जिल्हा परिषद; शनिवार, रविवारी सुरू राहणार कामकाज
ठाणे – दि. २८ “क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत कार्यालयांकरिता १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा प्रभावी कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाने कामकाज करण्यात येत आहे.
स्वच्छतेसाठी विशेष मोहिम जिल्हा परिषदेत राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या अभिलेख कक्षातील प्रचलित नियम, कार्यपद्धतीप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कार्यालयांमधील अभिलेख निंदणीकरण करण्यात येत आहे. तसेच, सर्व अभिलेखांचे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.९/१८(र.-व-का.), दिनांक १५.०२.२०१८ अनुसार वर्गीकरण करण्यात येत असून कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची (उदा. संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे, इत्यादी) विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कामकाज करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आज, सुमारे ३०० अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. तसेच सर्व पंचायत समिती येथील कार्यालत देखील अभिलेख वर्गीकरण करण्यात येत आहे.
आगामी १०० दिवसांमध्ये १) संकेतस्थळ (Website), २) सुकर जीवनमान (Ease of Living), ३) स्वच्छता (Cleanliness), ४) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal), ५) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place), ६) गुंतवणूक प्रसार (Investment promotion), ७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits) या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही जिल्हा परिषदेत कार्यालयांमध्ये या कृती आराखड्याची तत्परतेने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार, दि. १ मार्च, २०२५ व रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी देखील अधिकारी व कर्मचारी अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कामासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसमवेत मैल कामगार यांच्या मदतीने कामकाज करण्यात येत आहेत.
हा १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा दि.१५ एप्रिल २०२५ पर्यंत यशस्वीपणे राबवून घेण्यासाठी विशेष मोहिम जिल्हा परिषदेत राबविण्यात येत आहे. यासाठी संकेतस्थळ हे जनतेशी संवाद साधणारे असावे जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण ऑनलाइन होईल या उद्देशाने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नागरिकांना हाताळण्यासाठी सोईचे तसेच अधिक माहिती देण्यासाठी तयार करण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने नागरिकांची सनद आपल्या कार्यालयाबाहेरील दर्शनी भागात लावण्यात येत आहे. कागदविरहित प्रशासनावर भर देणारी ई–ऑफिस प्रणालीच्या माध्यामाचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे यांनी दिली.

