लातुरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
41

• सळसळत्या उत्साहात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा

• मावळे, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वाढविली शान

• ढोल-ताशांचा नाद घुमला; लेझीम आणि झांज पथकाने जिंकली मने

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून सुरु झालेल्या या पदयात्रेत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथक, झांज पथकाने केलेल्या सादरीकरणाने यावेळी उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून गेला. आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.), जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जय शिवाजी, जय भारत पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये अनेक विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, वारकरी आदी पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात विविध शाळा, महाविद्यालयांच्या लेझीम, झांज पथकांचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दयानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरील पोवाडा आणि उपस्थितांकडून देण्यात आलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या सळसळत्या उत्साहात दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून पदयात्रेला सुरुवात झाली. अश्वारूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि चित्ररथ या पदयात्रेच्या अग्रस्थानी होता.

पदयात्रा दयानंद महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथे आल्यानंतर लेझीम व झांज पथकाचे सादरीकरण झाले. त्यानंतर पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाली. छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्यासह सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुन्हा दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या यात्रेचे संयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा : आमदार विक्रम काळे

जय शिवाजी, जय भारत पदयात्रेच्या माध्यमातून आज राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या इतिहासातून नव्या पिढीला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांसाठी मार्गदर्शक : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. आजच्या युगात युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास नक्कीच यशप्राप्ती होईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या. तसेच जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत युवा वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रास्ताविकामध्ये जय शिवाजी, जय भारत पदयात्रा आयोजनाचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले. या पदयात्रेत पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतनचे ढोल-तशा पथक, दयानंद कला महाविद्यालय, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, माउंट लिटेरा झी स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, राजस्थान विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, शिवाजी विद्यालय, केशवराज विद्यालय, सदानंद माध्यमिक विद्यालय, श्री श्री श्री रविशंकर विद्यालय, प्रयागबाई पाटील विद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय व ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी, झांज पथके, लेझीम पथके या सहभागी झाली होती. या पदयात्रेनिमित्त दयानंद महाविद्यालय परिसरात उमेद अभियान अंतर्गत महिलाबचत गटांची दालनेही उभारण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here