छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!

0
42

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे आ. किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिका व आ. किसन कथोरे यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बदलापूरसारख्या ऐतिहासिक शहरात शिवछत्रपतींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य उभे करण्याची प्रेरणा दिली. अठरापगड व बारा बलुतेदार समाजाला सोबत घेऊन महाराजांनी देव, देश, धर्मासाठी लढा दिला. आज स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे, तसेच हा केवळ पुतळा नसून, हे प्रेरणेचे स्थान आहे, छत्रपती शिवरायांचा हा भव्य पुतळा बदलापूरकरांना अनेक अर्थाने प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
या संपूर्ण परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या व रखडलेल्या विकासकामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच या भागात उल्हास नदीच्या संदर्भात पूररेषेचा विषय मार्गी लावण्यासाठी काम सुरु असून नदीतील गाळ काढण्याचेही काम लवकरच सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या संपूर्ण परिसराच्या मेट्रो कनेक्टिव्हिटी संदर्भातील कामालाही गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी खा. सुरेश म्हात्रे, आ. किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, आ. कुमार आयलानी, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here