खंजरी स्पर्धेतील प्रत्येक कलाकार हा संस्कृतीचा दूत – आ. किशोर जोरगेवार

0
30

श्री. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने धानोरा येथे विदर्भस्तरीय खंजरी स्पर्धेचे आयोजन

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे समाजप्रबोधन करणारे तेजस्वी विचारवंत होते. त्यांचे ग्रामगीतेतील विचार आजही आपल्याला आदर्श समाजाच्या निर्मितीची दिशा दाखवतात. त्यांचे ‘खंजरी’ हे केवळ एक वाद्य नव्हे, तर लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. या स्पर्धेद्वारे विदर्भातील अनेक कलावंतांनी आपल्या सृजनशीलतेतून भारतीय संस्कृतीचा जागर घडविला असून, आजच्या या स्पर्धेतील प्रत्येक कलाकार हा संस्कृतीचा दूत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, धानोरा (पिपरी) यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भस्तरीय भव्य खंजरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शेषराज आस्वले, सचिव मारोती वासाडे, रमेश आस्वले, रंगराव पवार, दिवाकर बोढे, यशवंत भगत, सविता मोहितकर, दामोदर गोडे, रमेश आस्वले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “आज या पावन सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला, याचा मला अतिशय आनंद आणि समाधान वाटते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या विदर्भस्तरीय भव्य खंजरी स्पर्धेचे आयोजन म्हणजे, आपली समृद्ध लोकसंस्कृती जपण्याचा आणि पुढे नेण्याचा एक सुंदर उपक्रम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कला आणि विचारांतून ग्रामीण संस्कृती जिवंत राहते, तिचा प्रचार व प्रसार होतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते.
या पवित्र मंचावरून खंजरीच्या गजरात त्यांच्या विचारांचा जागर घडतो आहे. खंजरी हे केवळ एक वाद्य नाही, तर भक्ती, सामाजिक जागरूकता आणि क्रांती यांचे प्रतीक आहे. या सुरेल नादातून लोकचळवळीला प्रेरणा मिळते आणि संत परंपरेचे पुण्यस्मरण होते. या स्पर्धेत विदर्भभरातून आलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या कलेतून संतांच्या विचारांचा प्रचार होत आहे. संतांचे विचार हे केवळ ग्रंथांत किंवा प्रवचनांत सीमित राहता कामा नयेत, तर ते आपल्या जीवनशैलीचा भाग बनले पाहिजेत. सेवा, त्याग आणि सामाजिक भान हीच आपली खरी भक्ती असली पाहिजे. अशा सांस्कृतिक चळवळींना आमचा नेहमीच पाठिंबा राहील. असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here