारे असलेल्या ह्या कविता आपले वेगळे चारित्र्यसौंदर्य निश्चित करतात.

     ” एका भयानक रात्री तो तिला
        उर मारुन भोगत होता
        अख्खी रात्र ती कण्हत राहिली
         सोसत राहिली
       तो सळसळत राहिला
       वळवळत राहिला
       सकाळी दोघेही शांत…

        कित्येक दिवसानंतर
       आज भूक भागली होती
        त्याची शरीराची
       अन् तिची पोटाची
        फरक एवढाच होता”

स्त्री पुरुष विसंवादी चारित्र्याची, नात्यांच्या नैतिक अधोगतीची कविता म्हणून ‘भूक’ह्या कवितेकडे निर्देश करावा लागेल. भूक ही वासनेची, भूक शरीराची आणि पोटाचीही असते, हे भयंकर वास्तव भूक या कवितेतून निर्देशित होते.  पोटाच्या भूकेसाठी एखाद्या स्त्रीला किती खालच्या  पातळीवर  सोसावे लागते. किती विखारी यातनेला सामोरी जावे लागते. ही समाज व्यवस्थेमधली भयंकर कीड आहे. ‘तो सळसळत राहिला,वळवळत राहिला’ हे समाज व्यवस्थेचे चित्र अत्यंत विदारक, वेदनादायी आणि भयंकर चीड यावी अशा परिणामकारक पद्धतीने कवयित्रीने भूक या कवितेत अधोरेखित केले आहे. चित्रगर्भता शैलीची कविता म्हणून ह्या कवितेकडे निर्देश करता येईल. स्त्री पुरुषाच्या अंतर्संबंधाचे हे सूक्ष्म चित्रण कवितेला अधिक धारदार बनवते.आंबेडकरवादी चळवळीतील मोर्चाचे अंतरंग आणि त्यातील फोलपणाचे, निरर्थकपणाचे आणि त्यातील तकलादूपणाचे निदर्शन करणारी ‘मोरक्या’ ही कविता. पैसा आणि माणुसकी यांच्या जागा लक्ष्यकेंद्रित करणारी ‘निष्ठावंत असणारी जमात’ माणूसपण बेचिराख करणारी ‘धुरा’भाकरीसाठी असंवेदनशील होणारी माणसं ही ‘भाकरीसाठी’वार, ती मागायला येणारी, बेईमान जिंदगी, मी अल्पसंख्यांक, डोईजड झालेला पदर, हितचिंतक, रंग, चुकीचा विस्तार, चॅरिटी शो, प्रबोधक आणि प्रेम केल्याचा माफीनामा, ह्या सर्वच कविता विविध वृत्ती -प्रवृत्ती आणि त्यांच्या नात्यांवर, नात्यातील अंतर्विरोधावर प्रकाशझोत टाकणा-या आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाच्या विविध मुद्रांनी अंकित झाल्या आहेत.
     आंबेडकरवादी चळवळीतील योद्ध्याची चित्रगाथा ‘तो योद्धा’या कवितेतून अधोरेखित होते. विचारनिष्ठता आणि आंदोलननिष्ठता ह्या बाबी आयुष्यभर प्राणपणाने जपणाऱ्या योद्ध्याची  शौर्यगाथा ध्वनीत करणारी ही कविता स्वतेज आणि स्वस्तित्वाचे चारित्र्य निर्धारित करते. शरीर जरी संपूर्ण थकलं तरी आतला आंबेडकरी पीळ कायम आहे. यातलं ज्वालाद्रव्य ‘तो योद्धा’ या कवितेत अंतर्भूत झालं आहे.
    “हात अजून थरथरतात… पाय उचलत नाहीत
    जीर्ण झालेला देह…
    सांगत राहतो विजयाची भाषा
    झुकल्या गेलेल्या मानेला उंचावण्यासाठी”
मरगळलेल्यांच्या काळजात जागृतीचा विस्तव फुलवणारी कविता. गुलामाला  गुलामीची जाणीव करून देणारी आणि पराभूतांना विजयाच्या भाषेत सौंदर्यगणित शिकविणारी कविता म्हणून  उपरोक्त कवितेचा उल्लेख करता येईल.
      राजकारणातला पाऊस, जात, कागोर, दर्जाहीन झालेलं तिचं जगणं, बदल, जंगलतोड,जात बदलायची का?  फिरतो सब ठीक है, देवदासी आणि आदेश अशा विविध विचारप्रक्रियेच्या विचारमूल्यांनी जाणाऱ्या अनेक कविता ह्या कवितासंग्रहात अन्य ठिकाणी विखुरलेल्या आहेत. कवितेचे हे वेगळीयत्व दखलपात्र ठरावे असे आहे.
    सभोवतीचे समाज वास्तव भयंकर कल्लोळाने प्रदूषित होत आहे. माणसं विसंवादी होत आहेत. विषारी प्रवृत्ती मुजोर होत आहेत. क्षितिजावर काळोखाचे ढग ठाण मांडून बसत आहेत. माणसांच्या ओठांवरचे शब्द विरून जात आहेत. माणसांची दृष्टी क्षीण होत आहे. अशावेळी आपण बोलत राहिले पाहिजे अशी भूमिका ‘बोलत राहिले पाहिजे’ ह्या कवितेच्या अनुरोधाने जेव्हा उजागर होते, तेव्हा हे उजागर होणे खूप अन्वर्थक आणि आश्वासक असते.जसे-

        “झुंडी झुंडीने येऊन
         कळपे बेचिराख केली
         मेंदू भ्रष्ट करून
        माझी माणसे विभागल्या गेली गटातटात
         पण मला कळून चुकलं
        बोलत राहिले पाहिजे
         आपल्या लोकांसाठी…”हे 

आपली माणसं अथवा आपल्या लोकांसाठी बोलत राहिले पाहिजे कारण, धर्म आणि जातीय व्यवस्थेच्या झुंडी बेफाम माणसे मारत सुटल्या आहेत.  त्या निर्दोष माणसांना निर्दयपणे बेचिराख करीत  सुटल्या आहेत. एकीचा भीमकिल्ला या झुंडी तोडत आहेत, म्हणजेच आपल्या माणसांना एकीपासून म्हणजेच, ऐक्यापासून दूर ठेवत आहेत. त्यांना गटातटात विभागून, त्यांच्यावर झुंडी झुंडीने भयंकर अमानवी हल्ले करत आहेत. अशावेळी आपण मौन धारण न करता आपण ‘बोलत राहिले पाहिजे’ हा कवयित्री वैशाली रामटेके यांचा निर्णायक  निर्धार हा मूल्यवर्धक आणि सूर्यस्वभावी आहे. अशा सूर्यस्वभावाच्या अनुरोखाने जाणाऱ्या अनेक कविता ह्या संग्रहात आहेत.जसे- मला दैवत सापडतं, भूकेचे संदर्भ, जागा मिळेल का जागा? जीवनमूल्य शैलीची होत असलेली अधोगती व्यक्त करणारी ‘अंगरखा’अंधश्रद्धेवर निर्देश करणारी ‘भक्तांची पैदास’हुकूमशाही प्रवृत्तीवर प्रखर भाष्य करणारी ‘सूर्यसत्य’विविध झेंड्यांच्या कल्लोळात तिरंगी झेंड्याचे मूल्य विशद करणारी ‘झेंडा’आदिं कविता आपापल्या स्वतंत्र वैचारिक पातळीवर, सांस्कृतिक मूल्यांच्या पर्यावरणाने उगवून आल्या आहेत. मुक्तछंद आणि लयप्रवाही रचनाबंधाची  सुरेख बांधणी सर्व कवितांची झाली आहे.
     “पुस्तकाच्या सानिध्याने  ती लिहायला लागली अन्याय, अत्याचार आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींवर
अन् लोक तिला विद्रोही बोलायला लागले” ‘पुस्तकाच्या सानिध्याने ती लिहायला लागली’हे कवितेतील काव्यभाष्य विशेष लक्ष्यणीय आहे.पुस्तकाचे सानिध्य हे माणसाला आणि समाजाला प्रगल्भगर्भतेची दीक्षा देते. डोळसपणाची जाणीव निर्माण करते. वाचनप्रक्रिया ही सामाजिक प्रक्रियाही असते. ह्या प्रक्रियेतून विद्रोही जाणीव उगवून येते, ह्या प्रक्रियेतून विद्रोह  उफाळून येतो. विद्रोह म्हणजे निव्वळ भांडखोर प्रक्रिया नाही तर, विद्रोह म्हणजे पुनर्रचनाप्रवण प्रक्रियाही असते. अमानवी प्रवृत्तीवर हल्ला, शोषण, अन्याय, अत्याचार व्यवस्थेच्या विरोधात सनदशीर मार्गाने, अहिंसेच्या मर्यादित मार्गाने पुकारलेला लढा म्हणजे विद्रोह. समता, स्वातंत्र्य आणि भगिनीभावाच्या जीवनप्रणालीसाठी विधायक शैलीने केलेली कृतिशील मांडणी म्हणजे विद्रोह. अशा विविध विचारमुद्रांनी विद्रोहाची मुद्रांकितता सिद्ध होते. विद्रोही कवितेतील वीरांगणा ही अशा विद्रोही मूल्यांनी उजागर झाली आहे. विद्रोही जीवनमूल्यांची कविता म्हणूनही ह्या कवितेकडे निर्देश करता येईल.मानवी भाव भावभावनांचा तरल अविष्कार निर्देशित करणारी ‘निशिगंध’ आत्महत्येच्या सबंधाने मानसिक परिस्थितीची गुंतागुंत अधोरेखित करणारी ‘आत्महत्या सहज होत नाहीत’ ही कविता, विखारी,बाईपण,पाऊलखुणा, कौटुंबिक पातळीवरच्या ताणतणावाची ‘ती’ तू आणि ती ह्या एकमेकांच्या कार्यकारण भावाच्या नात्यांचा कोश दिग्दर्शित करणारी ‘वादळ’विधवेचे अंतरंग आणि त्यातील दुःखाचा पदर उजागर करणारी ‘विधवा’ पुरुषी वर्चस्व आणि उन्मादाच्या रोखाने जाणारी  ‘हातमिळवणी’ कुटुंब आणि समाज यांच्या भेद रेषा स्पष्ट करणारी ‘उंबरठा’ बाई आणि पुरुष यातलं सांस्कृतिक पर्यावरण निर्देशित करणारी ‘तू पुरुष म्हणून वावरताना’ तू स्पर्शलेल्या वाटेला, तोअजून जिवंत होता,सल,कुंकू, तो सोडून गेल्यावर, तिच्या काळजाची सल,विझणार नाही, तुझे कुरूप दिसणे गरजेचे होते, विश्वासघात वचनाचा वचनासाठी, सल काळजातून बसून पाहते आहे, या नि अशा अनेक कविता निरनिराळ्या  पातळीवर लक्षवेधी ठरतात. कवितेतील गती आणि रचनाबंधाच्या पातळीवर वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आहेत.
“कवितेला पूर्णत्व आणण्यासाठी तिला वाचत राहतो वर्षानुवर्षे ती आपलीच आहे म्हणत..”
   ‘गर्भार राहिलेली कविता’ह्या शीर्षक असलेल्या उपरोक्त कवितेत  कवितेच्या निर्मितीप्रक्रियेचे चढ उतार अधोरेखित झाले आहेत. कोणतीच कविता ही परिपूर्ण कधीच होत नसते. कवितेचा प्रवास पूर्णत्वाकडे चाललेला असतो पण कधीच परिपूर्ण होत नाही. मात्र आपणच आपली कविता वर्षानुवर्षे वाचत राहतो. वर्षानुवर्षे तिला जपत असतो. सूर्यवंशातून उगवलेली कविता ही सूर्यवंशीच असते. निराशेचा कोणताही स्पर्श या कवितेला होत नाही. नव्या क्षितिजातून नवे क्षितिज उगवणे अशी बीजसौंदर्यी कविता म्हणून वैशाली रामटेकेंच्या कवितेची नोंद करता येईल.
      “म्हणून तू निराश होऊ नकोस
       दवूबिंदू लखलखतील, कळ्या फुलतील
       पहाट होईल, गंध दरवळेल” अशा काव्यसौदर्योत्सवात ही कविता न्हाऊन निघते. दरवळत राहते. सोनेरी किरणांनी तेजाळत राहते. अशी उजेडस्पर्शी कविता ही उजेडाच्या दिशेने चालत राहते. दवबिंदूंनी ओलीचिंब होते आणि फुला कळ्यांनी सुगंधित होत जाते.हा कवितेचा सर्जनारंभ वैशालीने आपल्या प्रतिभेतून उगवून आणला आहे.
       अत् दीप भव ,
बुद्धाच्या विचारसरणीची जाणीव करून देणारी ‘शर्यत’ ही कविता मूल्यवर्धकतेचा तेजस्वी मासला ठरावी अशी कविता आहे.तसेच दिव्याखालून, मैत्रीसाठी, बालपणाचे स्मृतिचित्र रेखाटणारी ‘बालपणीचं गाव’डोळ्यांतल्या दुःखाची ‘डोळे’ आईच्या उज्वल चारित्र्याची आणि तिच्या जीवनजिद्दीची ‘जिथे तिथे तुझे रूप’ तसेच ‘गर्भाची कळ’ही कविता एक कथाकाव्य उभे करते.
       जसे-बाहेर बेधुंद पाऊस सुरू आहे आणि माय बाळाला जन्म देण्यासाठी कळा सोसत आहे. बाप घराबाहेर काळीज हातात घेऊन उभा आहे. मायची किंकाळी आणि बाळाची नाळ सुटणं, मायचं हंबरून जाणं आणि बापाच्या ओंजळीत लेकीचं चंद्रासारखं हसणं, हा साराच काव्यदर्शी चित्रप्रदेश कवयित्री वैशाली रामटेके यांनी अतिशय तरल आणि भावपूर्ण शैलीने चित्रांकित केला आहे. ‘गर्भाची कळ’ही कविता आणि इतर सर्व कविता आपल्या विशेष चारित्र्यशैलीने लक्ष्यणीय ठरल्या आहेत.
           आमच्या समग्र जीवनसृष्टीचे महाबोधिवृक्ष म्हणजे बाबासाहेब. रक्तविरहित धम्मक्रांतीचं दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांना अभिवादन करणारी ‘बाबासाहेब’ ही कविता काळीज पेटवते. भन्नाट वादळ होते समग्र समाजक्रांतीचे. या संपूर्ण कवितेवरच प्रकाशझोत टाकता येईल,
जसे-

     “मी काळजावर हात ठेवून एकच शब्द बोलले
     ‘बाबासाहेब’
     अन काळीज पेटून उठलं वादळ होऊन…
       पाय आपोआपच वळायला लागले
        पुस्तकाच्या दिशेने
       मी बाबासाहेब वाचत सुटले…

       आता मी अन्यायाचा प्रतिकार करणारी
       पाईक होऊ पाहत आहे…
        प्रबुद्ध जग बनवण्यासाठी बुद्धालाही वाचत आहे
        बाबासाहेबांच्या वाणीतून
     अथवा
      निराश होऊ नकोस मित्रा
      बाप अजून जिवंत आहे
       तू फक्त एवढंच कर
     बाबासाहेब वाचून बघ!”

प्रज्ञासूर्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळेच अन्यायाचा प्रतिकार करण्याची ऊर्जा मिळाली आणि बाबासाहेबांमुळेच आम्ही बुद्धाकडे वळू शकलो. बाबासाहेबमुळेच आम्ही बाबासाहेब वाचू शकलो. हा साराच कृतज्ञताभाव ‘बाबासाहेब’ह्या कवितेतून अविष्कृत झाला आहे. निराशावादी लोकांना बाबासाहेब वाचण्याचा सम्यक संदेश कवयित्रीने  दिला आहे.
     प्रबुद्ध भारताच्या निर्माणासाठी बोलत राहिले पाहिजे हे कवितासंग्रहाचे शीर्षक आशयपूर्ण आणि मर्मदायी आहे. वास्तवाचे अनेक जळते अग्निध्वनी या कवितासंग्रहात ऐकू येतात, तसेच हे अग्निध्वनी  जळत्या वास्तवाच्या साक्षीने बोलायलाही लागतात. समग्र अग्निध्वनीची व्यापकता आणि व्यामिश्रता या कवितासंग्रहात अंतर्भूत झाली आहे.व्यामिश्र कवितेचे तेजाळते क्षितिज या कवितेने उगवून आणले आहे. मानवी जीवनाच्या विविध किनार्‍यांनी ह्या कवितेला  सौंदर्यांकित केले आहे.
     प्रा.डाॅ.इसादास भडके यांची अभ्यासपूर्ण आणि कवितानिष्ठ प्रस्तावना, कवी लोकनाथ यशवंत यांचे  आशयपूर्ण बर्ल्ब आदिंनी कवितासंग्रहाच्या सौंदर्यात भर घातली आहे. ‘बोलत राहिले पाहिजे’ ह्या कवितासंग्रहासाठी आणि वैशाली रामटेकेंच्या पुढील सर्जनादीपत्वासाठी हार्दिक सदिच्छा!

                         – कवितासंग्रह :
             बोलत राहिले पाहिजे
              – वैशाली रामटेके.चंद्रपूर
            मो.८६२४०४६४०३
              पृष्ठे: १००,मूल्य: २००/-

 महेंद्र ताजणे, वाशीम
 मो.९६८९७२१०१६
दि.१४/२/२०२५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here