कार्यकर्त्यांची घेतली आढावा बैठक.
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – लोकभेतील अभुतपूर्व यशानंतर राज्यात कॉग्रेस ला अपेक्षीत असे विधानसभेत यश मिळू शकले नाही. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी दरम्यान केले.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार असून त्या जिंकण्याचा काँग्रेस पक्षाने निर्धार केला असून त्यासाठी चंद्रपूर शहरातील पठाणपूर प्रभागातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजविला आहे. या प्रभागात माजी नगरसेवक नंदु नागरकर यांच्या घरी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, प्रत्येक निवडणूका या वेगवेगळ्या पध्दतीने होत असतात. एक पराभवाने खचून न जाता, पुन्हा जोमाने कामाला लागा व संघटन मजबूत करुन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश प्राप्त करा. मी प्रत्येक प्रभागात आढावा बैठक घेणार असून त्या ठिकाणी संबंधित नागरिकांशी चर्चा करुन प्रभागातील समस्येवर महानगरपालिकेत बैठक देखील घेईल. आपण सर्वांनी एक होऊन काम केल्यास निश्चित येणाऱ्या निवडणूकांत विजय संपादन करता येईल. या बैठकी वेळी मंचावर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर शहर कॉग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर विधानसभेचे कॉग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर, माजी नगरसेवक नंदु नागरकर, सुनिता लोढिया यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

